Friday, October 19, 2018

वनामकृवित नांदेड-४४ व पीकेव्‍ही हायब्रीड-२ बीटी परावर्तीत कपाशी वाणांचे पीक प्रात्‍यक्षिक पाहणी

महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादीत अकोला व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांचे संयुक्‍त विद्यमाने संकरीत कपाशी नांदेड-४४ (एनएचएच-४४) व पीकेव्‍ही हायब्रीड-२ बीटी वाणांचे पीक प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रम दिनांक २२ ऑक्‍टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता परभणी येथील विद्यापीठ मध्‍यवर्ती प्रक्षेत्र - बलसा विभाग येथे आयोजित करण्‍यात आला असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे राहणार आहेत. महाबीजचे व्‍यवस्‍‍थापकीय संचालक मा श्री ओमप्रकाश देशमुख व महा‍बीजचे संचालक मा श्री वल्‍लभरावजी देशमुख यांची प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थिती राहणार असुन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाबीजचे महा‍व्‍यवस्‍थापक (उत्‍पादन) श्री सुरेश पुंडकर, महाव्‍यवस्‍थापक (विपणन) श्री रामचंद्र नाके, महाव्‍यवस्‍थापक (गुण नियंत्रण व संशोधन) डॉ प्रफुल्‍ल लहाने, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे, कापुस विशेषज्ञ डॉ खिजर बेग आदी प्रमुख मार्गदर्शक उपस्थिती लाभणार आहे. शेतकरी बांधवानी सदरिल पीक प्रात्‍यक्षिक पाहण्‍यास उपस्थित राहण्‍याचे आवाहन महा‍बीज विभागीय व्‍यवस्‍थापक श्री सुरेश गायकवाड, मध्‍यवर्ती प्रक्षेत्राचे  प्रभारी अधिकारी डॉ विलास खर्गखराटे व महाबीज जिल्‍हा व्‍यवस्‍थापक श्री गणेश चिरूटकर यांनी केले आहे.

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रातुन १९८४ साली विकसित झालेला कपाशीचा नांदेड-४४ (एनएचएच-४४) हा संकरित वाण कपाशीचे बीटी वाण येण्‍यापुर्वी अधिक उत्‍पादन देणारा, पुनर्बहाराची क्षमता असलेला व रसशोषण करणा-या कीडींना प्रतिकारक असल्‍यामुळे मराठवाडा व राज्‍यातीलच नव्‍हे तर देशातील इतर राज्‍यातील शेतक-यांमध्‍ये मोठया प्रमाणावर लागवडीसाठी प्रचलित होता. हा वाण जनुकीय परावर्तनासाठी म्‍हणजेचे बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी मार्च २०१४ मध्‍ये वनामकृवि व महाबीज मध्‍ये सामंजस्‍य करार करण्‍यात आला. त्‍यानंतर नांदेड-४४ हा वाण बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला असुन गेल्‍या तीन वर्षापासुन सातत्‍याने त्‍यांच्‍या प्रक्षेत्र चाचण्‍या यशस्‍वी झाल्‍या आहेत. त्‍याचा प्रात्‍यक्षिकाचा भाग म्‍हणुन सदरिल प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी दिली.