Wednesday, June 13, 2018

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुंग्याच्‍या नियंत्रणासाठी पेरणीच्‍या वेळीच विशेष काळजी घेण्‍याचे वनामकृविचे आवाहन

मराठवाडयातील सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक असुन यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढण्‍याची शकता आहे. गेल्या वर्षीच्या सोयाबीनवरील विविध किंडीच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहिल्यास चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे ब-याच ठिकाणी शेतक-यांचे नुकसान झाले. त्यामुळे या किडींच्या व्यवस्थापनासाठी यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून आणि पेरणीच्या वेळी विशेष लक्ष देण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने केले आहे.

सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाची उगवण झाल्यावर लगेच सुरुवात होते. यावेळेस प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. अंडयातून अळी निघाल्यानंतर बीजदल पोखरते व नंतर मुख्य खोडामध्ये शिरते. त्यामुळे अशी रोपे कोमेजातात व वाळून जातात. पीक मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही.

चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत आढळतो. अळी पानाचे देठ, खोड पोखरुन आत शिरते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त भाग सुकुन जातो. खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. तसेच या किडी खोडामध्ये राहत असल्यामुळे त्यांचे व्यवस्थपन करणे अवघड जाते. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून त्यांचे विविध पध्दतीवदारे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

हंगाम संपल्यानंतर शेतातील काडीकचरा वेचून नष्ट करावे. त्यामुळे त्यात असणा-या सुप्तावस्था नष्ट होतील.
उन्हाळी नांगरट केल्यास किडीच्या सुप्तावस्था कडक उन्हामुळे किंवा पक्षी खाल्यामुळे नष्ट होतील.
पेरणी जुलैच्या दुस-या आठवडयापर्यत संपवावी.
पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे.
प्रादुर्भावग्रस्त पाने, फांदया आतील किडीसह नष्ट कराव्यात.
पेरतेवेळी जमिनीमध्ये फोरेट 10 टक्के सीजी 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणे जमिनीत मिसळावे.
कीडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ट्रायझोफॉस 40 ईसी 12 मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी 3 मिली यांची फवारणी करावी.

सदरिल किडींच्‍या योग्‍य व्यवस्थापनासाठी वरील प्रकारे एकात्मिक व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले कृषि कीटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले आहे.


खोडमाशी
चक्रीभुंगा
चक्रीभुंगा
चक्रीभुंगा