Saturday, August 1, 2015

अवर्षण प्रवण परिस्थितीत ट्रॅक्‍टर चलीत रुंद वरंबा सरी पध्‍दतीचे दृष्‍य परिणाम

सेलु तालुक्‍यातील ढेंगळी पिंपळगांव येथील शेतकरी श्री गोविंदभाऊ जोशी यांच्‍या रूंद वरंबा व सरी पध्‍दतीने पेरणी केलेल्‍या मुगाच्‍या शेतीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, डॉ यु एन आळसे, प्रा पी एस चव्‍हाण, प्रा टेकाळे आदी.
****************************
मराठवाडयात साधारणत: 135.2 मिमी. पाऊस झाला असुन हंगामातील सरासरी पावसापेक्षा 48 % कमी पाउस पडला तर परभणी व हिंगोली जिल्‍हयात सर्वात कमी पाऊस (33%) पडला, या पावसाचे वितरणही पीकांच्‍या दृष्‍टीने समाधानकारक नाही. कधी रिमझिम पाऊस पडत असुन कशीबशी पीके तग धरुन आहेत. साधारणपणे चार ते पाच आठवडयाचा खंड पडला आहे. त्‍याच बरोबर 32 ते 380 सें. तापमान व वा­याचा वेग यामुळे जमिनीतील पाण्‍याचे बाष्‍पीभवन जलद गतीने होत आहे. अशा परिस्थितीत मराठवाडयात पीकांची पाहणी केली असता रुंद वरंबा व सरी (बीबीएफ) वर पेरणी केलेली सोयबीन व मुग ही पीके तग धरुन आहेत. ढेंगळी पींपळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी श्री. गाेविंदभाऊ जोशी यांचे शेतात रुंद वरंबा व सरी पध्‍दतीने पेरलेल्‍या मुग पीकाला शेंगा लागत आहेत तरी श्री उध्‍दवराव सोळंके यांचे शेतात मुग मोडुन टाकण्‍याची अवस्‍था झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सदरील शेतक-यांच्‍या शेतीस नुकतेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॅा.बी.बी. भोसले, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. यू. एन. आळसे, विस्‍तार शिक्षण अधिकारी प्रा.पी.एस. चव्‍हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतक­यांचे मत असे आहे की, रुंद वरंबा व सरी पध्‍दतीने पेरलेले सोयबीन व मुग अजून आठ ते दहा दिवस तग धरु शकतात, परंतू पारंपारिक पध्‍दतीने पेरलेली पीके मोडावीच लागतात.
      यावर्षी ब­याच शेतक­यांनी ट्रॅक्‍टरचलित बीबीएफ यंत्र घेतले पण काही तांत्रिक अडचणीमुळे पेरणी करता आली नाही. शेतकरी बंधुनी बीबीएफ पेरणी यंत्राची जोडणी करत असतांना ट्रॅक्‍टरची अश्‍वशक्‍ती व सरीच्‍या अंतर पीकाचे शिफारशीनुसार दोन ओळीतील अंतर, हेक्‍टरी झाडांची संख्‍या याचा विचार केला पाहिजे. ट्रॅक्‍टरच्‍या चाकाच्‍या मागे सरी पडली पाहिजे जेणे करुन पीकांची टायरच्‍या बाजुच्‍या ओळीची उगवण होण्‍यास अडचण येणार नाही. ट्रॅक्‍टरचे पुढील व मागील चाक एकाच चाकोरतुन गेले पाहिजे. ट्रॅक्‍टरच्‍या मोठया टायरच्‍या पाठीमागे फण येत असेल तर ट्रॅक्‍टरचे सर्व टायर पल्‍टी करुन बसवावेत. दोन सरीतील अंतर मोजून पीकाच्‍या शिफारशीनुसार 150 सेमी. अंतराच्‍या बेडवर सोयबीनच्‍या तीन ओळी घ्‍यावयात व दोन ओळीतील अंतर 45 सें.मी ठेवावे. 30 सें.मी अंतर ठेवले तर चार ओळी येतील एखादे वेळेस ट्रॅक्‍टरच्‍या तडजोडीनुसार दोन ओळीतील अंतर कमी अधिक करावे लागेल.

      सन 2014-­15 साली बनसारोळा (जि.बीड) व सारोळा (जि. उस्‍मानाबाद) येथे गटाच्‍या माध्‍यमातुन मोठया प्रमाणावर शेतक­यांनी बीबीएफ वर पेरणी केली असता त्‍यांना पारंपारिक पेरणीच्‍या तुलनेत 15 ते 20 % अधिक उत्‍पन्‍न  मिळुन प्राप्‍त झाले. यावर्षीपण या शेतक­यांनी संपूर्ण यांत्रिकीकरण करुन खर्चात बचत करुन अधिक उत्‍पन्‍न वाढीचे उदि्दष्‍ट ठेवले आहे. तरी शेतकरी बंधूनी जमिन, पीक, पाऊस या सर्व बाबींचा अभ्‍यास करुन रूंद वरंबा व सरी पध्‍दतीचा अवलंब करण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी. भोसले यांनी केले आहे.