Sunday, August 19, 2018

जो व्‍यक्‍ती आपल्‍या सामर्थ्‍यांचा सदोपयोग करतो, तोच खरा मनुष्‍य... प्रसिध्‍द विव्‍दान पंडीत बृजेश शास्‍त्री

वनामकृविच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन

बौध्‍दीक कौशल्‍य, वाणी कौशल्‍य, शारीरिक शक्‍ती, मनशक्‍ती आणि आत्‍मीक शक्‍ती या पाच सामर्थ्‍याचा उपयोग समाजाच्‍या प्रगतीसाठी झाला पाहिजे. जो व्‍यक्‍ती आपल्‍या सामर्थ्‍यांचा सदोपयोग करतो, तोच खरा मनुष्‍य आहे, असे प्रतिपादन गाजीयाबाद (उत्‍तर प्रदेश) येथील प्रसिध्‍द विव्‍दान पंडीत बृजेश शास्‍त्री यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक १६ ऑगस्‍ट रोजी मनुष्‍य जीवन की सार्थकता या विषयावर आयोजित व्‍याख्‍याना प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते, तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले, कक्षाचे उपाध्‍यक्ष डॉ एच व्‍ही कालपांडे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पंडीत बृजेश शास्‍त्री पुढे म्‍हणाले की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीला सन्‍मान पाहिजे असतो, प्रत्‍येकाला सन्‍मान दिला तर सन्‍मान मिळतो. दुस-याच्‍या सुख - दु:खात आपण सहभागी झाले पाहिजे. आधी स्‍वत: मध्ये सुधारणा करा, तेव्‍हा जग सुधारेल. स्‍वत:तील कमतरता ओळखा, स्‍वत:तील चुकांचा स्‍वीकार करा तरच सुधारणा शक्‍य आहे.  
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, आज प्रत्‍येक व्‍यक्‍ती संपत्‍ती कमावण्‍यात व्‍यस्‍त आहे, त्‍यामुळे आपण मुल्‍य शिक्षणापासुन दुर जात आहोत. विशेषत: विद्यार्थ्‍यी मुल्‍य शिक्षणापासुन वंचित राहत आहेत. आपल्‍या देशाला मोठा सांस्‍कृतिक वारसा लाभला आहे. वाचन संस्‍कृती बंद होत आहे, वाचन संस्‍कृती जपण्‍याची गरज आहे. सतत चिंतन प्रक्रिया चालु पाहिजे. मनातील नकारत्‍मक विचार कमी केल्‍यानंतर मनातील रिकामी झालेल्‍या जागेत सकारत्‍मक विचार भरण्‍याची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ विलास पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.