Thursday, August 13, 2015

कीड-रोग व्‍यवस्‍थापन सल्‍ला जास्‍तीस जास्‍त बागायतदारांपर्यंत पोहचला पाहिजे....कुलसचिव डॉ दिनकर जाधव

हॉर्टसॅप प्रकल्‍पांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ दिनकर जाधव
मोसंबी कीड व रोग व्‍यवस्‍थापन या पुस्तिकेचे विमोचन करतांना कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले व विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदी
*******************************************
मराठवाडयातील यावर्षीची खरीप हंगामातील पिक परिस्थिती अत्‍यंत बिकट असुन फळबाग व्‍यवस्‍थापनाचेही मोठे आव्‍हान बागायतदार शेतक-यांपुढे आहे. हॉर्टसॅप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन बागायतदार शेतक-यांना बागा वाचविण्‍यासाठी मार्गदर्शन अत्‍यंत आवश्‍यक असुन कीड-रोग व्‍यवस्‍थापनाबाबतचा सल्‍ला जास्‍तीस जास्‍त बागायतदारापर्यंत विविध माध्‍यमातुन पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व‍ महा‍राष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने फलोत्‍पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्‍ला व व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प (हॉर्टसॅप) अंतर्गत दिनांक १३ व १४ ऑगस्‍ट रोजी कीड सर्वेक्षक, कृषि पर्यवेक्षक, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्‍या साठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले असुन दि १३ ऑगस्‍ट रोजी कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांच्‍या हस्‍ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्‍यात आले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले व विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलसचिव डॉ दिनकर जाधव पुढे म्‍हणाले की, हॉर्टसॅप प्रकल्‍पातील प्रत्‍यक्ष प्रक्षेत्रावर कार्य करणारे सर्वेक्षक यांची भुमिका महत्‍वाची असुन त्‍यांना फळबागेतील कीड-रोगाची चांगल्‍या प्रकारे ज्ञान अवगत असणे गरजेच आहे. यावरच प्रकल्‍पाचे यश अवलंबुन आहे, त्‍यामुळे वेळोवेळी त्‍यांना प्रशिक्षित करावे लागेल.
सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, मराठवाडयातील हवामान परिस्थितीत आबा व मोसंबी फळबागेवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव होण्‍याची शक्‍यता असुन हॉर्टसॅप प्रकल्‍पांतर्गत योग्‍य सल्‍ला बागायतदार शेतक-यापर्यंत पोहचविला पाहिजे. प्रास्‍ताविकात विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांनी हॉर्टसॅप प्रकल्‍पाबाबत माहिती देतांना सांगितले की, प्रकल्‍पातर्गंत मराठवाडातील मोसंबीवरील कीड-रोगाचे सर्वेक्षण औरंगाबाद, जालना, नांदेड व बीड या जिल्‍हयात होणार असुन त्‍यावर आधारीत सल्‍ला बागायतदारांना देण्‍यात येणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ एम बी पाटील यांनी मोसंबी बागेची लागवड, मोसंबीवरील किडीची ओळख व व्‍यवस्‍थापन यावर प्रा बी व्‍ही भेदे, मोसबी बागेसाठी अन्‍नद्रव्‍ये व्‍यवस्‍थापन यावर डॉ एच के कौसडीकर, मोसंबी रोग व्‍यवस्‍थापन यावर डॉ डी डी निर्मल यांनी, कीड सर्वेक्षक व पर्यवेक्षण यावर डॉ ए जी बडगुजर, नमुना तक्‍त्‍यातील नोंदणी प्रात्‍यक्षिक यावर डॉ डी पी कुळधर तर ऑनलाईन प्रपत्राच्‍या नोंद यावर नवी दिल्‍ली येथील एनसीआयपीएम चे संशोधन सहयोगी श्री निलेश पटेल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यापीठ कीटकशास्‍त्रज्ञ लिखित मोसंबी कीड व रोग व्‍यवस्‍थापनया पुस्तिकेचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ ए जी बडगुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा बी व्‍ही भेदे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमास कृषि विभागातील व कृषि विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ डि एन गोखले