Tuesday, June 5, 2018

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आले प्लॉस्टिक मुक्त अभियान

कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी परिसर स्‍वच्‍छतेसाठी सर्वांनी आग्रही राहण्‍याचे केले आवाहन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनाच्‍या माध्‍यमातुन दिनांक 5 जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त प्‍लॉस्टिक व कचरा मुक्‍त अभियान राबविण्‍यात आले. या अभियानाचे उदघाटन कुलगूरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते झाले तर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, पर्यावरणाचे संरक्षण करणे प्रत्‍येक नागरिकांची जबाबदारी असुन प्‍लॉस्‍टीकचा वापर न करण्‍याचा प्रत्‍येकांनी मानस करावा. परिसर स्‍वच्‍छतेसाठी सर्वांनी आग्रही राहावे, परभणी कृषि विद्यापीठाचा परिसर हरित व स्‍वच्‍छ ठेवण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न असतोच परंतु काही समाजातील नकारात्‍मक प्रवृत्‍तीच्‍या व्‍यक्‍तींमुळे विद्यापीठ परिसरात अस्‍वच्‍छता होत असेल तर त्‍यास प्रतिबंध करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
यावेळी सर्व विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक व कर्मचारी यांनी महाविद्यालयातील विविध विभाग, ग्रंथालय, वसतीगृह आदी परिसरातील प्‍लॉस्टिक कचरा वेचुन स्‍वच्‍छ केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक, सर्व वसतीगृह अधिक्षक, रासेयोचे सर्व कार्यक्रमाधिकारी आदींसह प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यींनी पुढाकार घेतला.