Wednesday, May 17, 2017

भारताच्या पुर्नबांधणीसाठी सामाजिक परिवर्तनाची गरज.....पदमश्री मा. डॉ. सुखदेव थोरात

वनामकृवित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयती निमित्‍त आयोजित व्‍याख्‍यान कार्यक्रमात प्रतिपादन

भारतीय समाजात जातीय समानता निर्माण करण्‍यासाठी वैयक्‍तीक पातळीवर कायदा उपयुक्‍त ठरू शकतो, परंतु संपुर्ण समाज जातीय समानता मानत नसेल तर कायदा दोडका ठरतो. आज भारत पुर्नबांधणीसाठी सामाजिक परिवर्तन गरजेचे आहे. महाराष्‍ट्राला सामाजिक परिवर्तनाची मोठी परंपरा लाभली असुन शिवाजी महाराज, रानडे, गोखले, आगरकर, शाहु महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, संत तुकाराम, गाडगे महाराज, तुकोडीजी महाराज आदींनी जातीय समानतेसाठी कार्य केले आहे. यासाठी सर्व समाजास एकत्र यावे लागेल, असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील विदयापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्‍यक्ष पदमश्री मा. डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कॉस्‍ट्राईब कर्मचारी महासंघाच्‍या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 126 व्‍या जंयती निमित्‍त दिनांक 15 मे रोजी आयोजित व्‍याख्‍यान कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले, महासंघाचे अध्‍यक्ष डॉ गजेंद्र लोंढे, सचिव प्रा अनिस कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्राच्या पुनर्बाधणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका या विषयावर बोलतांना पदमश्री मा. डॉ. सुखदेव थोरात पुढे म्‍हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक कार्यामुळे आज भारतात अनेक आमूलाग्र बदल घडून आले आहेत. डॉ. आंबेडकर हे एक उत्तम अर्थशास्त्री होते, ज्ञानाच्या जोरावर भारताच्‍या आर्थिक धोरणावर त्‍यांचा प्रभाव होता, त्यांचे मोलाचे कार्य म्हणजे देशाच्या मध्यवर्ती रिझर्व बँकेची स्थापना. वीज निर्मिती आणि जलसिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी देशातील पहिला नदी-खोरे प्रकल्प तयार केला. दामोदर, हिराकुंड प्रकल्‍प म्‍हणजे त्यांच्या दूरदृष्टीपणाची ओळख होय. १९२० ते १९५६ हा भारताच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचा कालखंड असून या कालावधीत देशात अनेक स्थित्यंतर झाले अनेक बदलांना जनतेला समोरे जावे लागले. आरक्षणाच्‍या धोरणामुळे मागासवर्गीय व आदिवासी समाज तसेच महिलाचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढला आहे. उत्‍पन्‍न वाढत आहे, गरिबीचे प्रमाण कमी होत आहे, अस्‍पुश्‍यता कमी होत आहे, परंतु अस्‍पृश्‍यता पुर्णपणे संपलेली नाही. खाजगीकरणामुळे आरक्षण धोरण निष्‍प्रत ठरत आहे.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरुल म्‍हणाले की, आजही देशाच्‍या आर्थिक व सा‍माजिक प्रगती मध्‍ये बाबासाहेबांच्‍या विचारांचे प्रतिबिंब दिसते. आजही बाबासाहेबांच्‍या विचारांची देशाला गरज आहे.
याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एस जी बोरकर यांचे नाव अमेरिकातील राष्‍ट्रीय जैवतंत्रज्ञान विषयक केंद्रानी क्‍लेबसीएल्‍ला न्‍युमोनी प्रजातीस दिल्‍याबद्दल त्‍यांचा सपत्‍नीक मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला तसेच महासंघातर्फे संकलित आरक्षण विषयक शासन निर्णय पुस्तिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ गजेंद्र लोढे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ फरिया खान यांनी केले तर आभार प्रा अनिस कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक मोठया संख्‍येने उपस्थित होते.