Thursday, April 6, 2023

पूर्व-प्राथमिक शाळेचे राष्ट्र निर्माणात मोठे योगदान ..... कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि

वनामकृविच्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचा ११ वा दीक्षांत समारंभात प्रतिपादन

बालकांच्या सर्वांगीण विकासात पूर्व प्राथमिक शिक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व असून या शाळांचे राष्ट्र निर्माणात मोठे योगदान असल्याचे मत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्गत असलेल्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागात असलेल्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचा ११ व्या कॉन्व्होकेशन दीक्षांत समारंभाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले तर व्‍यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत होत असल्याने त्यांचा लाभ विदयार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी निश्चीतपणे होत आहे. या शाळेला ४० वर्षापेक्षाही अधिक वैभवशाली इतिहास असून याकरिता अद्यापपर्यंत अनेकांनी योगदान दिले आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवत तो अधिक उंचावण्यासाठी सध्‍या प्राध्यापक व शिक्षक प्रयत्न करत असल्याने त्यांचेही त्यांनी कौतूक केले.

मार्गदर्शनात डॉ. धर्मराज गोखले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन बालकांच्या विकासाकरिता पूरक वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी पालक, शिक्षक व समाजाची असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ जया बंगाळे यांनी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत बालकांच्या सर्वांगीण विकास घडवत असतांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांच्या पायाभूत साक्षरतेवर अधिक भर देत असल्याने पालकांकडून या शाळेला मुलांच्‍या प्रवेशाकरिता मोठी मागणी असल्याचे सांगितले.

समारोहात ब्रिज सेक्शनचे विद्यार्थी अन्वी हिंगे, स्वरुपा भातलवंडे, इशिता शिंदे, नित्यायनी तिवारी, राजवीर सोंळके यांनी शाळेविषयी त्यांच्या असणाऱ्या ह्रदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या. समारोहात प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेमधून पूर्व प्राथमिक शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या एकूण ३० विद्यार्थ्यांना मान्यवरांनी प्रशस्तीपत्रे प्रदान केली. कार्यक्रमात नुकतेच प्रशिक्षणासाठी थायलंड येथे जाऊन आलेल्या डॉ. वीणा भालेराव आणि पदव्युत्तर विद्यार्थीनी सुषमा माने यांचे देखील मा. कुलगुरू यांच्या हस्ते  सन्मान करण्यात आलला. समारोहाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नीता गायकवाड व प्रियंका स्वामी तसेच या शाळेच्या शिक्षिका व मदतनीस, महाविद्यालयातील कर्मचारी, पदव्युत्तर व पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. समारोहाचे सुत्र संचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी,पालक, प्राध्यापक व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.