Tuesday, August 18, 2020

वनामकृवितील विद्यापीठ ग्रंथालयात माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम प्रेरणाकेंद्राची स्‍थापना

माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम यांच्‍या व्‍याख्‍यानात आदर्श समाज घडविण्‍याची ताकद .... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यापीठ ग्रंथालयात माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम प्रेरणा केंद्राची स्‍थापना करण्‍यात आली असुन स्‍वातंत्र्य दिनाचे औचित्‍य साधुन दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जयश्री झेंड, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम, डॉ राजेश क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, एका चांगल्‍या व्‍याख्‍यानाने व्‍यक्‍तीचे आयुष्‍य बदलु शकते. माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम यांच्‍या व्‍याख्‍यानात आदर्श समाज घडविण्‍याची ताकद आहे. व्‍यक्‍तीतील उच्‍च बौद्धिकता और नैतिकता समाजास दिशा देण्‍याचे कार्य करते. परभणी कृषि विद्यापीठातुन अनेक अधिकार व कृषि विस्‍तारक घडतात, परंतु त्‍यांची निमिमत्‍ता चांगली असेल तर समाजाचे चित्र बदलु शकते. मा डॉ अब्दुल कलाम यांचे देशाप्रती व कामाप्रती असलेला त्‍याग आपला समोर आदर्श ठेवुन प्रत्‍येकाने कार्य करावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम प्रेरणा केंद्राची स्‍थापना ग्रंथालयातील स्‍वतंत्र कक्षात करण्‍यात आली असुन यात दहा संगणकासह हेडफोनची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. यात केवळ माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम यांच्‍या प्रेरणादायी व्‍याख्‍यानाचा संग्रहीत चित्रफिती ठेवण्‍यात आले आहेत, त्‍यांच्‍या ग्रंथसंपदाचा संग्रह केलेला आहे. सदरिल ग्रंथसंपदा ग्रंथालय परिचराक श्री मुंजाजी शिंदे यांनी या केंद्रास भेट दिली आहे. विद्यापीठातील विद्यार्थी आपला अभ्यासातुन तणाव कमी करण्‍यासाठी काही वेळेसाठी सदरिल प्रेरणा केंद्रात येऊन माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी व्‍याख्‍याने एैकु शकतील अशी व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच त्‍यांच्‍या व्‍याख्‍यानांची स्‍वतंत्र संकेतस्‍थळाची निर्मिती करण्‍यात आली अशी माहिती विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम यांनी दिली. यावेळी डाॅ संतोष फुलारी, सहाय्यक ग्रंथपाल डॉ वंदना जाधव, श्री मोहन झोरे, श्री मुंजाजी शिंदे आदीसह ग्रंथालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Monday, August 17, 2020

ओवा पीक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय....... कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण

परभणी व अकोला कृषि विद्यापीठाचा संयुक्‍त राज्‍यस्‍तरीय ऑनलाईन ओवा पिक लागवडीवर कार्यशाळा संपन्‍न 

महाराष्ट्रातल्या कोरडवाहू भागामध्ये ओवा हे पीक एक चांगला पर्याय आहे. या पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी व यातील निर्यातीच्या संधीचा लाभ घेण्‍यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटांच्या माध्यमातून या पिकाची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असेलेले औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्र व अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑगस्ट रोजी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन ओवा पीक लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले, अजमेर येथील राष्ट्रीय मसाला बियाणे संशोधन संस्थेचे संचालक डॉ. गोपाल लाल, आयसीएआर-अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी विदर्भातील ओवा पिकाखालील क्षेत्र आणि त्याची सद्यपरिस्थिती याबद्दल माहिती देऊन अकोला कृषि विद्यापीठ विकसित ओवा मळणी यंत्राचा ओव्याच्या काढणी पश्‍चात प्रक्रिया साठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

मार्गदर्शनात मा. डॉ. गोपाल लाल म्‍हणाले की, आरोग्याच्या दृष्टीनेही ओव्याला अनन्यसाधारण महत्त्व असनु आज देशात जवळपास दोन मिलियन टन ओवा चे उत्पादन होते. त्यापैकी जवळपास १७ टक्के मालाची निर्यात केली जाते. या पिकांत निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

डॉ. लाखन सिंग यांनी प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर प्राथमिक स्वरूपाचा मसाला पिकांचा पार्क असणे गरजेचे असल्याचे सांगुन अशा प्रकारचा पार्क प्रत्येक केव्हीकेने आपल्या प्रक्षेत्रावर व दत्तक गावांत विकसित करावा असे सुचविले. डॉ. डी. बी. देवसरकर यांनी वनामकृवि परभणी व डॉ.पंदेकृवि, अकोला या विद्यापीठाच्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या विविध संयुक्तिक कार्यक्रमाबद्दल माहिती दिली व विद्यापीठे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सदैव कार्यरत असल्याचे सांगितले.

