Tuesday, April 25, 2023

वनामकृवित आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक बडिगन्नावार यांचे व्‍याख्‍यान संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वनस्‍पतीशास्‍त्र विभागाच्‍या वतीने दिनांक २४ एप्रिल रोजी अन्न व पोषण सुरक्षेत भरड धान्याची भुमिका या विषयावर भाभा अणुसंशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक बडिगन्नावार यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, विभाग प्रमुख डॉ हिराकांत काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. अशोक बडिगन्नावार म्‍हणाले की, भरड धान्‍य पिके ही बदलत्‍या हवामानात तग धरणारी पिके असुन मानवी आरोग्‍यकरिता भरड धान्‍य उपयुक्‍त आहेत. भरड धान्‍याचा आहारात उपयोग केल्‍यास जीवनशैलीशी निगडीत अनेक शारिरीक व्‍याधीपासुन आपण लांब राहु शकतो.

याप्रसंगी डॉ अशोक बडिगन्‍नावार यांनी विभागातील पदव्युत्‍तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्‍यांच्या विविध संशोधन प्रयोग प्रक्षेत्रास आणि कृषि वनस्पतीशास्त्र व भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणा­या प्रकल्‍प उत्परिवर्तनाद्वारे पिवळी ज्वारीच्या व रब्बी ज्वारीच्या उच्च उत्पादन व गुणवत्तामध्ये बदल घडविण्यासाठीच्या प्रयोगांना भेट देऊन उत्परिवर्तनाबाबत विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच भाभा अणुसंशोधन केंद्र येथे नौकरीच्‍या संधी बाबत  माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तावीक विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांनी केले तर सुत्रसंचालन  डॉ. अंबिका मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ. राजेश धुतमल, डॉ. दिलीप झाटे, डॉ. अंबिका मोरे, डॉ. जयकुमार देशमुख आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमास विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.