Friday, April 14, 2023

वनामकृवित भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्‍साहात साजरी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती दिनांक १४ एप्रिल रोजी साजरी करण्‍यात आली. यावेळी भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, विद्यापीठ उपअभियंता डॉ दयानदं टेकाळे, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त शुभेच्‍छा देतांना म्‍हणाले की, डॉ बाबासाहेब यांचे जीवन मोठे संघर्षमय होते, त्‍यांनी कठीन परिश्रमाव्‍दारे अध्‍ययन करून जगातील ज्ञान प्राप्‍त केले. ते एक ज्ञानी पुरूष, विकास पुरूष व शिक्षण पुरूष होते. त्‍यांचे विचार आजही जीवंत आहेत. त्‍यांनी दाखविलेल्‍या मार्गाचा अवलंब केल्‍यास देशाचा विकास होईल, विद्यार्थ्‍यांनी त्‍यांच्‍या चरित्रांचे व विचारांचे मंथन केले पाहिजे, त्‍यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, जीवनात यशस्‍वी होण्‍याकरिता दुरदृष्‍टी ठेऊन विद्यार्थ्‍यांनी कठोर परिश्रम केले पाहिजे. समाज बांधणी मध्‍ये आपले योगदान दिले पाहिजे, असा सल्‍ला देवुन त्‍यांनी जयंती निमित्‍त विद्यार्थ्‍यांनी राबविलेल्‍या सतत अठरा तास अभ्‍यास उपक्रमाचे कौतुक केले. 

यावेळी विद्यापीठाच्‍या वतीने ढोलताश्‍याच्‍या गजरात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेची मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.