Thursday, October 18, 2018

भारतीय कृषि संशोधन परिषदेची वनामकृविस पुढील पाच वर्षाकरिता अधिस्‍वीकृती

नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेची राष्‍ट्रीय कृषि शिक्षण अधिस्‍वीकृती मंडळाची २२ वी बैठक दिनांक २८ सप्‍टेबर रोजी परिषदेचे महासंचालक मा. डॉ. त्रिलोचन महापात्रा यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अधिस्‍वीकृतीस मान्‍यता देण्‍यात आली असुन ही अधिस्‍वीकृती पुढील पाच वर्षाकरिता आहे. विद्यापीठास शै‍क्षणिक दर्जाच्‍या आधारे एकुण ४ पैकी २.७७ मिळाले असुन विद्यापीठाने दर्जा प्राप्‍त केला आहे. विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी, लातुर, बदनापुर, गोळेगाव, उस्‍मानाबाद व अंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालये तसेच परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्‍नतंत्र महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, सामाजिक विज्ञान महाविद्यालय व लातुर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास अधिस्‍वीकृती प्राप्‍त झाली आहे. या महाविद्यालयातील सर्व पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीच्या अधिस्‍वीकृ‍तीस बैठकीत मान्‍यता देण्‍यात आली आहे. केवळ पशुसंवर्धन, दुग्धशास्‍त्र, जैवतंत्रज्ञान व कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन विषयातील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम हा भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या कार्यक्षेत्रात येत नसल्‍यामुळे अधिस्‍वीकृती अप्राप्‍त आहे. 

यापुर्वी परिषदेने काही अ‍टींवर विद्यापीठास दोन वर्षाकरिता तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात अधिस्‍वीकृती दिली होती. विशेषत: परिषदेने विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा, रिक्‍त पदे व खासगी महाविद्यालयाच्‍या शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले होते तर काही घटक महाविद्यालये अधिस्‍वीकृतीपासुन वंचित राहीली होती, यामुळे विद्यापीठावर मोठया प्रमाणावर टिकाटिप्‍पणी झाली होती. परंतु मागील दोन वर्षात माननीय राज्‍यपाल यांनी विशेष लक्ष दिल्‍यामुळे विद्यापीठांतर्गत एकाही खासगी महाविद्यालयास व अतिरिक्‍त तुकडीस मंजुरी न देता त्‍यांच्‍या शैक्षणिक दर्जा सुधारण्‍याकरिता प्रयत्‍न केला तसेच राज्‍यशासनाच्‍या मदतीने विद्यापीठातील रिक्‍त पदे भरण्‍याचे प्रयत्‍न झाले. शैक्षणिक दर्जा सुधारणेसाठी माजी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व सद्याचे कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली शिक्षण संचालक तथा‍ अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील यांनी सर्व सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य यांच्‍या मदतीने विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील प्रयोगशाळा, वसतीगृहे, ग्रंथालये, संशोधनासाठी लागणारी साधनसंपत्‍ती आदींची बळकटीकरण केले तसेच विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्‍न केले गेले. शैक्षणिक दर्जाच्‍या मुल्‍यांकन करण्‍याकरिता दिनांक २० ते २३ सप्‍टेबर दरम्यान भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या अधिस्‍वीकृती मंडळाचे सदस्‍यांनी विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयांना भेट दिली असता समाधान व्‍यक्‍त केले. त्‍यामुळे मुल्‍यांकनात शैक्षणिक दर्जेच्‍या आधारे विद्यापीठास ४ पैकी २.७७ गुण प्राप्‍त झाले, पुढील पाच वर्षाकरिता विद्यापीठास अधिस्‍वीकृती मिळाली.

विशेषत: परभणी व लातुर येथील कृषि महाविद्यालयास मुल्‍यांकनात ४ पैकी ३ गुण प्राप्‍त केले असुन उस्‍मानाबाद (२.८६ गुण), बदनापुर (२.७३ गुण), गोळेगांव (२.५६ गुण), व अंबेजोगाई (२.५५ गुण) येथील कृषि महाविद्यालये तसेच परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (२.९१ गुण), अन्‍नतंत्र महाविद्यालय (२.८७ गुण), सामाजिक विज्ञान महाविद्यालय (२.८४ गुण), उद्यानविद्या महाविद्यालय (२.८२ गुण) व लातुर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास (२.८० गुण) गुणासह अधिस्‍वीकृती प्राप्‍त झाली.

सदरिल अधिस्‍वीकृतीमुळे भारतीय कृषि संशोधन परिषदेमार्फत राबविण्‍यात येणारे शैक्षणिक कार्यक्रमे व साधनसंपत्‍तीसाठी निधी सर्व महाविद्यालयांना उपलब्‍ध होणार असुन विद्यापीठाच्‍या शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण कार्यास मोठी चालना मिळणार आहे. तसेच राष्‍ट्रीय बुध्‍दीमत्‍ता शिष्‍यवृत्‍ती - एनटिएस प्राप्‍त आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय विद्यार्थ्‍यांना विद्यापीठात पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठी प्रवेशासाठीची संधी उपलब्‍ध होईल. दस-यांच्‍या पुर्वसंध्‍येस मिळालेल्‍या विद्यापीठ अधिस्‍वीकृतीमुळे विद्यापीठातील अधिकारी, प्रशासक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी यांच्‍या मध्‍ये उत्‍साहाचे वातावरण पसरले आहे.