Monday, August 31, 2015

शिफारशीनुसारच किडकनाशकांचा वापर करा......विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

अप्रमाणशीर किडकनाशकांमुळे वाढत आहे किडींचा प्रादुर्भाव

मराठवाडयातील ब-याच जिल्‍हयात पेरणीनंतर पावसाचा प्रदिर्घ खंड, त्‍यानंतर थोडासा पाऊस, अधिकचे तापमान, ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीन व कपाशीवर फार मोठया प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन त्‍या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यू. एन. आळसे यांनी परभणी तालुक्‍यातील मौजे पांढरी येथे गुंडेराव देगांवकर व बालाजी धस यांचे शेतावर भेट देऊन सोयाबीन व बागायती कापुस पिकांची पाहणी केली. सोयाबीन पिकांवर हेलीकोव्‍हर्पा (हिरवी / घाटे अळी), तंबाखूवरील पाने खाणारी अळी, लाल कोळी आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून आला. सोयाबीन पिकावरील पाने व शेंगा खाणा-या अळी प्रादुर्भाव नियंत्रानासाठी इमामेक्‍टीन बेन्‍झोएट ३ मिली किंवा क्‍लोरॅनट्रानीलिप्रोल (रायनाक्‍झीपार) २ मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे. शेंग करपा रोगासाठी कार्ब्‍न्‍डेझीम + डायथेन एम-४५ हे संयुक्‍त बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारण्‍याची शिफारस करण्‍यात आली. तसेच बागायती कपाशीवर फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी रसशोषण करणा-या किडी आढळुन आल्‍या. त्‍यांच्‍या बंदोबस्‍तासाठी फिप्रोनील २० मिली १० लिटर पाण्‍यात मिसळून स्‍वतंत्र फवारणी करावी. हया किटकनाशकाची संपूर्ण मात्रा घ्‍यावी. बरेचशे शेतकरी फिप्रोनील + इमिडाक्‍लोप्रीड असे मिश्रण वापरत आहेत ते चुकीचे असुन प्रमाणशीर औषधे नसल्‍यामुळे फुलकिडे व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्‍याचबरोबर पॉवर स्‍प्रे पंपासाठी सदरिल किटकनाशकांची मात्रा तीन पट करावी.
     सदरिल प्रक्षेत्र भेटी दरम्‍यान पांढरी, नांदगाव व परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले म्‍हणाले की, बीटी कपाशीसोबत नॉन‍बीटी जरुर लावले पाहिजे कारण येणा-या काळात बोंडअळी मध्‍ये बीटीला प्रतिकार क्षमता निर्माण झाली तर शेतक-यांना बीटी कापुस लावणे सोडून द्यावे लागेल. विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. आळसे यांनी बागायती क्षेत्रात जमिनीचे आरोग्‍य टिकविण्‍यासाठी सेंद्रीय किंवा हिरवळीच्‍या खताचा वापर करण्‍याची शिफारस केली तसेच परिसरातील जमिनी भारी असल्‍यामुळे पाण्‍याचा काटेकोरपणे वापर करण्‍याचा सल्‍ला दिला.