वनामकृवित आयोजित पंधरा दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
रासायनिक निविष्ठांचा वापर करून अन्नधान्य उत्पादनात आपण वाढ करून शकलो, आज शेतीतील खर्च वाढत आहे, परंतु त्या प्रमाणात उत्पन्नात वाढ होत नाही. कृषि विद्यापीठांनी सेंद्रीय खतांसह रासायनिक खतांचा योग्य वापर करण्याची शिफारस केली, परंतु शेतीत सेंद्रीय खतांचा वापर न करता केवळ रासायनिक खतांचा अतिरेकी व अयोग्य वापरामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी झाले आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीकरिता विशेष प्रयत्न करावे लागतील. शेतातील पिकांचे अवशेष जाळुन न टाकता, त्याचे जमिनीतच जागेवर कुचुन चांगले खत तयार होते. सेंद्रीय शेतीत ग्राहकांचा विश्वास संपादन गरजेचे असुन चांगल्या बाजारभावाकरिता सेंद्रीय शेतमालाचे प्रमाणिकरण आवश्यक आहे. शेतकरी गटांचा माध्यमातुन सेंद्रीय शेतमालाची प्रक्रिया, पॅकिंग, ब्रॅडिंग आदींवर भर दयावा लागेल. सेंद्रीय शेतीत जैविक खते, जैविक किटकनाशके, जैविक बुरशीनाशके आदी जैविक निविष्ठांचा वापर करावा लागेल, असे प्रतिपादन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्प व फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २१ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले होते, सदरिल प्रशिक्षणाच्या समारोपा प्रसंगी (९ ऑक्टोबर रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे सदस्य मा डॉ सुनिल मानसिंहका हे उपस्थित होते. संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ नितीन कुरकुरे, भोपाळ येथील केंद्रीयकृषि अभियांत्रिकी संस्थ्ेातील पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ महाराणी दीन, भारतीय कृषि संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ सुभाष बाबु, औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ दिनकर जाधव, प्रगतशील शेतकरी डॉ सुर्यकांतराव देशमुख, मुख्य आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, पशुशक्तीचा योग्य वापर योजनेचे संशोधन अभियंत्या डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. रणजीत चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, सद्यस्थितीत शेतीतील वाढता खर्च, जमिनीची खालवत जाणारी गुणवत्ता व शेतमालास अपेक्षित किमान दर मिळत नसल्यामुळे शेती ही कष्टप्रत होत आहे. शेतीत पशुधन हद्दपार होत आहे. मानवाच्या व पर्यावरणाच्या आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रीय शेतीचे महत्व वाढत आहे. सेंद्रीय शेतीत पशुधनाचे अत्यंत महत्व असुन देशी गोवंश संवर्धन करण्याची गरज आहे. विद्यापीठ आयोजित पंधरा दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेतीवरील प्रशिक्षाणास राज्यातील विविध जिल्हयातील पाच हजार पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी, व शेतकरी बांधव सहभागी होऊन भरभरून प्रतिसाद दिला, यामुळे विद्यापीठाची जबाबदारी वाढली आहे.
प्रमुख पाहुणे मा डॉ सुनिल मानसिंहका आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, शेतकरी बांधवासह मानवाचे आरोग्य शेतीच्या आरोग्यावर अवलंबुन आहे. भारतीय गोवंश व शेतीचे अतुट नाते असुन भाकड गायीचेही महत्व आहे. सेंद्रीय शेतीत पशुधन,जीवजंतु आदींचे अत्यंत महत्व आहे. देशी गोवंशाचे संवर्धन करावे लागेल, पंचगव्यात मनुष्याचे अनेक आजार कमी करण्याची ताकद आहे, असे ते म्हणाले.
यावेळी मार्गदर्शनात डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी करोना रोगाच्या प्रादुर्भावात विद्यापीठ आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणास राज्यातील कान्याकोप-यांतील शेतकरी बांधवानी सहभाग नोंदविला, सेंद्रीय शेतीतील पिक लागवड पासुन ते विक्री व्यवस्थापन आदी विविध विषयांवर देशातील नामांकित कृषि शास्त्रज्ञ, कृषि अधिकारी व धोरणकर्त्यांनी मार्गदर्शन केले, याचा निश्चितच लाभ होणार असल्याचे सांगितले तर डॉ नितीन कुरकुरे यांनी सेंद्रीय शेतीत पशुधनाचे महत्व आपल्या भाषणात अधोरेखित केले. तसेच डॉ महाराणी दीन यांनी सेंद्रीय शेतीत बैलचलित अवजाराचे महत्व सांगितले व डॉ सुभाष बाबु यांनी सेंद्रीय शेतीत एकात्मिक पिक व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. डॉ दिनकर जाधव यांनी सेंद्रीय शेतीचे मॉडेल विकसित करण्याची गरज असल्याचे सांगितले तर प्रगतशील शेतकरी डॉ सुर्यकांतराव देशमुख यांनी सेंद्रीय शेतीची चळवळ सर्वांच्या सहकार्यांने पुढे नेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार संशोधन अभियंत्या डॉ स्मिता सोलंकी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ राहुल रामटेके, डॉ पपिता गौरखेडे, डॉ अनुुुुुुराधा लाड, प्रा ज्योती गायकवाड, डॉ मिनाक्षी पाटील, सुनिल जावळे, श्रीधर पतंगे, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यातील शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.