Saturday, June 7, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा आचार्य एन.जी. रंगा कृषि विद्यापीठातील अत्याधुनिक APSARA संशोधन केंद्राला अभ्यास दौरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आंध्र प्रदेशातील लाम, गुंटूर येथील आचार्य एन.जी. रंगा कृषि विद्यापीठाच्या "APSARA - एपी सेन्सर्स आणि स्मार्ट अनुप्रयोगांवरील संशोधन" (AP Sensors and Smart Applications Research in Agriculture) या अत्याधुनिक संशोधन केंद्राला दिनांक ७ जून रोजी अभ्यास भेट दिली.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी आंध्र प्रदेश राज्यात आधुनिक सेन्सर्स आणि तंत्रज्ञानाधारित प्रणालींचा कृषी क्षेत्रात होणारा वापर – विशेषतः पिकांचे निरीक्षण, अचूक मोजमाप व डेटा संकलन – यावरील सविस्तर माहिती घेतली. या प्रणालींचा उपयोग शाश्वत आणि अचूक कृषी संशोधनासाठी होत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

या दौऱ्यात त्यांच्यासोबत यूएएस रायचूरचे कृषि अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेश्वर बाबू, जवाहरलाल नेहरू कृषि विद्यापीठ, जबलपूर येथील प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. अतुल श्रीवास्तव, क्रीडा (CRIDA), हैदराबादचे प्रमुख शास्त्रज्ञ व विभागप्रमुख डॉ. के. श्रीनिवास रेड्डी आणि डॉ. आय. श्रीनिवास आदी मान्यवरांचा समावेश होता.

सदर दौऱ्यात APSARA केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषि अभियांत्रिकी) डॉ. ए. संबैय्या व त्यांच्या संशोधन टीमने ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले. विविध पिकांवरील ड्रोनद्वारे फवारणी, नकाशांकन व अचूक पद्धतीने माहिती संकलनाच्या बाबतीत केंद्राने केलेल्या नवोन्मेषी प्रयोगांवर समाधान व्यक्त करण्यात आले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राष्ट्रीय स्तरावरील ड्रोन मार्गदर्शक तत्त्व व मानक कार्यपद्धती (SOP) समित्यांचे अध्यक्ष असून, त्यांनी एपी सेन्सर्स आणि स्मार्ट अनुप्रयोगांवरील संशोधन (APSARA) केंद्रास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नाहेप (NAHEP) प्रकल्पाअंतर्गत कार्यरत ड्रोन केंद्रासोबत सामायिक संशोधन उपक्रम व संयुक्त कार्यशाळा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला.

हा दौरा दोन्ही विद्यापीठांमधील परस्पर सहकार्य, नवतंत्रज्ञान प्रसार आणि आधुनिक कृषि संशोधनातील नवकल्पनांच्या आदानप्रदानासाठी महत्त्वाचा ठरला आहे.