Wednesday, June 17, 2020

वनामकृविचे माननीय कुलगुरू शेतक-यांच्‍या बांधावर

मौजे सोन्‍ना येथे बीबीएफ तंत्रज्ञानाच्‍या प्रसाराकरिता वनामकृवि व कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने शेतक-यांच्‍या शेतात प्रात्‍यक्षिके



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व पोकरा प्रकल्‍प, कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने परभणी तालुक्‍यातील मौजे सोन्‍ना येथील शेतक-यांच्‍या शेतात रूंद वरंबा व सरी (बीबीएफ) पध्‍दतीने सोयाबीनची पेरणीचे प्रात्‍यक्षिक कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थित दिनांक 17 जुन रोजी घेण्‍यात आले. कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ संतोष आळसे, कृषिविद्यावेत्‍ता डॉ उदय आळसे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, कृषि अभियंता डॉ स्मिता सोळंकी, उपविभागीय कृषी अधिकारी श्री सागर खटकाळे, डॉ संजीव बंटेवाड, तालुका कृषि अधिकारी श्री पी बी बनसावडे, डॉ राहुल रामटेके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयातील बहुतांश शेती ही कोरडवाहु असुन सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र वाढत आहे. बदलत्‍या हवामानात कधी अधिक पाऊस तर कधी पाऊसाचा मोठा खंड पडतो, यामुळे सोयाबीन उत्‍पादनावर मोठा परिणाम होतो. याकरिता रूंद वरंबा व सरी पध्‍दतीने सोयाबीनची पेरणी केली तर अधिकचे पडणारे पाऊसाचे पाणी सरीतुन वाहुन जाते तसेच कमी पाऊसात पडलेले पाणी कार्यक्षमरित्‍या पिकांस उपलब्‍ध होते. परभणी कृषि विद्यापीठाने पाच फणी रूंद सरी वरंबा बी खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्र विकसित केले असुन सदरिल यंत्र शेतक-यांना उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने व्‍यावसायिकरित्‍या तयार करण्‍याचे अधिकार पुणे येथील रोहित कृषि इंडस्ट्रिज यांच्‍या सोबत सामंजस्‍य करार करण्‍यात आला आहे. या यंत्राच्‍या सहाय्याने पेरणी, तणनाशक व किडकनाशक फवारणी, रासणी सर्व कामे करणे शक्‍य आहे. येणा-या काळात हे यंत्र सर्वत्र उपलब्‍ध होऊन जास्‍तीत जास्‍त सोयाबीन पेरणी झाल्‍यास निश्चितच शेतक-यांचे सोयाबीन उत्‍पादनात भरीव वाढ होण्‍यास मदत होईल.   

जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकरी डॉ संतोष आळसे म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाच्‍या माध्‍यमातुन उपलब्‍ध झालेल्‍या बीबीएफ यंत्राने यावर्षी प्रायोगिकतत्‍वावर जिल्‍हयातील पोकरा प्रकल्‍पांतर्गत निवडक गावात शेतक-यांच्‍या शेतावर पेरणी करण्‍यात येणार आहे. शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातुन हे बीबीएफ यंत्र खरेदी केल्‍यास निश्चितच मोठा प्रमाणात शेतक-यांचा फायदा होईल, याकरिता कृषि विभागातील योजनाचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले.

यावेळी विद्यापीठ कृषि अभियंता डॉ स्मिता सोळंकी यांनी विद्यापीठ विकसित पाच फणी रूंद सरी वरंबा बीबीएफ पेरणी यंत्राची जोडणी कशी करावी, यंत्राने तणनाशक फवारणी, पेरणी, व रासणी करण्‍याचे मार्गदर्शन करून प्रात्‍यक्षिक शेतकरी राम गमे यांच्‍या पाच एकर शेतावर दाखविले. मौजे सोन्‍ना येथील काही निवडक शेतक-यांच्‍या 30 एकर जमिनीवर कृषि विभागाच्‍या मदतीने पेरणी करण्‍यात येणार आहे. प्रात्‍यक्षिक पाहणी करिता गावातील शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के एम जाधव यांनी केले तर आभार एम बी बनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सर्व तालुका कृषि अधिकारी, दिपक नागुरे, कृष्‍णा पाटिल आदीसह कृषि विभाग व कृषि विद्यापीठातील अधिकारी यांनी परिश्रम घेतले.




