Saturday, March 9, 2019

चांगुलपणा हा व्यक्तीचा उपजत गुण असतो, तो जपला पाहिजे......गुप्तचर विभागाचे पोलिस उपायुक्‍त मा श्री निसार तांबोळी

परभणी कृषि महाविद्यालयाचेे माजी विद्यार्थ्‍यी मा श्री निसार तांबोळी यांनी साधला मुक्‍त संवाद
चांगुलपणा हा व्यक्तीचा उपजत गुण असतो, तो जपला पाहिजे. महाविद्यालयीन जीवनातच जाणिवपुर्वक चांगल्‍या सवयी लावुन घ्‍या, त्‍याच आधारे आयुष्‍यात यशस्‍वी व्‍हाल. चांगला मित्र, चांगला भाऊ, चांगला मुलगा तसेच चांगला व्‍यक्‍ती बना, असा सल्‍ला परभणी कृषि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्‍यी तथा गुप्तचर विभागाचे पोलिस उपायुक्‍त मा श्री निसार तांबोळी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या रोजगार व समुदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक 9 मार्च रोजी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्‍यी तथा गुप्तचर विभागाचे मुंबई पोलिस उपायुक्‍त मा श्री निसार तांबोळी यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍या प्रसंगी ते बोलत होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले हे होते तर व्‍यासपीठावर मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ राजेश कदम, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ एस एल बडगुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा श्री निसार तांबोळी पुढे म्‍हणाले की, प्रामाणिकपणा अंगी असल्‍यास आपल्‍या विचारात व बोलण्‍यात स्‍पष्‍टता येते, तोच यशस्‍वी जीवनाचा खरा पाया असतो. गुरूजंनाचा व मोठयांचा आदर राखा. विद्यार्थ्‍यांना करिअरच्‍या दृष्‍टीने आज विविध क्षेत्रात संधी आहेत, परंतु आपल्‍या आवडीचे क्षेत्राची निवड केली तरच आयुष्‍यात समाधानी राहाल, ते क्षेत्र स्‍वयंरोजगाराचे असले तरी चालले, असे सांगुन त्‍यांनी आपल्‍या महाविद्यालयीन आठवणींना उजळा दिला. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्‍यांनी स्‍पर्धा परिक्षा व करिअरच्‍या दृष्‍टीने विचारलेल्‍या प्रश्‍न व शंकाचे मुक्‍त संवादाच्‍या माध्‍यमातुन समाधान केले.   
अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, परभणी कृषि महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थ्‍यी संषर्घपुर्ण परिस्थितीत घडले असुन विविध क्षेत्रात यशस्‍वी झाले आहेत, त्‍यांचे अनुभव आजच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी प्रेरणादायी ठरतात. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ एस एल बडगुजर यांनी केले तर आभार प्रा विजय जाधव यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.