Saturday, March 31, 2018

वनामकृवितील पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्‍या वतीने आदिवासी शेतकरी मेळावा संपन्न

आदिवासी शेतक-यांना तुषार व ठिबक सिंचन संचाचे वाटप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्‍या वतीने आदिवासी उपयोजना अंतर्गत दि. ३१ मार्च रोजी आदिवासी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी. आर. शिवपुजे, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, मुख्यशास्त्रज्ञ डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ हेमा सरंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाव्‍दारे राबविण्‍यात येत असलेल्‍या आदिवासी उपयोजनेमुळे आदिवासी शेतक-यांमध्‍ये नवीन कृषि तंत्रज्ञानाबाबत जागृती होत असल्‍याचे मत व्‍यक्‍त करून प्रकल्पातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच आदिवासी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाव्‍दारे तांत्रिक कार्यशाळाचे आयो‍जन करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या.
मा. डॉ पी आर शिवपूजे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आदिवासी शेतक-यांनी केवळ शेती उत्पादन वाढवून न थांबता मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योग सुरु करावीत तसेच शेतीस पशुपालन व दुध उत्पादानाची जोड देण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी वाई या गावात सन २०१५ पासून विद्यापीठाने राबविलेल्या विविध योजानांची माहिती देऊन मौजे जावरला येथील शेतकऱ्यांना यापुढेही विद्यापीठाकडून तांत्रिक पाठिंबा राहील असे आश्वासन दिले.
जावरला येथील सरपंच भूपेंद्र आडे व वाई येथील शेतकरी श्री दुधाळकर यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठ आदिवासी गावात राबवित असलेल्‍या उपक्रमाबाबत आभार व्‍यक्‍त करून यापुढेहि विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी तांत्रिक साहाय्य करण्‍याची विनंती केली. कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते नांदेड जिल्‍हातील किनवट तालुक्‍यातील मौजे जावरला येथील अकरा आदिवासी शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच तर हिंगोली जिल्‍हातील कळमनुरी तालुक्‍यातील मौजे वाई येथील अकरा आदिवासी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकात मुख्य शास्त्रज्ञ डॉ उदय खोडके यांनी आदिवासी उपयोजना उपक्रमांची माहिती दिली तर सुत्रसंचालन प्रा. गजानन गडदे यांनी केले. तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन पद्धती वापर व काळजी याबाबत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमास आदिवासी शेतक-यांसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकिशोर गिराम, प्रभाकर सावंत, अंजली इंगळे, रत्नाकर पाटील, दादाराव भरोसे, देवेंद्र कुरा, प्रकाश मोते, संजय देशमुख आदींनी परिश्रम घेतले.