Tuesday, March 28, 2023

वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणास सुरूवात

शेतीतील विविध निविष्‍ठांचा पुर्नवापर करण्‍याची क्षमता सेंद्रीय शेतीत असुन सेंद्रीय शेती पर्यावरण अनुकूल व जैव विविधता राखु शकणारी शेती आहे. पिक लागवडी पासुन ते शेतमाल विपणनापर्यंत सेंद्रीय शेतीत अनेक समस्‍या आहेत, यावर शेतकरी बचत गट, गट शेती व शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याच्‍या माध्‍यमातुन मात करू शकतो. सेंद्रीय शेतीचे तंत्र शिकण्‍याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील भाकृअप - भारतीय एकात्मिक शेती पध्दती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुनिल कुमार यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने राज्‍यस्‍तरीय तीन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक २७ मार्च ते २९ मार्च दरम्‍यान ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने आयोजन करण्‍यात आले असुन सदर प्रशिक्षणाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर व्‍यासपीठावर कृषि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे माजी उपायुक्‍त तथा नागपुर येथील प्रादेशिक जैविक शेती केंद्राचे माजी प्रादेशिक संचालक डॉ. ध्रुवेंद्र कुमार, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर,  शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखलेप्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, कृषि उपसंचालक श्री. बळीराम कच्छवेप्रगतशील शेतकरी श्री. सोपानराव अवचार, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, निबंधक विनायक शिराळे, मुख्‍य आयोजक मुख्‍य अन्‍वेषक डॉ आनंद गोरे  आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी प्रशिक्षण कार्यक्रमास शुभेच्‍छा दिल्‍या तर डॉ. ध्रुवेंद्र कुमार यांनी सेंद्रीय शेती व एकात्मिक शेती यावर मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीच्‍या अनेक पध्‍दती आहेत. भाजीपाला व फळबागेत मोठया प्रमाणात रासायनिक किटकनाशकांचा वापर केला जात आहे, यामुळे मानवास विविध शारिरीक व्‍याधी होत आहेत. आरोग्‍याबाबत ग्राहक जागरूक होत आहे, सेंद्रीय शेतमाल विक्री करिता सक्षम ग्राहक ओळखुन विक्रि करावी लागेल. विषमुक्‍त शेतीकरून तणावमुक्‍त शेतकरी झाला पाहिजे.

प्राचार्य डॉ सय्यद इस्‍माईल यांनी सेंद्रीय शेती करण्‍या आधी ज्ञान प्राप्‍त करणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. तर प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार यांनी विद्यापीठात सेंद्रीय शेती संशोधनामुळे शास्‍त्रीय व अधिकृत माहिती प्राप्‍त होईल अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

प्रास्‍ताविकात डॉ आनंद गोरे यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ प्रविण कापसे यांनी मानले. तांत्रिक सत्रात सेंद्रीय शेतीचे महत्‍व व प्रश्‍न यावर डॉ ध्रुवेन्‍द्र कुमार यांनी मार्गदर्शन केले, तर भरड धान्‍य पोषणमुल्‍य व उपयुक्‍तता यावर डॉ दीप्‍ती पाटगावकर यांनी, सेंद्रीय शेतीत फळपिक लागवड यावर डॉ संजय पाटील, सेंद्रीय शेतीत भाजीपाला लागवडीवर डॉ श्रीधर दिसले आणि सेंद्रीय शेतीत पिक लागवडीवर डॉ आनंद गोरे यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणास मराठवाडा विभागातील शेतकरी बंधु भगिनीकृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञकृषि शास्त्रज्ञविद्यार्थीकृषि विभागाचे अधिकारीकर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य सहभागी झाले असुन प्रशिक्षणाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल https://www.youtube.com/@VNMKV वर करण्‍यात येत आहे.