Thursday, February 21, 2019

वनामकृवित दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील बीड, उस्‍मानाबाद, जालना व औरंगाबाद जिल्‍हयातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रृंखलेतील बीड व उस्मानाबाद जिल्हयासाठीचा सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन दि. 21 फेब्रुवारी रोजी झाले. कार्यक्रमास नवी मुंबई येथील टाटा जागृती फाऊंडेशनचे संचालक श्री. विद्येश जोशी, मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. एस. टी. शिराळे, श्री. हर्षल जैन आदींची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे होते. सदरिल प्रशिक्षण कुलगूरू मा. डॉ. अशोक ढवण आणि संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहेत.
मार्गदर्शनात डॉ. आनंद गोरे म्‍हणाले की, सेंद्रीय शेती ही एक व्यापक संकल्पना असुन या कोणत्याही एक घटकावर अवलंबून न राहता विविध घटकांचा एकात्मिकपणे विचार करणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीवापरण्यात येणाऱ्या निविष्‍ठांचा वापर करतांना योग्‍य तांत्रिक माहिती घेणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेती ही एक दिर्घकालीन चालणारी प्रक्रिया असून यामध्ये यश मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी संयम व सातत्य या बरोबरच तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगीतले. श्री. हर्षल जैन यांनी सेंद्रीय शेतीप्रमाणीकरणास अतिशय महत्व असून त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्‍याचे सांगितले तर मृदाशास्त्रज्ञ डॉ. एस.टी. शिराळे यांनी जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी दिर्घकालीन कार्यक्रम राबविण्याची गरज असल्‍याचे सांगीतले.
तांत्रिक सत्राडॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, डॉ. एस. टी. शिराळे यांनी सेंद्रीय पध्दतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन, श्री. विद्येश जोशी यांनी सेंद्रीय बाजारपेठ व्यवस्थापन, श्री. हर्षल जैन यांनी सेंद्रीय प्रमाणीकरण, डॉ. सुनिल जावळे यांनी जैविक खतांची निर्मिती व उपयोग यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनिल जावळे यांनी केले. सूत्रसंचालन सतिश कटारे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत कदम यांनी केले. कार्यक्रमास बालाजी मोरे, श्रीनिवास देशपांडे, राजाभाऊ चाळक, संजय वाटवडे, प्रभाकांत गोडसे, दत्तात्रय पाटील आदीसह बीड व उस्मानाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रल्हाद गायकवाड, शितल उफाडे, बाळू धारबळे, भागवत वाघ, सचिन रणेर, नागेश सावंत, दिपक शिंदे, व्दारका काळे आदींनी परिश्रम घेतले.