Tuesday, May 23, 2017

उन्‍नत शेती – समृध्‍द शेतकरी अभियानाच्‍या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषि राज्‍यमंत्री मा. ना. श्री सदाभाऊ खोत यांचे मार्गदर्शन

राज्‍यात राबविण्‍यात येणारे उन्‍नत शेती - समृध्‍द शेतकरी अभियान केवळ पंधरावाड्यापुरते मर्यादित न राहता वर्षभर कार्य करावे लागेल. शेतकरी व शास्‍त्रज्ञ यांच्‍यात सतत संवाद झाला पाहिजे, या अभियानात कृषि विद्यापीठांतर्गत असलेले विविध महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन केंद्रातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक तसेच विद्यार्थी यांचा सहभाग महत्‍वाचा असुन विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असा सल्‍ला राज्‍याचे कृषि, फलोत्‍पादन व पणन राज्‍यमंत्री मा. ना. श्री. सदाभाऊ खोत यांनी दिला. महाराष्‍ट्र राज्‍यात कृषि विभागाच्‍या वतीने दिनांक 25 मे ते 8 जुन दरम्‍यानउन्‍नत शेती- समृध्‍द शेतकरी अभियान राबविण्‍यात येणार असुन यास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांचे तांत्रिक पाठबळ राहणार आहे. सदरिल अभियानात सहभागी होणा-या शास्‍त्रज्ञांना प्रशिक्षीत करण्‍यासाठी दिनांक 23 मे रोजी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते, या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. व्‍यासपीठावर कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. ना. श्री. सदाभाऊ खोत पुढे म्‍हणाले की, हवामान बदलामुळे शेतीपुढे आज अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत, शेतक-यांचा रासायनिक खते व किडनाशकांवर भरमसाठ खर्च होतो, हवामान बदलात तग धरणारे व कीड-रोगास कमी बळी पडणारे पिकांचे वाण निर्माण करावे लागतील, या वर्षी तुरीचे भरभरून उत्‍पादन आले, परंतु साठवणुकीसाठी सुविधा नसल्‍याने शेतकरी अडचणीत आला आहे. गावागावात शेतमाल गोदामाचे जाळे निर्माण करावे लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित खरीपातील मुख्‍य पिकांचे एकात्मिक व्‍यवस्‍थापन या पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले. प्रशिक्षणात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी विविध विविध खरिप पिक लागवडीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ बी बी भोसले यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ एन के भुते यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.