Monday, May 29, 2017

शेतक-यांच्‍या व शेतीच्‍या विकासासाठी शासन, कृषि विभाग, शास्‍त्रज्ञ यांना एकत्रित कार्य करावे लागेल .....राज्‍याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर

वनामकृवित आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४५ व्‍या बैठकीचे उद्घाटन
तीन दिवशीय बैठकीत तीनशे कृषि शास्‍त्रज्ञांचा सहभाग, ३० नवीन वाणासह साधारणत: २८० तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार


मार्गदर्शन करतांना राज्‍याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर

राज्‍य शासनाने सुरू केलेल्‍या उन्‍नत शेती – समृध्‍द शेतकरी अभियानाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांच्‍या शेतावर विविध पिकांच्‍या वाणाचे अनुवंशिक उत्‍पादन प्राप्‍त करण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येणार असुन शेतक-यांनी घेतलेल्‍या कर्जापेक्षा व शेतीतील खर्चापेक्षा शेती व्‍यवसायातुन अधिक उत्‍पन्‍न झाले पाहिजे. यासाठी शेतकरी, कृषि विभाग, राज्‍य शासन, विद्यापीठ व शास्‍त्रज्ञ सर्वाना प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन राज्‍याचे कृषि व फलोत्पादन मंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर यांनी केले.
महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४५ वी बैठक दिनांक २९ ते ३१ मे दरम्‍यान परभणी येथे महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने होत असुन सदरिल बैठकीच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. डॉ. राम खर्चे, कृषि व फलोत्पादनाचे अप्‍पर मुख्य सचिव मा. श्री. विजय कुमार (भाप्रसे), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. तपस भट्टाचार्य, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथा, कृषि परिषदेचे महासंचालक तथा सदस्य सचिव मा. डॉ. के. एम. नागरगोजे (भाप्रसे), कृषि आयुक्‍त मा. श्री. सुनिल केंद्रेकर, परभणीचे आमदार मा. डॉ राहुल पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, जिल्‍हाधिकारी मा. श्री पी शिवा शंकर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री केदार सोळुंके, मा. श्री अनंतराव चौंदे, मा. रविंद्र देशमुख, मा डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आदीसह विविध कृषि विद्यापीठाचे संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती. 
उपस्थित शास्‍त्रज्ञांना मार्गदर्शन करतांना मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर पुढे म्‍हणाले की, शेतकरी आत्‍महत्‍याबाबत सर्वांना आत्‍मचिंतन करावे लागेल. स‍दरिल बैठकीत सर्व शास्‍त्रज्ञ व कृषि शासनातील अधिकारी यांनी विचारमंथन करावे. कृषि तंत्रज्ञानाच्‍या आधारे कृषि उत्‍पादनात मोठी वृध्‍दी झाली, यावर्षी तुरीचे विक्रमी उत्‍पादन घेऊन शेतक-यांनी दाखवुन दिले. परंतु बाजारभावाचा प्रश्‍न निर्माण झाला. शासनाने नाफेडच्‍या मार्फत सुमारे दहा लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. राष्‍ट्रीय पातळीवरील देशाचे शेतामाल विषयक आयात-निर्यात धोरण ठरवितांना राज्‍याचा सहभाग पाहिजे. कृषि विद्यापीठातील कृषि शिक्षण जरी महत्‍वाचे असले तरी राज्‍यातील शेती विकासासाठी कृषि संशोधनावर आपणास भर द्यावा लागेल. चारही कृषि विद्यापीठाने अनेक चांगले संशोधन केले असुन चारही विद्यापीठाच्‍या संशोधनात समन्‍वय झाले पाहिजे. शेतीचे यांत्रिकीकरण करणे गरजेचे असुन यावर्षी सुरू केलेल्‍या योजनेत एक लाख शेतक-यांनी विविध शेती