Friday, March 24, 2023

कृषि तंत्रज्ञानापासुन आदिवासी शेतकरीही वंचित राहु नये ..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

भरडधान्‍य उत्‍पादन व मुल्‍यवर्धन यावर आदिवासी बहुल मौजे वाळक्‍याची वाडी (ता. हिमायतनगर जि. नांदेड) येथे प्रशिक्षण संपन्‍न

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्राच्‍या वतीने आदिवासी बहुल गाव मौजे वाळक्‍याची वाडी (ता. हिमायतनगर जि. नांदेड) येथे आदिवासी उपयोजने अंतर्गत दिनांक २३ मार्च रोजी “भरडधान्याचे उत्पादन आणि मुल्यवर्धन” या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. सदर प्रशिक्षणाच्‍या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि हे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, संशोधन उपसंचालक डॉ. गजेंद्र लोंढे, तालुका कृषि अधिकारी (हिमायतनगर) श्री. डी. व्ही. जाधव, तहसीलदार (हिमायतनगर) श्री. डी. एन. गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्यक्षीय भाषणात मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ कृषि तंत्रज्ञान विविध माध्‍यमातुन जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता कटिबध्‍द असुन मराठवाडयातील आदिवासी शेतकरीही वंचित राहु नये याकरिता प्रयत्‍नशील आहे. ग्रामीण भागात कृषि आधारित विविध प्रक्रिया उद्योग सुरू करण्‍यास मोठा वाव असुन ग्रामीण भागातील युवकांनी कृषि उद्योजकतेकडे वळावे, यातुन आर्थिक आत्मनिर्भर प्राप्‍त केली जाऊ शकते. ग्रामीण युवकांत कृषि उद्योजकता वाढीकरिता कौशल्‍य विकास कार्यक्रम विद्यापीठ राबवित असुन याकरिता कृषि विभाग व महसुल विभाग यांचे सहकार्य घेण्‍यात येत आहे. याकरिता सर्वांनी एकञीत काम करणे गरजेचे आहे. हे वर्ष आतंरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्ष असुन परभणी विद्यापीठ विकसित अधिक लोह व जस्‍ताचे प्रमाण असलेल्‍या ज्‍वारीचा वाण परभणी शक्‍ती याचे बियाणे येणा-या खरीप हंगामामध्ये वाटप करण्‍यात येईल. या वाणाच्‍या ज्‍वारीचा उपयोग आहार केल्‍यास आदिवासी भागातील मुलांतील व महिलातील रक्‍तातील लोह वाढीस मदत होईल.

डॉ. देवराव देवसरकर यांनी शेतक-यांना विद्यापीठ शिफारसीत कृषि तंञज्ञानाची माहिती देऊन आदिवासी शेतकरी बांधवांनी विद्यापीठ आयोजित विविध शेतकरी मेळावे व प्रशिक्षणास वेळोवेळी उपस्थित राहण्‍याचे आवाहन केले. डॉ. गजेंद्र लोंढे यांनी शेतक-यांना वाटप केलेल्या अवजारांचा सयोग्य वापर करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी आदिवासी उपयोजनेंतर्गत विद्यापीठाच्‍या वतीने ज्वारीवर आधारीत विविध प्रक्रिया यंञाचे व कृषि अवजारे गावातील शेतकरी बांधवाना उपयोगाकरिता ग्रामपंचायतीस हस्‍तांतरीत करण्‍यात आले, याचे लोकापर्ण कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ज्‍वार लागवड घडीपत्रिकेचे विमोचन करण्‍यात आले. येणा-या खरीप हंगामात निवडक शंभर आदिवासी शेतकरी बांधवांना विद्यापीठ विकसित ज्‍वारीचे वाण परभणी शक्‍ती यांच्‍या बियाण्‍याचे वाटप करण्‍यात येणार आहे. 

प्रशिक्षणात “भरडधान्याचे उत्पादन आणि मुल्यवर्धन” या विषयावर डॉ. आर. बी. क्षीरसागर, डॉ. मोहम्मद ईलियास, डॉ. के. डी. नवगीरेडॉ. एल. एन. जावळे, श्रीमती प्रितम भुतडा आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एल. एन. जावळे यांनी केले. सुञसंचलन श्रीमती प्रितम भुतडा यांनी केले तर आभार डॉ. के. डी. नवगीरे यांनी मानले.  कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता तलाठी श्री. डी. एस. मेतलवाड, सरपंच श्रीमती सोनाबाई रामचंद्र चेलार, उपसरपंच श्री. एस. एस. मादलकर, ज्वार संशोधन केंद्राचे श्री. डी. अे. पांचाळ, , श्री. माणिक जोंधळे, श्री मोसीन आदींनी प्रयत्न केले. प्रशिक्षणास आदिवासी शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.