वनामकृवीत जनुकीयदृष्टया
सुधारित पीकांसंबधी एक दिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु |
विविध देशात जनुकीय
परिवर्तीत पीके ही किड व रोग प्रतिकारक, तणनाशकाशी मुकाबला करणारी, शेतमाल
टिकावुपणा व पोषणमुल्य वृध्दी अशा विविध गुणधर्मांनी संपन्न अशी विकसित करण्यात
आली असुन यामुळे उत्पादनवाढ, पर्यावरणाचा समतोल व मशागतीच्या खर्चात कपात होऊन
शेतक-यांना फायदयाचीच आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी
केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व बायोटेक कंसोर्टियम इंडिया
लिमिटेड, नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने दि ९ जानेवारी रोजी जनुकीयदृष्टया
सुधारित पीकांसंबधीच्या विविध पैलुंवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु
हे होते तर जनुक अभियांत्रिकी मान्यता समितीचे सदस्य डॉ ओ पी गोवीला, नवी दिल्ली
येथील बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेडच्या मुख्य सरव्यवस्थापिका डॉ विभा
आहुजा, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व विस्तार
शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले, की राज्यातील
शेतक-यांनी बी टी कापसाला मोठा प्रतिसाद दिला असुन स्वत: शेतकरी डोळसपणे
तंत्रज्ञान अवलंब करित असुन आपआपल्या स्तरावर तंत्रज्ञानात बदल करीत आहेत. मराठवाडयातील
जालना व औरंगाबाद जिल्हयात मोठया प्रमाण विविध पीकांचे बियाणे निर्मिती होऊन
देशातील अनेक राज्यात त्याची विक्री होते. मराठवाडयातील कापुस व सोयाबीन ही मुख्य
जिरायती पीके असुन अनिश्चित हवामानामुळे पीकांची उत्पादकता कमी झाली आहे. वनामकृविनेही
महाबीजशी साम्यजंस्य करार केला असुन कपाशीच्या एनएचएच-४४ (नांदेड-४४) वाण हे लवकरच जनुकीयदृष्टया
परिवर्तीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जनुक अभियांत्रिकी मान्यता समितीचे सदस्य डॉ ओ पी गोवीला आपल्या भाषणात
म्हणाले, तंत्रज्ञानाच्या जोरावर देशात हरितक्रांती होऊन अन्नधान्याच्या
बाबतीत स्वयंपुर्ण झाला, परंतु गेली काही वर्षात अन्नधान्याचे उत्पादनात अपेक्षीत
वाढ दिसुन येत नाही. यासाठी जैवतंत्रज्ञानाचा आधार आपणास घ्यावा लागेल. कपाशीत
बोंडअळयाच्या नियंत्रणासाठी अमर्याद रासायनिक किटकनाशकाच्या फवारण्या करून
अळींचे नियंत्रण होत नव्हते, परंतु बी टी वाणामुळे फवारण्या कमी होऊन शकल्या,
कपाशीत रसशोषण करणा-या किडींना प्रतिकारक वाणासाठीचे संशोधन सुरू आहे. तसेच विविध
पीकांत पाण्याचा कार्यक्षम वापर करणारे जनुकियदृष्टया सुधारत वाण येणार असुन
यामुळे कमी पाण्यात चांगले उत्पादन आपणास मिळु शकेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर म्हणाले,
की देशात जनुकीयदृष्टया सुधारित पिकांच्या चाचणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहीला आहे. जनुकीय परिवर्तीत पीकांबाबत शेतक-यांत व
समाजात समज व गैरसमज निर्माण झाले असुन ते दुर करण्यासाठी व समाजात जागृती होण्यासाठी
या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सुत्रसंचालन मेघा उमरीकर यांनी तर आभार
प्रदर्शन डॉ जी के लोंढे यांनी केले.
सदरिल कार्यशाळेत नवी दिल्ली येथील बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेडच्या
मुख्य सरव्यवस्थापीका डॉ विभा आहुजा यांनी भारतातील जनुकीय परिवर्तीत पिकांकरिता
नियामक पध्दतीची माहिती दिली तर डॉ पजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान
केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ संतोष गहुकर यांनी जनुकीय परिवर्तीत पीकांची भुमिका या
विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय पोषण संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ बी दिनेश कुमार
यांनी जनुकीय परिवर्तीत पीके व मानवाच्या अन्नसुरक्षीततावर प्रकाश टाकला तर पुणे
येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या मुख्य शास्त्रज्ञा डॉ विद्या गुप्ता यांनी जनुकीय
परिवर्तीत पिकांच्या विकासातील विविध अवस्थेबाबत माहिती दिली. महिको कंपनीचे
संशोधक डॉ नरेंद्र नायर यांनी महीको कंपनीचे जनुकीय परिवर्तीत पिकाच्या वाण
निर्मितीतील भुमिका विषद केली. कार्यशाळेत विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी
व महिला शेतकरी, कृषि विभागातील कर्मचारी, पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्येने
उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना डॉ ओ पी गोवीला |
प्रास्ताविक करतांना डॉ दत्तप्रसाद वासकर |