Saturday, October 3, 2020

सेंद्रीय शेतमालाची विक्री करतांना राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय मानांकनाची माहिती आवश्‍यक ..... डॉ. सुरेश थोरात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर योजना व फार्म टु फोर्क, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पंधरा दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नवव्या सत्रात दिनांक १ ऑक्‍टोबर रोजी सेंद्रीय शेतमाल प्रक्रिया उद्योगावर राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठातील अन्‍नतंत्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. सुरेश थोरात यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी अन्न अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ राजेश क्षीरसागर हे होते तर कोरेगाव (जि. सातारा) येथील विश्‍वकर्मा फुड्स लिमिटेडचे संचालक श्री. संदिप दिक्षीत, लिंबगाव (नांदेड) येथील श्रीकृष्णा ज्युसचे संचालक श्री. आर. पी. कदम, प्रगतशील शेतकरी श्री. जनार्धन आवरगंडआदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य व्याख्याते डॉ. सुरेश थोरात यांनी सेंद्रीय प्रक्रिया उद्योग करतांना आवश्‍यक बाबीवर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय मानांकन नुसारच सेंद्रीय पध्‍दतीने उत्‍पादित शेतमालाची हाताळणी, प्रक्रिया, पॅकींग व लेबलींग करावी. या मानांकनाबाबत संपुर्ण माहिती सेंद्रीय शेती करणा-या शेतकरी बांधवाना आवश्‍यक आहे. यावेळी त्‍यांनी राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय मानांकनाबाबतच्‍या अटी व कायदे या संदर्भात माहिती दिली. श्री. संदिप दिक्षीत यांनी सेंद्रीय शेती उत्पादन व प्रक्रिया उद्योग हे मुल्यवृध्दीसाठी आवश्‍यक असल्‍याचे सांगुन सेंद्रीय उत्पादनांत उपलब्ध असलेल्या प्रथिने, कार्बादके, स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ या विषयी सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात डॉ राजेश क्षीरसागर म्हणाले की, सद्यस्थितीत शेतीत रासायनिक किटकनाशकांचा व खतांचा अतिवापर होत आहे. शेतकरी उत्पादक संघातर्फे एकात्मिक विक्री व्यवथापन व एकात्मिक विपणन व्यवस्थापन करावे, व स्वत:चा एक ब्रॉड तयार करावा असे सांगुन शेतक­यांनी सेंद्रीय शेती कडे वळण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

प्रगतशील शेतकरी श्री. आर. पी. कदम यांनी आपले अनुभव सांगताना म्हणाले की, सेंद्रीय उद्योगामधुन आर्थिकस्थिती सुधारता येते. शेतीला पुरक व्यवसाय म्हणुन सेंद्रीय पदार्थाचे प्रक्रिया करुन विक्री केल्यास नफा जास्त होतो. तर श्री. जनार्धन आवरगंड यांनी आपले अनुभव सांगताना म्हणाले की, सेंद्रीय आंबा, तीळाचे लाडु, सेंद्रीय तुर दाळ, हे सर्व पदार्थ तयार करुन घरपोच पुरवठा केला त्यापासून आर्थिक नफा मोठया प्रमाणात मिळाला. शेणाच्या गौ­या, गोमुत्र तयार करुन योग्‍य प्रकारे पॅकींग करुन स्‍वत: शहरात विक्री केल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

प्रास्ताविक प्रशिक्षणाचे मुख्‍य आयोजक डॉ. आनंद गोरे यांनी तर सुत्रसंचलन डॉ. कैलास गाढे यांनी केले. ऑनलाईन प्रशिक्षणात मोठया संख्येने शेतकरी बंधु भगिनी, शेतकरी युवक, युवती, विद्यार्थी, उद्योजक सहभागी झाले होते.