प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस.एस मीना यांनी राष्ट्रीय मसाला बियाणे संशोधन संस्था अजमेर यांच्या ओवा पिकाच्या विविध शिफारशी व संस्थेने विकसित केलेल्या विविध वाणाबद्दल सविस्तर माहिती दिली. औरंगाबाद येथील एनएआरपी चे प्रमुख डॉ. एस बी पवार यांनी प्रास्ताविक करून औरंगाबाद जिल्ह्यातील ओवा पिकांची सद्य परिस्थितीबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले. अकोला कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. घावडे यांनी ओवा पीक-महत्त्व, सद्यस्थिती व भविष्यातील संधी या विषयावर तर परभणी कृषि विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ. बी. व्ही आसेवार यांनी ओवा पीक-आपत्कालीन परिस्थितीतील शाश्वत पर्याय या विषयावर व कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादचे प्रमुख डॉ. के. के झाडे यांनी ओवा पिकाच्या लागवड तंत्रज्ञान व यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात डॉ. पंदेकृवि, अकोलाचे संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. पी. के. नागरे, औरंगाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आदी मान्यवरांसह शंभर शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या शंकाचे समाधानही शास्त्रज्ञामार्फत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. बसवराज पिसुरे, श्री. इरफान शेख, श्री. अशोक निर्वाळ आदीसह इतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

मृत्‍यु नंतर ही जीवंत राहण्‍याकरिता अवयवदान करा ..... श्री पुरूषौत्‍तम पवार

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात अवयवदान यावर ऑनलाईन कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने जागतिक अवयवदान दिनानिमित्‍त दिनांक 17 ऑगस्‍ट रोजी अवयवदान एक जागृती यावर ऑनलाईन व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख व्‍यक्‍ते म्‍हणुन पालघर येथील शरीर व अवयवदान संस्‍थेचे संस्‍थापक श्री पुरूषोत्‍तम पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात श्री पुरूषोत्‍तम पवार म्‍हणाले की, एखादया व्‍यक्‍तीच्‍या मेंदुचा मृत्‍यु झाला तर अवयवदान करता येते, यामुळे अनेकांना जीवदान मिळु शकते. एका व्‍यक्‍तीने नेत्रदान केल्‍यास किमान चार व्‍यक्‍तींना दृष्‍टीने देऊन त्‍यांचा जीवनातील अंधकार आपण मिटवु शकतो. आज श्रीलंका सारखा छोटा देशात मोठया प्रमाणात मृत्‍य व्‍यक्‍तीचे डोळातील कॉर्निया दान  करून निर्यात केली जाते. राज्‍यातील प्रसिध्‍द नेत्ररोग तज्ञ मा डॉ तात्‍याराव लहाने यांना आईनी किडनी देऊन प्राण वाचविले, तेच डॉ तात्‍याराव लहाने आज अनेकांन दृष्‍टी देण्‍याचे कार्य करत आहेत.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, समाजात अवयवदानाबाबत अनेक गैरसमज व अंधश्रध्‍दा आहेत, त्‍या दुर करण्‍याकरिता सातत्‍याने जनजागृती करण्‍याची गरज आहे. दोन वर्षापुर्वी विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या उस्‍मानबाद कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थी स्‍व ऋषिकेश एंगडे याचा एका अपघातात मृत्‍यु झाला, त्‍यांच्‍या कुटुबांनी अवयवदानाचा निर्णय घेतला, त्‍याचे दोन डोळे, किडनी, लिव्‍हर आदी अवयवदान करून पाच रूग्नांना देऊन एक आदर्श समाजा पुढे ठेवला आहे.

मार्गदर्शनात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, आज वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती होत असुन अवयवदान करून मृत्‍यु नंतरही आपण अवयवरूपी जगात राहु शकतो.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ अनुराधा लाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ विनोद शिंदे, डॉ अनंत बडगुजर आदीसह महाविद्यालयातील प्राध्‍यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ऑनलाईन कार्यक्रमास मोठया संख्‍येने महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्‍यापक सहभागी झाले होते.

डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतमाल मागणी व पुरवठा संतुलन साधने शक्‍य……. कुलगुरू मा डॉ विलास भाले

वनामकृविच्‍या वतीने आयोजित डिजीटल तंत्रज्ञानाव्‍दारे स्‍मार्ट शेती यावरील ऑनलाईन आतंरराष्‍ट्रीय परिषदेचा समारोप

आज देशात मुबलक प्रमाणात अन्‍नधान्‍य उत्‍पादन होत असुन कधी अतिरिक्‍त शेतमाल उत्‍पादीत होतो, त्‍यामुळे शेतमालास बाजारभाव मिळत नाही. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पिक लागवडीचे नियोजन केल्‍यास शेतमाल मागणी व पुरवठा यात संतुलन साधुन शेतकरी बांधवांना योग्‍य मोबदला मिळु शकेल. शेतमाल नासाडी कमी करण्‍याकरिता आपणास प्रयत्‍न करावे लागतील. हवामानातील बदलामुळे शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. यावर्षी सोयाबीनच्‍या कमी उगवण क्षमतेमुळे शेतकरी बांधवाचे नुकसान झाले. झालेल्‍या नुकसानीबाबत शासनाने सर्वेक्षण केले, यात अनेक अडचणी येतात. शेतकरी बांधवाचे झालेले नुकसान पुर्णपणे भरून शक्‍य नाही. पंरतु भविष्‍यात किड व रोगाचा प्रादुर्भाव, नैसर्गिक व आत्‍पकालीन परिस्थितीत शेतमालाचे होणारे नुकसान आदींचे अचुक सर्वेक्षण डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन करून शेतक-यांना योग्‍य मोबदला त्‍वरीत देणे शक्‍य आहे, असे प्रतिपादन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी केले.  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्‍कृत सेंटर ऑफ एक्‍सलंसराष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेपआणि आयएसए व आयएसजीपीबी शाखा परभणी  वतीने ‘डिजीटल तंत्रज्ञानाव्‍दारे स्‍मार्ट शेतीभविष्‍यात्‍मक योजना’ यावर ऑनलाईन आतंरराष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक १० ते १३ ऑगस्‍ट दरम्‍यान करण्‍यात आले होते, या परिषदेच्‍या समारोपाप्रसंगी (दि १३ ऑगस्‍ट) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन रायपुर छत्‍तीसगड ये‍थील कृषि विद्यापीठाचे कुलगरू  मा डॉ पी के घोष, नवी दिल्‍ली येथील आयसीएआरचे डॉ एस भास्‍कर, भारतीय कृषिविद्या संस्‍थेचे उपाध्‍यक्ष डॉ यु व्‍ही महाडकर, ईस्‍त्राईल तंत्रज्ञान संस्‍थेचे डॉ राफेल लिंकर, आयोजक नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार, शिक्षण संचालक डॉ डि एन गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकर, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू  मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, वाढत्‍या  लोकसंख्‍येला पोषक आहार, शेतकरी बांधवांना योग्‍य मोबदला, दर्जेदार अन्‍न निर्मिती, सार्वजनिक वितरण प्रणाली, प्रक्रिया व पॅकेजिंग सुविधाचे बळकटीकरण आदीकरिता डिजिटल तंत्रज्ञानाचा भविष्‍यात मोठा वापर होणार असल्‍याचे सांगुन सद्याच्‍या कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावात मनुष्‍याचा कमीत कमी शेतकामात वावर होण्‍याच्‍या दृष्‍टीने डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ पी के घोष म्‍हणाले की, डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीत वापर वाढण्‍याकरिता लागणा-या मनुष्‍यबळ निर्मितीची मोठी जबाबदारी सेंटर ऑफ एक्‍सलंस म्‍हणजेचे नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन परभणी कृषि विद्यापीठास दिली असल्‍याचे सांगितले.

कार्यक्रमात डॉ एस भास्‍कर, डॉ प्रभात कुमार, डॉ यु व्‍ही महाडकर, डॉ राफेल लिंकर आदींनेही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकर यांनी केले तर डॉ गोपाल शिंदे यांनी नाहेप प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ आय ए बी मिर्झा व डॉ सुनिता पवार यांनी केले तर आभार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी मानले. डॉ ए के गोरे यांनी सदरिल आंतरराष्‍ट्रीय  परिषदेचा अहवाल मांडला.  