हवामान बदलानुरूप शेती तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ....... डॉ एस भास्कर


सद्यस्थितीतील कोरडवाहू शेती बदलत्‍या हवामानास अनुकूल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून त्याद्वारे उत्पादनात वाढ करता येते. संपूर्ण देशात आधुनिक कोरडवाहू तंत्रज्ञान विकसित केलेले आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ एस. भास्कर यांनी केले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प अंतर्गत कार्यक्रम दिनांक 11 ते 15 जून  दरम्‍यान आयोजित हवामान बदलानुरूप पर्जन्य आधारित शेती या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था,  हैदराबाद संचालक डॉ. जी  रवींद्र चारी हे होते. शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी विकसित कोरडवाहू तंत्रज्ञानाचा आढावा घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहन केले. तर डॉ. जी रवींद्र चारी यांनी पावसाच्या पाण्याचे संधारण तसेच पुनर्वापर आणि कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन केले.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ भगवान आसेवार व कृषी अभियंता डॉ मदन पेंडके यांनी केले होते. प्रशिक्षण कार्यक्रमात ऑस्ट्रेलिया, मलेशिया, नायजेरिया, नेपाळ, म्यानमार, अल्जेरिया आदीसह देशातील 452 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला. प्रशिक्षणात देशातील नामवंत संस्थेतील शास्त्रज्ञ व संशोधक डॉ रवी पाटील, डॉ चीन्नामूथु, डॉ गोपीनाथ, डॉ के व्ही राव, डॉ मुदलागिरीआप्पा, डॉ उदय खोडके, डॉ सय्यद इस्माईल, डॉ मदन पेंडके, डॉ भगवान आसेवार, डॉ विजय कोळेकर आदींनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ दि.11 जून रोजी राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक दलवाई आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ ए. के व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमात डॉ उदय खोडके यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तर नाहेप प्रकल्पाचे मुख्य अन्‍वेषक डॉ गोपाळ शिंदे यांनी प्रकल्पाच्या कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ भगवान आसेवार यांनी केले तर आभार डॉ मदन पेंडके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अनिकेत वाईकर,  इंजि.सचिन कराड, डॉ स्वाती मुंडे, इंजि.अपूर्वा वाईकर आदींनी परिश्रम घेतले.

Monday, June 15, 2020

वनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भावाचा कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील राष्‍ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षणाचा समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय कृषि अनुसंधान परिषद व जागतिक बॅक पुरस्‍कृत राष्‍ट्रीय कृषि उच्‍च  शिक्षण  प्रकल्‍प नाहेप वतीने दिनांक 9 ते 13 जुन दरम्‍यान एक आठवडयाचे ऑनलाईन राष्‍ट्रीय प्रशिक्षण वर्गाचेू आयोजन करण्‍यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप दिनांक 13 जुन झाला, या कार्यक्रमास अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते, तर जयपुर येथील राष्‍ट्रीय कृषि विपणन संस्‍थेचे संचालक उॉ चंद्रशेखर, मुंबई येथील मनोचिकीत्‍सक डॉ राजेंद्र बर्वे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आदींचा प्रमुख सहभाग होता.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, सद्याच्‍या कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावाच्‍या परिस्थितीत डिजीटल व्‍यासपीठाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठ शेतकरी, विद्यार्थ्‍यी, संशोधक आदीपर्यत पोहचत आहे. शेतक-यांपर्यंत उपयुक्‍त कृषि तंत्रज्ञान योग्‍य वेळी व प्रभावीपणे पोहचविण्‍यासाठी याचा करावा, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

