वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषिविद्या विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या
दुस-या सत्राचा विद्यार्थी प्रविण प्रभाकरराव गायकवाड हा दिनांक १३ मे रोजी
विद्यापीठाच्या व्यायामशाळेत व्यायाम करीत असतांना डोक्यावर पडुन गंभीर जखमी
झाला होता. या अपघातानंतर त्यास उपचारासाठी खाजगी रूग्णालयात उपचार करून अकोला येथील
नोबेल हॉस्पीटल मध्ये हलविण्यात आले होते. प्रविण हा शिरपुर जैन ता. मालेगांव
येथील अल्पभुधारक शेतकरी कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यी असुन त्याच्या उपचारासाठी मोठा
खर्च येणार आहे. त्याच्या उपचा-यासाठी मदतीचा हात म्हणुन वनामकृवितील
विद्यार्थीवर्ग, प्राध्यापकवृंद व कर्मचारीवर्ग सर्वांनी मिळुन निधी जमा केला. दि. ९ जुन रोजी जमा झालेला निधी एकुण रक्कम रू. ७८,०७५/- हा प्रविण गायकवाड यांचे चुलते
श्री. पुरूषोत्तम गायकवाड यांना विद्यापीठाचे कुलगूरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी विस्तार शिक्षण संचालक
डॉ. अशोक ढवण, जिमखाना अध्यक्ष तथा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
बी. बी. भोसले, जिमखानाचे सचिव डॉ. डी. आर. कदम तसेच विद्यार्थी प्रतिनिधी कल्पेश
शिंदे, किशोर चव्हाण, पांडुरंग पावडे, महेश मुकदम, बद्रीनाथ वैद्य आदी उपस्थित
होते.