Wednesday, February 24, 2021

वनामकृवि शास्‍त्रज्ञ डॉ कल्‍याण आपेट यांचा वनस्‍पती रोगशास्‍त्र संस्‍थेच्‍या वतीने सन्‍मान

बॉयोमिक्‍सने विद्यापीठास वेगळी ओळख प्राप्‍त करून दिली आहे ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषी महाविद्यालयातील वनस्‍पती रोगशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख तथा शास्‍त्रज्ञ डॉ कल्‍याण आपेट यांना भारतीय वनस्‍पती रोगशास्‍त्र संस्‍था, नवी दिल्‍ली व अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वनस्‍पती रोगशास्‍त्रज्ञ संस्‍थेच्‍या वतीने वनस्‍पती रोग शास्‍त्रात केलेल्‍या उत्‍कृष्‍ट कार्याबद्दल दिनांक 24 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र देऊन गौरविण्‍यात आले. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, तर ऑनलाईन माध्‍यमातुन संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ बी टी राऊत, सचिव डॉ आर एम गाडे, डॉ के डी ठाकुर, डॉ ए पी सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ कल्‍याण आपेट यांच्‍या बाबत गौरवोदगार काढतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, डॉ कल्‍याण आपेट व त्‍यांचे सहकारी यांच्‍या अविरत परिश्रमामुळे विद्यापीठ निर्मित बॉयोमिक्‍स या जैविक मिश्रणाचा शेतकरी बांधवामध्‍ये मोठया प्रमाणात प्रसार झाला. विद्यापीठाच्‍या इतिहासात प्रथमच एका आर्थिक वर्षात एका कृ‍षी निविष्‍ठापासुन अडीच कोटी पेक्षा जास्‍त महसुल प्राप्‍त झाला असुन कींबहुना देशातील कृषी विद्यापीठातही बियाणे व्‍यतिरिक्‍त एवढा महसुल कोणत्‍याच कृषी निविष्‍ठापासुन प्राप्‍त झाला नसेल. आज बॉयोमिक्‍सने विद्यापीठास वेगळी ओळख प्राप्‍त करून दिली आहे. डॉ आपेट यांचे कार्य कृ‍षी शास्‍त्रज्ञा करिता प्रेरणादायी  आहे. करोना रोगाच्‍याप्रादुर्भावात व लॉकडाऊन परिस्थितीही मोठया प्रमाणात मराठवाडयातीलच नव्‍हे तर इतर राज्‍यातील शेतकरी बांधवानी बॉयोमिक्‍सचा वापर केला.

डॉ कल्‍याण आपेट हे गेल्‍या तीन वर्षापासुन वनस्‍पती रोगशास्‍त्र विभागात संशोधनाच्‍या माध्‍यमातुन बॉयामिक्‍सची निर्मिती करीत असुन बॉयामिक्‍स हे उपयुक्‍त सुक्ष्‍मजीवांचे मिश्रण आहे. हे एक चांगले जैविक किडनाशक व रोगनाशक म्‍हणुन विविध पिकांवर कार्य करते. याचा शेतकरी फळे, भाजीपाला, हळद आदी पिकांत मोठया प्रमाणात करित आहे. यामुळे पिकांची निरोगी वाढ होते,  तसेच पिकांचे रोग व किडींपासुन संरक्षण होऊन पिक उत्‍पादनात चांगली वाढ नोंदवली गेली आहे.

सदरिल ऑनलाईन पुरस्‍कार वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ योगेश इंगळे यांनी केले. यावेळी डॉ के डी नवगिरे, डॉ विक्रम घोळवे, डॉ महेश दडके, डॉ मिनाक्षी पाटील, डॉ सी व्‍ही अंबाडकर, डॉ संतोष पवार आदींसह संस्‍थेचे सदस्‍य ऑनलाईन माध्‍यमातुन उपस्थित होते.