मार्गदर्शनात डॉ चंद्रशेखर यांनी कोरोना विषाणु रोगाच्‍या काळात शेतक-यांनी करिता गटशेतीच्‍या माध्‍यमातुन डिजीटल अॅपचा वापर करून थेट ग्राहकांशी संपर्क साधुन शेतमाल विक्री  करावा, असा सल्‍ला दिला

प्रशिक्षण वर्गाच्‍या उदघाटनप्रसंगी भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेचे उपसंचालक पदश्री मा डॉ रमण गंगाखेडकर , एमजीएम आरोग्‍य विज्ञान संस्‍थेचे कुलगुरू मा डॉ शशांक दळवीआयआयटी पवईचे विभागप्रमुख डॉ सतीश अग्निहोत्रीप्रसिध्‍द वैद्यकिय तज्ञ डॉ रामेश्‍वर नाईक, डॉ किरण सगर, डॉ आनंद देशपांडे,  डॉ आशा आर्या, डॉ लिना बडगुजर, डॉ सुजा कोशी, डॉ राजेंद्र बर्वे आदींनी मार्गदर्शन केले.

समारोपीय कार्यक्रमात निवड प्रशिक्षणार्थी शैलेंद्र कटके, डॉ प्रेरण धुमाळ, डॉ स्मिता देशमुख, अशु कर्ण आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त करून प्रशिक्षणातील मार्गदर्शनाचा निश्चितच लाभ होईल अशी अपेक्षा व्‍यक्‍त केलीप्रशिक्षण वर्गात नेपाळ, पाकिस्‍तान, जपान आदीसह देशातुनही देशातील 25 राज्‍यातुन 450 कृषिचे विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सचिव डॉ वीणा भालेराव, प्रा संजय पवार, डॉ मेघा जगताप आदींनी केले तर   तांत्रिक सहाय्य डॉ अविनाश काकडे, डॉ रश्‍मी बंगाले, शैलेश शिंदे आदी केले.

Saturday, June 13, 2020

यू ट्यूब लाईव्ह द्वारे वनामकृवि शास्‍त्रज्ञांचे शेतकरी बांधवाना मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्‍या वतीने सोयाबीन पीक खत व्यवस्थापन याविषयावर यू ट्यूब लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 11 जुन रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रमुख मार्गदर्शक म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी  बी. देवसरकर, विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. यू.एन. आळसे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी.  पटाईत आदींनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर म्हणाले की, सोयाबीन हे जागतिक पातळीवर आधुनिक शेतीमधील महत्वाचे तेलबिया व शेंगवर्गीय पीक असुन सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के तेल असते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के  सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जवळजवळ ६० टक्के  प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत असुन त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत. कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.

खत व्यस्थापनासंदर्भात मार्गदर्शन करताना विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे म्हणाले की, सोयाबीन पिकास हेक्टरी ३० किलो नत्र, ६० कि. स्फुरद, ३० किलो पालाश अधिक २० किलो गंधक पेरणीवेळी द्यावे. जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने हेक्‍टरी १० किलो बोरॅक्स पेरणीच्यावेळी द्यावे. किड व्‍यवस्‍थापनाबाबत प्रा.डी.डी.पटाईत म्हणले की, खोडकिडी, पाने खाणाऱ्या अळ्या, हुमणी कीड तसेच रोग व्यवस्थापन यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे .

कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउन्डेशन परभणी जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे , बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक शुभम लाखकर, औरंगाबाद जिल्हा व्यवस्थापक मनोज काळे, रामाजी राऊत आदींनी केले. कार्यक्रमामध्ये संपूर्ण मराठवड्यातील जिल्हयातील शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन सोयाबीन लागवडीबाबत प्रश्न विचारले .

