Wednesday, June 9, 2021

अंबेजोगाई येथील सिताफळ संशोधन केंद्रात दर्जेदार सिताफळाच्‍या विविध सुधारित वाणांची कलमे विक्री करिता उपलब्‍ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अंबेजोगाई (जिल्हा बीड) येथील असलेल्या सीताफळ संशोधन केंद्रात कुलगुरु मा डॉ अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिताफळाच्या विविध वाणाचे दर्जेदार कलम व रोपे तयार करण्‍यात आली असुन शेतक-यांकरिता विक्री करिता उपलब्ध आहेत.  सिताफळाच्‍या सुधारीत वाण धारुर-६, बालानगरी, टिपी-७ व रामफळ, हनुमान फळ आदींची कलमे विक्रीकरिता उपलब्‍ध असुन कलमांचा दर प्रती कलम रु. ४० प्रमाणे आहे, अशी माहिती संशोधन केंद्र प्रमुख डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली.

सिताफळ हे फळ म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे, त्यास आधुनिक कल्पवृक्ष संबोधण्यास वावगे ठरणार नाही. सिताफळ वाण निवडताना तो वाण कीड व रोगास बळी पडणाऱ्या वाणांची निवड करावी, सिताफळ हे एक शाश्वत फळपीक म्हणून पुढे येत असुन सिताफळ लागवड शास्त्रीयदृष्ट्या होणे गरजे आहे. सदरिल संशोधन केंद्राने निर्मीत केलेल्या विविध वाणांची लागवड खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात मोठया प्रमाणात झाली असुन तामिळनाडु व मध्यप्रदेशातील शेतक-यांमध्‍येही मोठया प्रमाणात रोपांची मागणी होते. सिताफळातील विविध वाणातील धारुर-६ या वाणास मोठी मागणी असुन याचे वैशिष्टय म्हणजे फळाचा आकार मोठा असुन वजन ४०० ग्राम पेक्षा जास्त आहे तर साखरेचे प्रमाणे १८ टक्के व घनदृव्याचे प्रमाण २४ टक्के असल्यामूळे प्रक्रीया उद्योगामध्ये याची मागणी मोठी आहे. फळप्रक्रिया उद्योगासाठी धारूर-६  या वाणाचा गर अत्यंत उपयुक्त आहे व तो उणे २० डिग्री सेंटीग्रेड तापमानात सहा महिने जशाचा तसा टिकून राहतो. प्रक्रिया उद्योगात बालानगर या फळांचीही मागणी असते. सिताफळाच्या गराचा मिल्कशेक, रबडी, आईक्रीममध्ये मोठया प्रमाणात वापर होत असुन गराची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ  गोविंद मुंडे यांनी दिली असुन रोपांसाठी डॉ गोविंद मुंडे यांच्‍याशी संपर्क करावा, मोबाईल क्रमांक ८२७५०७२७९२.