Monday, October 19, 2020

वनामकृविच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठा पासुन विक्रमी महसुल प्राप्‍त होण्‍याची पहिलीच वेळ ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवि विकसित बॉयोमिक्‍स ची विक्रमी विक्रीआर्थिक वर्षात आजपर्यंत अडीच कोटी पेक्षा जास्त महसुल जमा, राज्‍यातील व परराज्‍यातील हळद उत्‍पादकांमध्‍ये मोठी मागणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील वनस्‍पती रोगशास्‍त्र विभागात विविध पिकांकरिता उपयुक्‍त सुक्ष्‍म बुरशी व जीवाणुंचे मिश्रण असलेले बॉयोमिक्‍सची या आर्थिक वर्षात 2 कोटी 56 लाखाची विक्रमी अशी विक्री झाली. यानिमित्‍त बायोमिक्‍स विक्री लक्षपुर्ती सोहळा व द्रवरूप ट्रायकोडर्मा माऊफंग चे उदघाटन कार्यक्रम दिनांक 19 आक्‍टोबर रोजी संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ सय्यद इस्‍माईल, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ डी एन धुतराज आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, यावर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव व लॉकटाऊन असुनही एप्रिल पासुन आजपर्यंत विद्यापीठ निर्मित बॉयोमिक्‍स 170 मेट्रिक टन अशी विक्रमी विक्री होऊन 2 कोटी 5लाख रूपयाचा महसुल विद्यापीठास प्राप्‍त झाला. विद्यापीठाच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठापासुन विक्रमी महसुल प्रथमच प्राप्‍त झाला आहे. बॉयोमिक्‍स पिक वाढीकरिता वरदान ठरत असुन बॉयोमिक्‍सला शेतकरी बांधवामध्‍ये मोठी मागणी आहे. राज्‍यातुनच नव्‍हे तर परराज्‍यातुनही शेतकरी बांधव लांबच लांब रांगा लावुन बॉयोमिक्‍स खरेदी करतात, ही विद्यापीठावरील दर्जेदार निविष्‍ठांवर असलेला शेतकरी बांधवाचा विश्‍वास आहे. लवकरच बियाणे विक्री प्रमाणे विद्यापीठ विकसित बॉयोमिक्‍स व इतर जैविक उत्‍पादके मराठवाडयातील विविध जिल्‍हयात विक्री करिता उपलब्‍ध करण्‍यात येणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, बॉयोमिक्‍स व इतर विद्यापीठ निविष्‍ठा विक्री करता स्‍वतंत्र ऑनलॉईन पोर्टल लवकरच तयार करण्‍यात येणार असुन शेतकरी बांधवाना निविष्‍ठाची उपलब्‍धता व किंमत यांची माहिती होऊन ऑनलाईन बुकिंगची सुविधा करण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले. तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, विभागात मर्यादित मनुष्‍यबळ असतांनाही पदवी व पदव्‍युत्‍तर शिक्षण, कृषि विस्‍तार व संशोधन कार्यात कोणतीही बाधा येऊ न देता, बॉयोमिक्‍सची विक्रमी निर्मिती व विक्री झाली असुन निश्चितच विभागातील सर्व प्राध्‍यापक व कर्मचारी यांचे योगदान मोठे असल्‍याचे म्‍हणाले

कार्यक्रमा बायोमिक्‍स विक्री लक्षपुर्ती बाबत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते विभाग प्रमुख डॉ कल्‍याण आपेट सह विभागातील कार्यरत प्राध्‍यापक व कर्मचारी यांचा सत्‍कार करण्‍यात आला. तसेच माऊफंग या ट्रायकोडर्मा जैविकांचे द्रवरूप मिश्रणाच्‍या विक्रीचे उदघाटन करण्‍यात आला. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते डॉ चंद्रशेखर अंबाडकर, डॉ कल्‍याण आपेट व डॉ मिनाक्षी पाटील लिखित अळिंबी लागवड तंत्रज्ञान पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ कल्‍याण आपेट म्‍हणाले की, बॉयोमिक्‍साचा वापर गेल्‍या तीन वर्षापासुन शेतकरी बांधव करीत आहेत, विशेषत: हळद पिकात यामुळे चांगली वाढ होतांना दिसत आहे. हे बॉयोमिक्‍स बुरशीजन्‍य रोगांचा प्रतिबंध होण्‍यास उपयुक्‍त असुन झाडांची व रोपाची वाढ चांगली होऊन उत्‍पादन वाढ होत असल्‍यामुळे राज्‍यातील हजारो शेतकरी हे बॉयोमिक्‍स खरेदी करण्‍यात येतात. सुत्रसंचालन डॉ मिनाक्षी पाटील यांनी केले तर आभार डॉ चंद्रशेखर अंबाडकर यांनी मानले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ उदय खोडकेप्राचार्य डॉ अरविंद सावते आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी उपस्थित होते.

वनामकृवि  निर्मीत माऊफंग  : ट्रायकोडर्मा जैविकांचे द्रवरूप  मिश्रण 

माऊफंग हे एक जमिनीतील उपयुक्‍त सुक्ष्‍म बुरशी व जिवाणुंचे अनोखे मिश्रण असुन या मिश्रणामध्‍ये ट्रायकोडर्माच्‍या विविध प्रजाती तसेच सुडोमोनास फ्ल्‍युरोसन्‍स या उपयुक्‍त जीवाणुचा समावेश आहे. माऊफंग मुळे पिकावरील मर, रोपावस्‍थेतील मर, आले व हळदीवरील कंदकुज व पानावरील करपा या रोगांचा बंदोबस्‍त होतो तसेच बियाण्‍यांव्‍दारे उत्‍पन्‍न होणा-या बुरशीजन्‍य रोगांचा प्रतिबंध होण्‍यास या मिश्रणाचा  उपयोग होतो. या मिश्रणाचा उपयोग भाजीपाला पिके, फळपिके, तृणधान्‍य, गळितधान्‍य, कापसु, उस या सारख्‍या पिकांसाठी करता येतो. या मिश्रणाच्‍या वापरामुळे झाडांची व रोपाची वाढ चांगल्‍या प्रकारे होऊन झाड सशक्‍त बनते व उत्‍पादनात वाढ होते. सदरिल मिश्रण बीजप्रक्रियेसाठी तसेच आळवणीसाठी उपयोगात आणता येते. हे मिश्रण बीजप्रक्रियेसाठी वापरावयाचे असल्‍यास 10 मिली प्रति किलो बियाण्‍यास प्रक्रिया करावी व आळवणीसाठी वापरावयाचे असल्‍यास 10 मिली प्रती लिटर पाण्‍यात मिसळुन आळवणी करावीसदरिल  माऊफंग  द्रवरूप  मिश्रण  विद्यापीठात उपलब्‍ध आहे.