Thursday, June 11, 2020

एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करावा लागेल ...... मा डॉ अशोक दलवाई

वनामकृवि आयोजित बदलत्‍या हवामानास अनुकुल तंत्रज्ञानावरील ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

प्रशिक्षण वर्गात आस्‍ट्रेलिया, अल्‍जेरिया, नायजेरिया, नेपाळ, मलेशिया, म्‍यानमार आदीसह देशातील विविध विद्यापीठातील व संस्‍थेचे प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी सहभागी

देशात व राज्‍यात कोरडवाहु शेतीचे प्रमाण जास्‍त आहे. शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याकरिता या कोरडवाहु शेतीचे उत्‍पादन वाढ होणे आवश्‍यक आहे. कोरडवाहु शेतीत बदलत्‍या हवामानास अनुकुल तंत्रज्ञान विकसित करून प्रसाद करणे गरजे आहे. केवळ एक किंवा दोन पिकांवर अवलंबुन न राहता, ए‍कात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब वाढला पाहिजे, असे मत केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे अभ्‍यास समितीचे अध्‍यक्ष मा डॉ अशोक दलवाई यांनी व्‍यक्‍त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेपच्‍या वतीने दिनांक 11 ते 15 जुन दरम्‍यान कोरडवाहु शेतीत हवामान अनूकुल तंत्रज्ञानावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 11 जुन रोजी प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक मा डॉ ए के व्‍यास हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन सहभागी  होते तर अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते. शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रकल्‍प प्रमुख डॉ गोपाल शिंदे, प्रशिक्षण आयोजक डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ एम एस पेंडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, लॉकडाऊनच्‍या काळात परभणी कृषि विद्यापीठाच्‍या वतीने शेतकरी, विद्यार्थी, प्राध्‍यापक, कृषि विस्‍तारक व कृषि शास्‍त्रज्ञांच्‍या करिता अनेक ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग आयोजित केली, यामुळे देश व विदेशातील विख्‍यात तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यासर्वांचा फायदा निश्चितच कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणात होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

मा डॉ ए के व्‍यास मार्गदर्शनात म्‍हणाले की, पर्जन्‍यावर आधारित शेतीमध्‍ये पांरपारिक पिक पध्‍दती शिवाय कृषि वन शेती, कोरडवाहु फळपिके, पशुसंवर्धन इतर शेतीपुरक व्‍यवसायावर भर देणे गरजेचे असुन पावसाच्‍या पाण्‍याचा प्रत्‍येक थेंबाचा कार्यक्षमरित्‍या शेतीत वापर करावा लागेल, असे ते म्‍हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी केले तर नाहेप प्रकल्‍पाबाबत डॉ गोपाल शिंदे यांनी माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले तर आभार डॉ एम एस पेंडके यांनी मानले. सदरिल पाच दिवसीय प्रशिक्षणात बदलत्‍या हवामानास अनुकूल तंत्रज्ञानावरील विविध विषयावर क्रीडा हैद्राबादचे संचालक डॉ जी रविंद्र चारी, धारवाड येथील कृषि हवामानशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ आर एच पाटील, पोकरा प्रकल्‍पाचे डॉ विजय कोळेकर, बेंगलौर येथील कृषि विज्ञान विद्यापीठाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ मुदलगिरीअप्‍पा,  कौईम्‍बतुर येथील कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ सी आर चिन्‍नामुथू, हैद्राबाद क्रीडाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ के ए गोपीनाथ, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ एम एस पेंडके, डॉ उदय खोडके, डॉ के व्‍ही राव, सिमोगा ये‍थील डॉ एस श्रीधर आदी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 

सदरिल प्रशिक्षण वर्गात कृषि क्षेत्रातील आस्‍ट्रेलिया, अल्‍जेरिया, नायजेरिया, नेपाळ, मलेशिया, म्‍यानमार  आदीसह देशातील विविध विद्यापीठातील व संस्‍थेचे प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी सहभागी झाले आहेत. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ स्‍वाती मुंढे, इंजि सचिन कराड, डॉ अनिकेत वाईकर, इंजि अपुर्वा देशमुख आदीचे तांत्रिक सहाय्य लाभले.

