कृषी संशोधन व नैसर्गिक शेतीच्या विस्तारासाठी महत्त्वाचे पाऊल
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि सगुना रुरल फाउंडेशन,
नेरळ (ता. कर्जत, जि. रायगड) यांच्यात दिनांक ३० मे रोजी
सामंजस्य
करार करण्यात आला. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दोन्ही संस्थांनी परस्पर सहकार्याने
शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या करारावर विद्यापीठातर्फे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि सगुना रुरल
फाउंडेशनचे संस्थापक श्री चंद्रशेखर भडसावळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी
विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक डॉ. हरिहर कौसडीकर आणि डॉ. मदन पेंडके उपस्थित होते.
सगुना रुरल फाउंडेशन ही संस्था नैसर्गिक शेतीमध्ये नवोन्मेषी प्रयोगांसाठी
देशभरात ओळखली जाते. यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सगुना फार्म येथे
प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. हे प्रशिक्षण पदव्युत्तर तसेच
आचार्य पदवीच्या संशोधनासाठी उपयुक्त ठरणार असून, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सुद्धा
सगुना फार्मला भेटी देऊन विविध संशोधन उपक्रमांत सहभाग घेतील.
सहकार्याच्या या उपक्रमांतून संयुक्त संशोधन प्रकल्प तयार करून त्यांना
बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी सादर करण्यात येणार आहे.
त्यामुळे कृषी संशोधन आणि शेती क्षेत्रात नव्या संधी निर्माण होण्यास हातभार
लागेल.
कार्यक्रमात श्री. शेखर भडसावळे यांनी सगुना फार्मच्या कार्याचा सविस्तर
आढावा सादर केला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मदन पेंडके यांनी केले.