अवजारे व यंत्राची मागणी केली आहे. राज्‍यातील पशुधन कमी होत आहे, याकडेही लक्ष द्यावे लागेल. महाराष्‍ट्र शासनाच्‍या महत्‍वाकांशी जलयुक्‍त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढण्‍यास निश्चितच मदत होत असुन त्‍यामुळे कृषि उत्‍पादन वाढ होऊन शेतक-यांच्‍या आर्थिक स्‍थैर्य प्राप्‍त होईल. कृषि विद्यापीठांनी हवामान बदलाचा पार्श्‍वभुमीवर पिकांमध्‍ये असलेल्‍या अनुवंशिक विविधतेचा उपयोग अवर्षण सहनशील व उष्‍णता सहनशील वाणांची निर्मिती करावी लागेल, असे सल्‍ला त्‍यांनी शास्‍त्रज्ञांना दिला.
महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. डॉ. राम खर्चे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि विद्यापीठाच्‍या संशोधनाचा परिणाम देशात व राज्‍याच्‍या शेती उत्‍पादन वाढीवरून दिसुन येत आहे. कृषि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी अनेक पिकाच्‍या बाबतीत विक्रमी उत्‍पादन घेत आहेत. देशाची व राज्‍याची अर्थव्‍यवस्‍था पुर्णपणे शेतीशी निगडीत आहे. कृषि अर्थव्‍यवस्‍था सक्षम करण्‍यासाठी कृषि विद्यापीठाचे महत्‍व अधोरेखित होते, यासाठी राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठाना पाठबळाची आवश्‍यकता. सदरिल बैठकी कृषि संशोधक व कृषिशी निगडीत विविध विभाग सहभागी आहेत परंतु शेतकरी, बियाणे कंपन्‍या व शेती यंत्र उत्‍पादक यांचाही सहभाग घेणे आवश्‍यक आहे. गेल्‍या एक वर्षापासुन कृषि विद्यापीठांतील नौकर भरती व प्राध्‍यापकांच्‍या पदोन्‍नोतीचा प्रश्‍न मार्गी लावण्‍याचा प्रयत्‍न कृषि परिषद करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
कृषि व फलोत्पादनाचे अप्‍पर मुख्य सचिव मा. श्री. विजय कुमार आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि विद्यापीठातील संशोधन जलदगतीने गावपातळीवरील कृषि सहाय्यक शेतक-यापर्यंत पोहचविले पाहिजे, यासाठी प्रसार माध्‍यमे, माहिती तंत्रज्ञान यांची मदत घ्‍यावी लागेल. कृषि विभागाच्‍या वतीने घेणारे प्रात्‍यक्षिकातही कृषि शास्‍त्रज्ञांचे तांत्रिक पाठबळ पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले तर कोरडवाहु शेती तंत्रज्ञान, जलसंवर्धन व जलपुर्नभरण, अॅग्रोटेक वनामकृवि आदी मोबाईल अॅप्‍सचे लोकापर्ण करण्‍यात आले. यावेळी विद्यापीठ तंत्रज्ञान व उपक्रमावर आधारित प्रदर्शनीचेही आयोजित करण्‍यात आले होते. प्रास्‍ताविकात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी चारही कृषि विद्यापीठाचा प्रगती अहवाल मांडला. सुत्रसंचालन क्रांती दैठणकर यांनी केले तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास चारही कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, शहरातील प्रतिष्‍ठीत नागरिक, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
सदरिल बैठकीत विविध पिकांचे अधिक उत्पादन देणारे ३० नवीन वाणासह साधारणत: २८० तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाऊन शेतक­यांसाठी प्रसारीत केल्या जाणार आहेत. सदरील बैठकीचा समारोप ३१ मे रोजी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कृषि परीषदेचे उपाध्यक्ष मा. ना. डॉ. राम खर्चे यांची उपस्थिती लाभणार आहे. बैठकीसाठी राज्याचे माननीय राज्‍यपाल मा. श्री. चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आदींसह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
वनामकृविच्‍या संशोधन बियाणांची पाहणी करतांना राज्‍याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर