Wednesday, March 6, 2019

मौजे बाभुळगाव व उजळंबा येथील हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमास प्रमुख शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. एम. उस्मान यांची भेट

हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्‍या वतीने हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम (निक्रा) मौजे बाभुळगाव उजळंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येत आहे. बदलत्या हवामानास अनुकूल कोरडवाहू शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर प्रायोगिक स्वरुपात घेण्यात येत आहेत, यात प्रामुख्याने हवामान बदलास अनुकूल पीक पीकपध्दती, आंतरपीक पध्दती, जल मृदसंधारण, आपत्कालीन परिस्थितीत पिकांचे नियोजन, चारापिक प्रात्यक्षीक आदीं संशोधनात्मक बाबींवर प्रात्याक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आली आहेत. या प्रात्‍यक्षिकास हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती सशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. मोहम्मद स्‍मा यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावरील हरितगृह, रेशीमशेती, शेततळी, विहीर कुपनलिका पुनर्भरण प्रात्यक्षिक आदी उपक्रमांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. सदर भेटी दरम्यान डॉ. उस्मान यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्यशास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके, वरिष्ठ संशोधन सहाय्यक आर. बी. परिहार, कृषि सहाय्यक सारिका नारळे, वरिष्ठ संशोधन सहयोगी डॉ. हनुमान गरुड, बाभुळगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. माऊली पारधे उजळंबा येथील श्री. राजेभाऊ रगड आदींसह शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.