Wednesday, May 31, 2017

कृषि विद्यापीठाने सेंद्रिय शेती व यौगिक शेतीवर संशोधन कार्य हाती घ्या्वे .....महाराष्ट्र व कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. डॉ. राम खर्चे

संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीत विविध पिकांचे 30 नवीन वाण, 13 कृषि अवजारे व यंत्र आदीसह साधारणत: 244 शिफारशींना मान्‍यता 


आज अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळाली असुन पर्यावरणास अनुकूल, कमी खर्चिक, रासायनिक निविष्‍ठाचा वापर न करता या शेतक-यांना सेंद्रिय शेतीपासुन चांगले अनुभव आले असुन कृषि विद्यापीठांनी सेंद्रिय शेती व यौगिक शेतीवर संशोधन करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. डॉ. राम खर्चे यांनी केले. महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४५ वी बैठक परभणी येथे महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २९ ते ३१ मे दरम्‍यान आयोजित करण्‍यात आली होती, त्‍या बैठकीच्‍या समारोपात अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्‍यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. तपस भट्टाचार्य, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथा, संशोधन संचालक (परभणी) डॉ दत्‍तप्रसाद वासकर, संशोधन संचालक (अकोला) डॉ डि एम मानकर, संशोधन संचालक (राहुरी) डॉ आर एस पाटिल, संशोधन संचालक (दापोली) डॉ यु व्‍ही महाडकर, संशोधन संचालक (कृषि परिषद) डॉ हरिहर कौसडीकर आदी प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. राम खर्चे पुढे म्‍हणाले की, कृषि विद्यापीठाचे संशोधन प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेतावर पोहचविण्‍याचे कार्य कृषि विभागाचे असुन कृषि विभागातील कृषि सहाय्यकापासुन ते वरिष्‍ठ अधिका-यांपर्यंत सदरिल संशोधन शिफारसीबाबत नियमित प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्‍यात यावीत. विद्यापीठाने संशोधीत केलेल्‍या पिकांचे नवीन वाण, कृषि अवजारे व यंत्रे, कृषि तंत्रज्ञान शिफारशीचा शेतक-यांच्‍या शेतीवरील  परिणामाचे संशोधनात्मक विश्‍लेषण झाले पाहिजे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ नैराश्‍यग्रस्‍त शेतक-यांसाठी राबवित असलेला उमेद उपक्रम निश्चितच चांगला उपक्रम आहे. गटशेती, शेतकरी बियाणे उत्‍पादक गट, बचत गट व शेतीस शेतीपुरक व्‍यवसायाची जोड देऊन शेतीत शाश्‍वतता आणावी लागेल. शेतक-यांचे मनोबल उंचावण्‍यासाठी कार्य करावे लागेल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, राज्‍याचे दरडोई उत्‍पन्‍न इतर राज्‍यापेक्षा चांगले आहे, परंतु आपल्‍या राज्‍यात शेतकरी आत्‍महत्‍या होत आहेत, यासाठी सर्वांनी एकत्रित कृती आराखडा तयार करावा लागेल. कृषि विद्यापीठाच्‍या संशोधनाचे दस्‍तऐवजीकरण चांगल्‍यारितीने होणे गरजेचे असल्‍याचे मत दापोली येथील कुलगुरु मा. डॉ. तपस भट्टाचार्य आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केले तर कुलगुरु मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथा म्‍हणाले की, विद्यापीठाचे संशोधन शेतक-यांच्‍या शेतावर पोहचविण्‍यासाठी मोठया प्रमाणात प्रात्‍यक्षिके घ्‍यावी लागतील तसेच बीजोत्‍पादन यंत्रणा मजबुत करावी लागेल.
कार्यक्रमात संशोधन संचालक (कृषि परिषद) डॉ हरिहर कौसडीकर यांनीही मत व्‍यक्‍त केले. सुत्रसंचालक डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. कार्यक्रमात विविध तांत्रिक सत्रातील 12 गटांचा कार्यवृत्‍ताचे वाचन करण्‍यात येऊन त्‍यातील विविध पिकांचे 30 नवीन वाण, 13 कृषि अवजारे व यंत्र आदीसह एकुण साधारणत: 244 संशोधन शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. 
शेतपिकामध्‍ये एकुण 18 वाणानां मान्‍यता देण्‍यात आली, यात भात पिकाचे चार, भुईमुगाचे तीन, संकरित बाजरीचे दोन वाणासह ऊस, हरभरा, ज्‍वारी, बर्टी, राजमा, जवस, ओट, अंजन व मारवेल गवताच्‍या प्रत्‍येकी एक वाणाची शिफारस करण्‍यात आली. उद्यानविद्या पिकात एकुण 12 वाणाना मान्‍यता देण्‍यात आली, यात टोमॅटोच्‍या तीन वाणासह भेंडी, मिरची, वांगी, सिताफळ, संत्रा, कागदी लिंबु, घोसाळी, गेलार्डिया, शेवंती यांच्‍या प्रत्‍येकी एक वाणास मान्‍यता देण्‍यात आली.