चार दिवस चालेल्‍या या परिषदेच्‍या तांत्रिक सत्रात अमेरिकेच्‍या कृषि विभागाचे संचालक मा डॉ पराग चिटणीस, अमेरीकन युनीवर्सीटी ऑफ टेक्‍नॉलॉजीचे संचालक डॉ मोस्‍तफा एमएल कुर्डी, बेलारूसयन विद्यापीठाचे तज्ञ प्राध्‍यापक डॉ मिखाईल तातुर, अमेरिकेतील ऑरल रोर्बोट युनिवर्सीटीतील तज्ञ डॉ पावेल नवीटक्‍सी, अर्जेटीना येथील रोसारीओ राष्‍ट्रीय विद्यापीठाचे प्राध्‍यापक तज्ञ डॉ जेसल क्रिस्‍टोफर, अमेरिका येथील वाशिंग्टन स्‍टेट युनिवर्सीडीचे तज्ञ डॉ लव आर खोत, अल्‍गेरीया येथील फरहात अब्‍बास विद्यापीठाचे प्राध्‍यापक तज्ञ डॉ लाबाड रायमा, प्रा जयशंकर तेलंगाणा राज्‍य कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ व्ही प्रविणराव, रायपुर (छत्‍तीसगडयेथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ पी के घोष आदींनी मार्गदर्शन केले. परिषदेत विदेशातील तसेच देशातील विविध राज्‍यातील कृषि तज्ञशास्‍त्रज्ञप्राध्‍यापक व पदव्‍युत्‍तर विद्यार्थी यांनी सहभागासाठी नोंदविला होता. आयोजन समितीत डॉ जे ई जहागिरदारडॉ भगवान आसेवारडॉ एच व्‍ही काळपांडेडॉ आर व्‍ही चव्‍हाणडॉ आय ए बी मिर्झाडॉ एस व्‍ही कल्‍याणकरडॉ जे डी देशमुखडॉ पी के वाघमारे आदीचा सहभाग होता, तर तांत्रिक सहाय्य  नाहेप टीम सदस्‍य इं खेमचंद कापगातेडॉ अविनाश काकडेडॉ रश्‍मी बंगाळेइं रहीम खानइं ताझीम खान , इं शैलेश शिंदे आदींनी केले.

Sunday, August 16, 2020

वनामकृवित कोविड प्रतिबंधात्मक बहुउद्देशीय बायोमेट्रिक मशिनचे उदघाटन

कोरोना विषाणु रोगाच्‍या पार्श्‍वभुमिवर याप्रकारची सुविधा उपलब्‍ध करणारे राज्‍यातील एकमेव कृषि विद्यापीठ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्‍कृत सेंटर ऑफ एक्‍सलंस, राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) वतीने विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारत व नाहेप प्रकल्‍प कार्यालयात चेहराची ओळखणारी बहुउद्देशीय बायोमेट्रिक मशिनचे उदघाटन स्‍वातंत्रदिनाचे औजित्‍य साधुन दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्ते करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ उदय खोडके, नाहेपचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, डॉ भगवान आसेवार, डॉ राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सदरिल बहुउद्देशीय बायोमेट्रिक मशिनला कोणताही स्‍पर्श न करता, सेन्‍सरव्‍दारेच चेहराची ओळख होते, व्‍यक्‍तीच्‍या शरीराचे तापमानही नोंद केले जाते तसेच संबंधीत व्‍यक्‍तीचे आरोग्‍य कार्डही तयार होते. व्‍यक्‍तीचे शरीराचे तापमान जास्‍त असल्‍यास अर्लाम वाचतो, यामुळे आजारी व्‍यक्‍तीची ओळख होते. सद्याच्‍या कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारत व नाहेप प्रकल्‍प कार्यालयाच्‍या प्रवेशव्‍दारे जवळ हे मशीन बसविण्‍यात आलेे आहे, यात व्‍यक्‍तीच्‍या नाडीचे ठोक्‍याची नोंद व सॅनिटयझरची सुविधा आहे. याप्रकारचे मशिन सुविधा उपलब्‍ध करणारे राज्‍यातील एकमेव कृषि विद्यापीठ ठरले असुन यामुळे कोरोना विषाणु रोगाच्‍या पार्श्‍वभुमीवर आजारी रूग्णाचा अंदाज येऊ शकतो तसेच वेळीच दक्षता घेतली जाऊ शकते, अशी माहिती नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे यांनी दिली. उदघाटन कार्यक्रम प्रसंगी डॉ संजय पवार, डॉ मेघा जगताप आदीसह विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Saturday, August 15, 2020

कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव परिस्थितीतही कृषि विद्यापीठाचे कार्य अविरत चालु आहे ..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित ७४ वा स्‍वातंत्र्य दिन साजरा

कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव परिस्थितीत ही कृषि विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणाचे कार्य अविरत चालु आहे. ऑनलाईन पध्‍दतीने अध्‍यापनाचे कार्य चालु असुन विद्यार्थ्‍यांच्‍या वेळेवर परिक्षा व निकाल लावण्‍यात आले, पुढील सत्राची नोंदणी करण्‍यात आली आहे. जगभरात ऑनलाईन व ऑफलाईन अध्‍यापन व्‍यवस्‍था निर्माण होत आहे. ऑनलाईन पध्‍दती प्रभावी अध्‍यपनाकरिता प्राध्‍यापकांनी स्‍वत:तील कौशल्‍य विकसित करण्‍याचा प्रयत्‍न करावा. काही विद्यार्थ्‍यांना ऑनलाईन पध्‍दतीने अध्‍यायन करणे अशक्‍य असेल तर इतर माध्‍यमातुन त्‍यांच्‍या पर्यंत नोटस व इतर शैक्षणिक साहित्‍य पोहचवावे, त्‍यामुळे त्‍यांच्‍या शिक्षणात कोठेही बाधा येणार नाही याची काळजी घ्‍यावी, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात देशाच्‍या ७४ व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले, यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल , प्राचार्या डॉ जयश्री झेंड, प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे विहित संशोधन कार्य कोठेही थांबलेले नाही, ते चालुच आहे. यावर्षी विद्यापीठाने महत्‍वकांक्षी बीजोत्‍पादनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. विद्यापीठाच्‍या दर्जेदार बियाणास शेतकरी व शेतकरी बियाणे उत्‍पादक कंपन्‍या यांची मोठी मागणी असुन येणा-या खरीप हंगामात पुरेसा प्रमाणात बियाणे उपलब्‍ध करण्‍याचा मानस आहे. यावर्षी बहुउद्देशी बीबीएफ पेरणी यंत्राचे प्रात्‍याक्षिके थेट शेतकरी बांधवाच्‍या १२५ एकर शेतावर पेरणी करून घेण्‍यात आले. तसेच विद्यापीठ विकसित बॉयोमिक्‍स शेतकरी बांधवात मोठी मागणी आहे. कृषि तंत्रज्ञान विस्‍तार करिता ऑनलाईन कार्यशाळा, व्‍याख्‍याने व प्रशिक्षण कार्यक्रमाव्‍दारे विद्यापीठाशी संपुर्ण महाराष्‍ट्रातुन आज लाखो शेतकरी व कृषि विस्‍तारकांशी जोडले गेले आहेत. जागतिक बॅक व आयसीएआर पुरस्कृत विद्यापीठातील नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन ऑनलाईन पध्‍दतीने विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक, संशोधक व‍ विस्‍तार कार्यकर्ते आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय स्‍तरावरील तज्ञांशी जोडला गेला आहे. विद्यापीठ परिसरात मोठया प्रमाणात वृक्षलागवड व संवर्धनाचे कार्य चालु असुन हरित विद्यापीठाच्‍या दिशेने आपण वाटचाल करत आहोत, असे ते म्‍हणाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

वनामकृवित झायगोग्रामा भुंग्याद्वारे गाजर गवताचे जैविक निर्मूलन सप्ताह

वनामकृविच्‍या परोपजीवी कीटक संशोधन योजनेत झायगोग्रामा भुंगे उपलब्‍ध 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परोपजीवी कीटक संशोधन योजना आणि कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या दरम्यान गाजर गवताचे जैविक निर्मूलन सप्ताहाचे आयोजन केले आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि. १५ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते झायगोग्रामा भुंगे गाजर गवतावर सोडून सप्ताहाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव श्री. रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ.जयश्री झेंड, कृषि कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड आदींची प्रमुख उपस्थित होती.  

या प्रसंगी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, झायगोग्रामा भुंग्याद्वारे गाजर गवताचे पर्यावरणाला काहीही हानी न होता आपण गाजर गवताचे समूळपणे नायनाट करू शकतो आणि या भुंग्याची संख्या नेसर्गिकरित्या वर्षानूवर्षे वाढत राहते. विद्यापीठात उपलब्‍ध झायगोग्रामा भुंगे शेतकरी बांधवानी नेऊन आपल्‍या परिसरात व शेतात सोडावे, असे आवाहन त्‍यांनी केले.

