जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व
तंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिनांक ५ जून
रोजी "प्लास्टिक मुक्त परिसर अभियान" उत्साहात आणि प्रेरणादायी
वातावरणात राबविण्यात आले. या अभियानाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना डॉ. राहुल रामटेके यांनी सांगितले की, प्लास्टिक
प्रदूषणाची जाणीव केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता, प्रत्येक
नागरिकाने दररोजच्या जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणं गरजेचं आहे. त्यांनी सर्व
विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी
दिनांक ५ जून ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विविध पर्यावरण जाणीवजागृती उपक्रम
आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. "प्लास्टिक प्रदूषण अंत करा"
या घोषवाक्याला अनुसरून पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा,
फोटोग्राफी स्पर्धा, तसेच शैक्षणिक जनजागृती
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी
तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण
परिसर स्वच्छ ठेवण्याचा आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त
केला.