Saturday, May 27, 2017

वनामकृविच्‍या बियाणे विक्रीस शेतक-यांचा मोठा प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विद्यापीठ वर्धापन दिनी दिनांक १८ मे रोजी आयोजित शेतकरी मेळाव्‍याप्रसंगी विद्यापीठ संशोधीत खरीप पिकांचे सत्‍यतादर्शक बियाणे शेतक-यांसाठी विक्रीस उपलब्‍ध केले होते. बियाणे विक्रीस शेतक-यांनी मोठा प्रतिसाद दिला. यावर्षी सोयाबीन, मुग व तुर पिकाचे एकुण २५२ क्विंटल सत्‍यतादर्शक बियाणे उपलब्‍ध झाले होते, यात सोयाबीनच्‍या एमएयुएस-७१ व एमएयुएस-१५८ वाणाचे १८२ क्विंटल सत्‍यतादर्शक बियाणे संपलेले असुन या वाणाचे ८२५.७६ क्विंटल पैदासकार बियाणे महाबीजला बीजोत्‍पादनासाठी देण्‍यात आले, त्‍याचा अप्रत्‍यक्ष शेतक-यांच लाभ होणार आहे. म्‍हणजेच सोयाबीनचे साधारणत: एक हजार क्विंटल सत्‍यतादर्शक व पैदासकार बियाण्‍याची वि‍क्री झाली आहे. तसेच तुर बीडीएन-७११ या वाणाचे ६० क्विंटल व मुग बीएम-२००३-२ वाणाचे १० क्विंटल सत्‍यतादर्शक बियाणे उपलब्‍ध होते तर सदरिल वाणाचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्‍ध असल्‍याचे विद्यापीठाच्‍या बियाणे विभागाने कळविले आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या निर्देशीत केल्‍यानुसार कॅशलेस व्‍यवहार संकल्‍पनेच्‍या अनुषंगाने विद्यापीठाने कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनानुसार व विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड व स्‍टेट बॅक ऑफ इंडिया यांच्‍या सहकार्याने स्‍वाईप मशीनाची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली होती. सदरिल बियाणे खरेदी करतांना शेतक-यांनी एटीएम कार्डव्‍दारे स्‍वाईप मशीनाच्‍या माध्‍यमातुन कॅशलेस सुविधेचा मोठा प्रमाणात उपयोग केला.