Thursday, July 17, 2014

ऑनलाईन सेवार्थ प्रणालीमुळे विद्यापीठाच्या वेतन विषयकबाबतीत आर्थिक सुसूत्रता येणार...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

सेवार्थ प्रणालीबाबतच्‍या एक दिवशीय कार्यशाळाचे उदघाटन  
राज्‍य शासनाच्‍या ऑनलाईन सेवार्थ प्रणालीमुळे विद्यापीठाच्‍या कर्मचारी व अधिकारी यांच्‍या वेतन विषयक त्रुटी कमी होऊन मनुष्‍यबळ व वेळेची मोठी बचत होणार असुन देयके त्‍वरित पारित होऊन विद्यापीठाच्‍या आर्थिक प्रशासनात सुसुत्रता येणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सर्व आहरण वितरण अधिकारी व संबंधीत कर्मचारी यांची सेवार्थ प्रणालीबाबतचे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठ नियंत्रक कार्यालयाच्‍या वतीने दिनांक १७ जुलै रोजी करण्‍यात आले होते, या कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विद्यापीठाचे नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, श्री दिवाकर काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु भाषणात पुढे म्‍हणाले की, आज संगणक साक्षरता काळाची गरज झाली असुन जो व्‍यक्‍ती संगणकाबाबत अज्ञानी आहे त्‍यास निरक्षक समजला जात आहे. त्‍यामुळे या ऑनलाईन सेवार्थ प्रणालीचे ज्ञान विद्यापीठातील सर्व आहरण वितरण अधिकारी व संबंधीत कर्मचारी असणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे यांनी सेवार्थ प्रणालीबाबत सविस्‍तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सहायक नियंत्रक श्री जी बी उबाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राम खोबे, किशोर शिंदे, कृ‍ष्‍णा जावळे, तुकाराम शिंदे, बी. सी. कदम आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
महाराष्‍ट्र शासनाच्‍या निर्देशानुसार राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन चालु महिण्‍यापासुन सेवार्थ प्रणालीनुसार ऑनलाईन पध्‍दतीने संबंधीत कर्मचा-यांच्‍या बॅक खात्‍यात जमा होणार आहे. ही सेवार्थ प्रणाली राबविण्‍याबाबतचे सविस्‍तर मार्गदर्शन या कार्यशाळेत देण्‍यात आले.