वनामकृवित जागतिक मृदा वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
वाढता कार्बन डॉय ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड व मिथेन वायु
आदींचे उत्सर्जन हे हवामान बदलाचे मानव निर्मित मुख्य कारण असुन हवामान बदलामुळे
अनियमीत पाऊस व तापमानाचा राज्यातील शेतीवर मोठा परिणाम होत आहे, असे प्रतिपादन द एनर्जी अॅन्ड रिर्सोस इन्स्टिटुटच्या सहयोगी संचालिका
डॉ अंजली पारसनीस यांनी केले.
युनोच्या अन्न व कृषि संस्थेने
२०१५ हे वर्ष जागतिक मृदा वर्ष म्हणुन घोषीत केले असुन त्या निमित्त वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्या
वतीने हवामान बदलाचा महाराष्ट्रातील शेतीवर परिणाम’ यावर दि ६ जानेवारी रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात
आले होते, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर विस्तार शिक्षण संचालक डॉ
बी बी भोसले, परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन
गोखले, सहयोगी अधिष्ठाता (निम्नस्तर
शिक्षण) डॉ डी बी देवसरकर, गोळेगाव कृषि महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ विलास पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ उदय खोडके, उद्यानविद्या महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ ए एस कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ अंजली पारसनीस
पुढे म्हणाल्या, की
हवामानातील बदलामुळे पीकांवरील किड व रोगांचा प्रादुर्भाव असुन पीकांची उत्पादकतेत
घट होत आहे. पर्जन्यमानाच्या बाबतीत इस्राईलपेक्षा राज्यातील पर्जन्य हे आठ
पटीने जास्त असुन सुयोग्य पाणी व्यवस्थापनाव्दारे पाण्याचा कार्यक्षम वापर करणे
आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय
भाषणास शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी हवामान बदला व शेती यावर मोठया प्रमाणात
संशोधनाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ विलास पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ हरिहर कौसडीकर यांनी व
आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभाग
प्रमुख, प्राध्यापक व
कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.