कार्यक्रमास डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. धिरजकुमार कदम, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ.अनंत बडगुजर, परोपजीवी कीटक संशोधन योजनेच्या प्रभारी अधिकारी डॉ. श्रद्धा धुरगुडे, श्री. गणेश खरात, श्री. अनुराग खंदारे, डॉ. संजोग बोकन, डॉ. राजरत्न  खंदारे आदींची उपस्थिति होती.

वनामकृविच्‍या परोपजीवी कीटक संशोधन योजनेत झायगोग्रामा भुंगे उपलब्‍ध  

विद्यापीठाती परोपजीवी कीटक संशोधन योजनेत झायगोग्रामा भुंगे यांचे संगोपन आणि उत्पादन सुरू आहे. यावर्षी आता पर्यंत २५-३० हजार भुंग्यांची विक्री झाली अजून शेतकर्यांमध्‍ये या भुंग्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  गाजर गवत हे एक परदेशी तण असून याला शास्त्रीय भाषेत पार्थेनियम हिस्टोरियोफोरस असे म्हणतात. हे तणरुपी गवत अॅस्टीयेशी या कुळात मोडते. याला गाजर गवत अथवा पांढरुफुली या स्थानिक नावाने सुध्दा ओळखतात. गाजर गवताचे मुळस्थान उत्तर अमेरिकेतील मेक्सिको असून जगातील इतर देशात या तणाचा प्रसार मेक्सिको पासून झालेला आहे. आपल्या देशात या गवताचा प्रसार मेक्सिको मधून आयात केलेल्या गव्हाच्या धान्यासोबत बियाणे रुपाने झालेला आहे. भारतामध्ये सर्वप्रथम हे गाजरगवत पुणे येथे १९५५ मध्ये आढळून आले. त्यानंतर या तणाचा झपाटयाने सर्वदूर प्रसार झाला. गाजर गवताच्या नियंत्रणासाठी मनुष्यबळ आणि निरनिराळया रासायनिक तणनाशकाचा वापर करण्याची शिफारस असून सुध्दा कायमस्वरुपी नियंत्रण करणे कठीण आहे. कारण रासायनिक तणनाशके ही महागडी असून त्यांचा वापर वारंवार करावा लागत असल्यामुळे खर्चिक बाब होते. तसेच मनुष्यबळाचा वापर करण्यासाठी या गवताच्या विषारीपणामुळे मजूर वर्ग हे तण उपटण्यासाठी टाळाटाळ करतात. शेतकरी किंवा रहिवाशी त्यांच्या शेतातील किंवा घराच्या आसपासचे गाजरगवत उपटून नाश करतात. परंतू सार्वजनिक जागेतील उदा. रेल्वेमार्ग आणि राज्य रस्त्याच्या, बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाच्या परिसरातील, नदीकाठी किंवा शहराच्या मोकळया जागेतील गाजर गवत नष्ट करण्यासाठी ही बाब नागरीक खर्चिक समजून त्यावर खर्च करणे निरर्थक समजतात. अशा परिस्थितीत गाजर गवताचे जौविक नियंत्रण करणेच योग्य आहे. आपल्या देशात या गवतावर उपजिवीका करणा-या निरनिराळया २२ किडीची नोंद झालेली असली तरीही पाने खाणारा झायगोग्रामा भूंगा (झायगोग्रामा बायकोलोरॅटा) हे सर्वात प्रभावी माध्यम ठरले आहे. त्या अनुषंगाने गाजर गवताच्या नियंत्रणासाठी परोपजीवी कीटक संशोधन योजनाकीटकशास्त्र विभागवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी येथे या भूंग्याचे प्रयोगशाळेत मोठया प्रमाणावर गुणन करुन नाममात्र दरात शेतक-यांना उपलब्ध करुन देण्याचे काम मागील ब-याच वर्षापासून सुरु आहे.शेतकऱ्यांचाही सदर भुंगे खरेदीस दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो मराठवाड्यासोबतच विदर्भ,पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी ही मोठ्या प्रमाणात ह्या भुग्यांसाठी मागणी करतात. तसेच शेतकऱ्यांनी विद्यापीठातून घेऊन आपल्या भागात सोडलेले भुंगे सध्या बऱ्याच भागात स्थिरावलेले दिसतात, अशी माहिती परोपजीवी कीटक संशोधन योजनेच्या प्रभारी अधिकारी डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी दिली.