Monday, October 5, 2020

हवामान बदलाच्या पार्श्वभुमीवर रेशीम उद्योग फायदेशीर ठरेल... श्री. दिलीप हाके

वनामकृवित आयोजित राज्‍यस्‍तरिय पंधरा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर योजना, आणि फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पंधरा दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण दिनांक 21 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 11 व्या दिवशी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी तुती लागवड व सेंद्रीय रेशीम कोष उत्पादन तंत्रज्ञानया विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी औरंगाबाद विभागीय रेशीम अधिकारी श्री. दिलीप हाके, प्रमुख व्याख्याते म्हणून रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, मौजे कोल्हावाडी (जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. दत्तात्रय भिसे, मौजे दैनापूर (जि. बीड) येथील  प्रगतशील शेतकरी श्री. अरविंद अघाव, मुख्‍य आयोजक डॉ. आनंद गोरे, डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. श्रद्धा धुरगुडे आदींची ऑनलाईन उपस्थिती होतीप्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले आहे. 

अध्‍यक्षीय भाषणात श्री. दिलीप हाके म्हणाले की, रेशीम उद्योगास मोठा इतिहास आहे, आज आपल्याला रेशीम उद्योगाकडे एक नविन दृष्टीने पहावे लागेल. शेतक­यांसमोर आज अनेक समस्या आहेत. ठराविक कालावधीनंतर येणारा दुष्काळ आणि हवामान बदलाच्या पाश्र्वभुमीवर रेशीम उद्योगास मोठी संधी आहे. रेशीम उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि शाश्वत उत्पादन आणि अधिक आर्थिक फायदा असा त्रिवेणी संगम साधता येणे शक्य आहे. रेशीम उद्योगात यश मिळविण्यासाठी आधुनिक पद्धतीने तुती लागवड करणे, रोपांच्या माध्यमातून लागवड करणे, नवीन वाणांचा वापर, कीटक संगोपनासाठी, रेशीम उत्पादनासाठी आधुनिक व स्वयंचलित यंत्रांचा वापर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यात पुढे आहेत. यामुळे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व शासकीय योजना यांचा लाभ घेऊन रेशीम उद्योगांत यशस्वी व्हावे.

प्रमुख व्याख्याते डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी तुती लागवड व सेंद्रीय रेशीम कोष उत्पादन तंत्रज्ञान यावरील मार्गदर्शनात  तुती लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, लागवडीचे अंतर, पॉलीमल्चचा वापर, पॉली आच्छादनांचा वापर, अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. रेशीम कीटक संगोपनामध्ये विविध अवस्थांमध्ये घ्यावयाची काळजी, खाद्य देण्याच्या वेळा, रेशीम उत्पादनात आधुनिक यंत्रांचा वापर, रेशीम कोष बाजारपेठांबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्‍हणाले की, आज तुती लागवड व रेशीम उत्पादनास मोठी संधी असून आधूनिक तुती लागवड तंत्रज्ञान आणि शास्त्रीय पद्धतीने रेशीम कोष उत्पादन घेतल्यास अधिक उत्पादन व अधिक आर्थिक फायदा मिळवता येतो. 

प्रगतशील शेतकरी श्री. दत्तात्रय भिसे यांनी अनुभव सांगतांना म्हणाले की, रेशीम उद्योगातून शाश्वत उत्पादन मिळवता येते व आर्थिक फायदा मिळविता येतो तर श्री. अरविंद अघाव यांनी सांगितले की, रेशीम उत्पादनातून आर्थिक स्वावलंबन प्राप्त करता येते. रेशीम शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पट्टा पद्धतीने कमी पाण्यातही रेशीम शेती करता येते आणि यशस्वी होता येते. तरी शेतकरी बंधू भगिनी यांनी रेशीम शेतीकडे वळावे.

सुत्रसंचलन डॉ. मिनाक्षी पाटील यांनी केले तर आभार डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सुनिल जावळे, श्री. श्रीधर पतंगे, श्री. योगेश थोरवट यांनी परिश्रम घेतले. सदरील प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.