Thursday, May 18, 2017

गाव पातळीवर व पिकनिहाय शेतकरी गट निर्माण करावी लागतील.....माजी कुलगुरू मा. डॉ. किसनराव लवांडे

वनामकृविच्‍या खरीप शेतकरी मेळाव्‍यास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
विद्यापीठ बियाणे विक्रीचे उद्घाटन करतांना
कृषि प्रदर्शनीचे उदघाटन करतांना
मेळाव्‍याचे उदघाटन करतांना
विदेशात शेतमालाचे भाव सरकार बांधुन देते, भारतात शेतकरी स्‍वत: शेतमालाचे भाव ठरवु शकत नाही. देशात शेतमालावर शेतक-यांपेक्षा व्‍यापारीच जास्‍त नफा कमावतो, राज्‍यातील शेतक-यांची आर्थिक स्थिती सुधारवयाची असेल तर शेतक-यांचे गाव पातळीवर व पिक निहाय आपले गट निर्माण करावी लागतील, असे प्रतिपादन दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. किसनराव लवांडे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४५ व्‍या वर्धापन दिना‍निमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचे कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित दिनांक १८ मे रोजी खरीप शेतकरी मेळावाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाचे संचालक तथा विस्‍तार व प्रशिक्षण (कृषिसंचालक मा. डॉ. एस. एल. जाधव, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. रविंद्र देशमुख, मा. श्री. गोविंदराव देशमुख, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुल‍सचिव डॉ विलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
माजी कुलगुरू मा. डॉ. किसनराव लवांडे पुढे म्‍हणाले की, शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासाठी सिंचन क्षमतेत वाढ करावी लागेल, शेतक-यांना अखंडीत वीजपुरवठा दिला पाहिजे, शेतमालास बाजार भावाची हमी, उत्‍पादन खर्चावर आधारीत शेतमालास भाव, पारदर्शक विपणन व्‍यवस्‍था, पत व्‍यवस्‍था, शेतमाल साठवण व्‍यवस्‍था आदी बाबींवर भर द्यावा लागेल. आज देशात अन्‍नधान्‍याची गोदामे भरून आहेत तर दुसरीकडे खरेदी क्षमता नसल्‍यामुळे भुकबळींची संख्‍याही मोठी आहे. यासाठी ग्रामीण भागात शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारून रोजगार निर्मिती करावी लागेल. आज राज्‍यातील कृषि विद्यापीठांनी विविध पिकांची अनेक वाण व तंत्रज्ञान शिफारसी शेतक-यांना दिल्‍या आहेत, शेतक-यांच्‍या कष्‍टाच्‍या आधारे अन्‍नधान्‍यात उत्‍पादनात भरीव वाढ झाली आहे.
राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाचे संचालक मा. डॉ. एस. एल. जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेतकरी आज अनेक कारणामुळे मानसिक तणावाखाली यासाठी शासन, शास्‍त्रज्ञ व शेतक-यांना एकत्रिक कार्य करावे लागेल. शेतकरी समृध्‍द करण्‍यासाठी शेतीतील विविध निविष्‍ठांवरील खर्च कमी करून पिकांचे उच्‍चतम उत्‍पादन क्षमता गाठावी लागेल. यासाठी येणा-या हंगामात कृषि विभाग कृषि विद्यापीठाच्‍या सहकार्याने उन्‍नत शेती - समृध्‍द शेतकरी अभियान राबविणार आहे. पिकाच्‍या विविध वाणाची उत्‍पादनाची अनुवंशीक क्षमता अधिक आहे, परंतु शेतक-यांच्‍या शेतावरील प्रत्‍यक्ष उत्‍पादन कमी आहे, ही उत्‍पादन तफावत कमी करण्‍यासाठी २५ मे ते  जुन दरम्‍यान उन्‍नत शेती - समृध्‍द शेतकरी अभियान राबविण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु अध्‍यक्षीय भाषणात म्‍हणाले की, शेतक-यांच्‍या समृध्‍दीसाठी दीर्घकालीन उपाय करावी लागतील. यात विविध शेतमालाचे भावाचे अंदाज बांधुन पुढील हंगामात शेतक-यांना कोणते पिक फायदेशीर ठरेल, याबाबत मार्गदर्शन करणारी यंत्रणा राज्‍यपातळीवर उभी करावी लागेल. पुढील हंगामात विद्यापीठाचे नांदेड-४४ हे कपाशीचे वाण बीटी स्‍वरूपात उपलब्‍ध होईल असे त्‍यांनी सांगितले.  
कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विकसित तण व्‍यवस्‍थापन मोबाईल अॅपचे लोकार्पण करण्‍यात आले तसेच मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ मासिक शेतीभातीच्‍या खरिप विषेशांकाचे, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिका आदींची विमोचन करण्‍यात आले. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित विविध पीकांच्‍या वाणाच्‍या बियाणे विक्रीचे उद्घाटनही करण्‍यात आले.
प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ वीणा भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी केले. मेळाव्‍यानिमित्‍त खरीप पीक परिसंवादात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ कापुस, सोयाबीन, तुर आदीसह खरीप पीक लागवड, शेतीपुरक जोडधंदे, सेंद्रिय बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन विषयावर डॉ. बी. बी. भोसले, डॉ. यु. एन. आळसे, प्रा पगार, प्रा. ए जी पंडागळे, डॉ ए टी शिंदे आदींनी मार्गदर्शन केले तर शेतक-यांच्‍या शंकाचे निरसनही करण्‍यात आले. याप्रसंगी कृषि प्रशदर्शनाचेही आयोजन आले होते, यात कृषि तंत्रज्ञान व कृषि औजारे वर आधारीत विद्यापीठाचे दालने, शेतकरी बियाणे उत्‍पादक कंपन्‍या, खाजगी बी-बियाणे, कृषि निविष्‍ठाच्‍या कंपन्‍या व बचत गटाचे शंभर दालनाचा समावेश होता. मेळाव्‍यात महिला उद्योजिका रेखा बहदुरे, जया सबदे व कमल कुंभार यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. मेळाव्‍यास माजीमंत्री मा. श्री. सुरेशराव वरपुडकर, अॅड प्रतापराव बांगर आदीसह अनेक मान्‍यवर उपस्थित होते. मेळाव्‍यास व कृषि प्रदर्शनीस शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला. 

मार्गदर्शन करतांना राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाचे संचालक मा. डॉ. एस. एल. जाधव

मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा. डॉ किशनराव लवांडे

अध्‍यक्षीय समारोप करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
विद्यापीठ शेतीभाती मासिकाच्‍या खरिप विशेषांकचे विमोचन करतांना



मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा. डॉ किशनराव लवांडे

विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विकसित एकात्मिक तण व्‍यवस्‍थापन मोबाईल अॅपचे लोकार्पण करतांना