Thursday, May 4, 2017

वनामकृविचा मौजे मूरूंबा येथे उमेद कार्यक्रम संपन्न

अनुभव आधारीत शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यीनीनी केले शेतक-यांना आंळबी उत्‍पादनावर मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केद्र, वनस्‍पती विकृतीशास्‍त्र विभाग, कृषि महाविदयालय, परभणी व कृषि विज्ञान केद्र, परभणी यांच्‍या संयुक्‍त विदयमाने मौजे मुरुंबा (ता. जि. परभणी) येथे उमेद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 2 मे रोजी करण्‍यात आले होते. उमेद कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठाच्‍या वतीने सन २०१४-२०१५ पासून राबविण्‍यात येत असुन सदरील उपक्रमातंर्गत मराठवाडयातील विविध गावांमध्‍ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येते. आप्‍तकालीन व दुष्‍काळी परिस्थितीत शेतक-यांना कृषि तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन तसेच शेतक-यांना कृषि पुरक जोडधंदे, नवीन उदयोग, कमी खर्चाचे तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन तसेच शेतक-यांना आत्‍महत्‍या करण्‍यापासून परावृत्‍त करण्‍यासाठी समुपदेश केले जाते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले हे होते, तर प्राध्‍यापक डॉ. के. टी. आपेट, परभणी कृषी विज्ञान केंद्राचे मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, प्रा. डी. डी. पटाईत, प्रा अंबाडकर, प्रगतशील शेतकरी श्री. बिभीषन चोपडे, श्री. विजयकुमार झाडे, पंडीत अशोक आदींची प्रमुख उपस्थितीत होती.  
अध्‍यक्षीय भाषणात डॉ बी बी भोसले म्‍हणाले की, शेतकरी हा जगाचा पोंशिदा आहे, त्‍याने कुठल्‍याही परिस्थितीत डगमगून जाऊ नये, आजची वेळ उदया राहणार नाही. विदयापीठ, शासन, कृषि विभाग, हे सदैव शेतक-यांचे पाठीशी आहेत. समाजात शेतक-यांची प्रतिष्‍ठा व उच्‍च स्‍थान अबाधित आहे. आत्‍महत्‍येचा मार्ग अवलंब न करता बिकट परिस्थितीमधून मार्ग काढला पाहिजे, असे सांगुन त्‍यांनी विदयापीठाचे तंत्रज्ञान, जोडधंदे, कमी खर्चाचे तंत्रज्ञान याविषयी शेतक-यांना अवगत केले. कार्यक्रमात धानोरा काळे येथील प्रगतशील शेतकरी प्रताप काळे व मजलापूर येथील बालासाहेब हिंगे यांनीही अनुभव सांगितले. 
यावेळी कृषी महाविदयालयाच्‍या अनुभव आधारीत शिक्षण कार्यक्रमाच्‍या विदयार्थींनींनी मयुरी ठोंबरे व प्रियंका वालकर यांनी उपस्थिती शेतकरी व महीला शेतक-यांना आंळबी उत्‍पादन तंत्रज्ञानावर प्रात्‍यक्षिकावर दाखवुन आळंबी उत्‍पादन तंत्र, उपयोग, बाजारभाव, उत्‍पन्‍न व फायदा या विषयी सविस्‍तर सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुप्रिया जाधव हिने केले तर आभार प्रदर्शन शिल्‍पा नरवाडे हिने केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आठव्‍या सत्राच्‍या विदयार्थीनी विद्यार्थींनी व गावातील शेतक-यांनी परीश्रम घेतले.