Thursday, January 2, 2020

वनामकृविच्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळा संपन्‍न

वनामकृवि विकसीत नवीन कापूस संकरीत वाण बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी प्रयत्‍नशील..... कुलगुरु मा डॉ अशोक ढवण

कापसावरील गुलाबी बोंडअळीचे प्रभावीपणे व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करावा लागेल, तसेच लागवडीच्‍या खर्चात कपात करुन उत्पन्न वाढवणे आवश्‍यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसीत नवीन कापूस संकरीत वाण बीटी मध्‍ये परावर्तीत करुन शेतक­र्यांना उपलब्ध करुन देण्‍यासाठी प्रयत्‍नशील असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरु मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या धनेगाव प्रक्षेत्रावर दिनांक २ जानेवारी रोजी आयोजित गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर कोर्इंबतुर येथील अखिल भारतीय समन्वीत कापूस सुधार प्रकल्पाचे प्रकल्‍प समन्वयक डॉ. ए. एच. प्रकाश, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, महाबीजचे गुणनियंत्रण महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक श्री. अरविंद सोनोने, नांदेड जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. रविशंकर चलवदे, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री. अशोक निकम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शनात डॉ. ए. एच. प्रकाश म्‍हणाले की, मध्यम लांबीच्या धाग्याची देशांतर्गत गरज पूर्ण करण्यासाठी आयात करावी लागत आहे. एनएचएच-४४ वाणासारख्या संकरीत वाणांची लागवड झाल्यास आयात करण्याची गरज भासणार नसल्‍याचे सांगितले. डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्हणाले की, एनएचएच-४४ बीटी वाणाचे विद्यापीठाच्या नांदेड प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिकात एकरी दहा क्विंटल उत्पादन प्राप्त झाले असुन विद्यापीठ विकसीत विविध पीकांचे वाण व प्रसारीत तंत्रज्ञान शेतक-यांच्या पसंतीस उतरत आहेत.
आपल्‍या भाषणात श्री. चलवदे यांनी विद्यापीठाच्या वाण व तंत्रज्ञानांमुळे शेतक-यांचा मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्याचे सांगून गुलाबी बोंडअळीचा पुढील वर्षातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतक-यांनी चालु हंगामात कापसाची फरदड घेऊ नये, असे आवाहन केले. चालू हंगामात मराठवाड्यात एनएचएच-४४ या बीटी वाणाची सव्वीस हजार पाकीटे उपलब्ध करुन देण्यात आली होती, येणा-या हंगामात यापेक्षा जास्त पाकीटे उपलब्ध करण्याचे नियोजन महाबीजचे असल्‍याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. बेग शेतक-यांच्या शेतावर एनएचएच-४४ बीटी वाणाच्या उत्पादनात सातत्य आढळून आले असुन संकरीत वाणाचे बीजोत्पादन क्षेत्र नांदेड जिल्ह्रयात वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येण्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अरविंद पांडागळे यांनी केले. कार्यशाळेत गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबद्दल डॉ. शिवाजी तेलंग व ट्रायकोकार्ड निर्मिती बद्दल श्रीमती संगीता सवालाखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषि विद्यापीठ व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने एनएचएच-४४ बीटी संकरीत वाणाच्या प्रात्यक्षिकाचा शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व राज्याच्या विविध भागातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चालू कापूस हंगामात किटकनाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन व प्रथमदर्शनी पीक प्रात्यक्षिके योजनेंतर्गत प्रात्यक्षिकधारक शेतक-यांना निविष्ठा वाटप करण्यात आल्‍या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. दिनेश पाटील, प्रा. अरुण गायकवाड, श्री. शेळके, श्री. शिंदे, श्री. जोगपेटे, श्री. पांचाळ, श्री. कळसकर, श्रीमती सुरेवाड, श्रीमती ताटीकुंडलवाड आदींनी परिश्रम घेतले.