Wednesday, June 10, 2020

मौजे पेठ बाभळगांव येथे हुमणी किडी व्‍यवस्‍थापनाबाबत जनजागृती

परभणी जिल्हयातील ब-याच गावात हुमणी किडींचे भुंगेरे मोठया संख्येने सायंकाळच्या वेळेला दिसून येत असुन येणा-या हंगामात मोठया प्रमाणात हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्‍याकरिता या भुंगे-यांचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्‍यक आहे,  याबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने हुमणी भुंगेरे व्यवस्थापण अभिमान सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 8 जुन रोजी पाथरी तालुक्‍यातील मौजे पेठ बाभळगाव येथे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री सागर खटकाळे, तालुका कृषि अधिकारी श्री शिंदे आदीसह इतर कर्मचारी यांनी भेट देऊन शेतक-यांना मार्गदर्शन केले. यावेळी पेठ बाभळगाव शिवारातील बाभूळ, कडुलिंब, बोर आदी झाडावरील भुंगे-याचे निर्मुलन करण्याचे प्रात्यक्षिक डॉ. आळसे यांनी दाखवले.  

यावेळी डॉ आळसे यांनी ही भुंगेरे नष्ट करण्यासाठी प्रका सापळे लावणे आवश्‍यक असुन बाभूळ, कडुलिंब, बोर आदी झाडावर किटकनाकांची फवारणी करण्‍याचा सल्‍ला दिला, यात प्रती लिटर पाण्‍यात 2 मिली क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरीफॉस फवारणी करावी तसेच झाडं हलवून पडलेले  भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकुन नष्ट करावेत, असे सांगितले. तसेच पेरणी करतांना मेटारायझीयम अनासोपली नावाची बुरशी एकरी 8 ते 10 किलो किंवा फोरेट 10 जी 8 किलो या प्रमाणात जमिनीत दयावीत, असाही सल्‍ला दिला.

यावेळी श्री संतोष आळसे यांनी सर्व क्षेत्रीय कर्मचा-यांना गावोगाव सायंकाळच्या वेळी जाऊन हुमणी भुंगे-यांबाबत शेतक-यांना अवगत करून नियंत्रणाचे उपाय करण्याचे आदे दिले. याप्रसंगी बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पध्‍दतीने सोयाबीन पेरणाचे प्रात्यक्षीतही दाखवून प्रत्येक गावांत बीबीएफ व्‍दारे पेरणी करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहीत करण्याचे आवाहन केले.

Tuesday, June 9, 2020

देशातील प्रत्‍येक नागरिकास कोरोना योध्‍दा म्‍हणुन वावरावे लागेल ......भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर

वनामकृविच्‍या वतीने आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात कृषिचे विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधला संवाद
कोरोनावर लस निर्मितीसाठी संपुर्ण जग प्रयत्‍न करीत आहे. लस कधी येईल हे निश्चित सांगता येत नाही. लॉकडाऊन दरम्‍यान डॉक्‍टर, नर्सेस, पोलिस आदी कोरोनाच्‍या लढाईत योध्‍दा म्‍हणुन पुढे होते. परंतु देशात लॉकडाऊन शिथिल करण्‍यात येत आहे, त्‍यामुळे यापुढे देशातील प्रत्‍येक नागरिकास कोरोना योध्‍दा म्‍हणुन वावरावे लागेल, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर यांनी व्‍यक्‍त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) च्‍या वतीने दिनांक 9 ते 13 जुन दरम्‍यान कोरोना विषाणु प्रादुर्भावाचा कृषि शिक्षणावर परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 9 जुन रोजी प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन झाले, या प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना मा डॉ रमण गंगाखेडकर हे बोलत होते. प्रशिक्षण वर्गाच्‍या उदघाटनप्रसंगी नवी मुंबई येथील एमजीएम आरोग्‍य विज्ञान संस्‍थेचे कुलगुरू मा डॉ शंशाक दळवी हे प्रमुख पाहुणे सहभागी  होते तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते. शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ जयश्री झेंड, वैद्यकीय तज्ञ डॉ रामेश्‍वर नाईक, डॉ आनंद देशपांडे, प्रकल्‍प प्रमुख डॉ गोपाल शिंदे, प्रशिक्षण आयोजिका डाॅ विना भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा डॉ गंगाखेडकर पुढे म्‍हणाले की, सध्‍या न्‍युझिलंड हा कोरोनामुक्‍त झाला आहे., ते त्‍यांनी घेतलेल्‍या काळजीने. त्‍यांनी जे केले ते अपणही करू शकतो. तो देश छोटा आहे. आपला देश मोठा आहे. परंतु, हताश होऊन बसलो तर काहीही करू शकणार नाही. त्‍यामुळे आपण आशावादी राहिले पाहिजे. आपला देश विस्‍ताराने आणि लोकसंख्‍येने मोठा आहे. त्‍यामुळे सद्य:स्थितीत प्रत्‍येकाने वॉरियर्स बनलं पाहिजे. प्रत्‍येकाने स्‍वत:सह कुटुंब आणि समाजाची काळजी घेतली पाहिजे, विशेषत: वयोवृध्‍द, लहान मुले, आधीच इतर आजाराने ग्रस्‍त व्‍यक्‍तींची काळजी आपणास घ्‍यावी लागेल. लॉकडाऊन उठवलं म्‍हणजे कोरोना संपला असे नाही. लॉकडाऊन काळात कोरोनासह जीवन जगण्‍याची नवीन शैली निर्माण झाली आहे. ती भविष्‍यात पाळावी लागेल. मास्‍कचा वापर, सुरक्षीत सामाजिक आंतर, योग्‍य वैयक्‍तीक स्‍वच्‍छता आदींचा सवयीचा भाग झाला पाहिजे, असे ते म्‍हणाले.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी अध्‍यक्षीय समारोप म्‍हणाले की, देशातील आरोग्‍य सुरक्षेकरिता अन्‍न सुरक्षा महत्‍वाची आहे. त्‍याकरिता कृषि क्षेत्र, शेतकरी व कृषितील कार्य करणारे विस्‍तार कार्यक्रर्ते, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यी यांनी कोरोना सोबत जीवन जगण्‍याची कला शिकण्‍याची गरज असुन सदरिल प्रशिक्षणाचा त्‍यांना लाभ होईल.    
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्या डॉ जयश्री झेंड, वैद्यकीय चिकित्‍सक डॉ रामेश्‍वर नाईक, पशुविज्ञान महाविद्यालयाचे डॉ आनंद देशपांडे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ गोपाल शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार प्रा संजय पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ मेघा जगताप, डॉ अविनाश काकडे, डॉ रश्‍मी बंगाळे आदींनी परिश्रम घेतले.
सदरिल पाच दिवसीय प्रशिक्षणात कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यासंबंधित  विविध विषयावर पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्‍पीटलचे डॉ बालासाहेब पवार, आयआयडी मुंबईचे डॉ सतिश अग्नीहोत्री, राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य मिशनचे डॉ लिना बडगुजर, आहारतज्ञ डॉ आशा आर्या, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ किरण सागर, डॉ भारत पुरंदरे, डॉ सुजा कोशी, मनोचिकित्‍सक डॉ राजेंद्र बर्वे आदी मार्गदर्शन करणार आहेत. समारोपीय कार्यक्रमास नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार व जयपुर येथील सीसीएस राष्‍ट्रीय कृषि विपणन संस्‍थेचे संचालक डॉ चंद्रशेखर यांचा प्रमुख सहभाग राहणार आहेत. सदरिल प्रशिक्षण वर्गात देशातील विविध विद्यापीठातील व संस्‍थेचे पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञ सहभागी झाले होते.