Tuesday, March 12, 2019

दुष्‍काळ पार्श्‍वभुमीवर फळबाग वाचविण्‍याचे फळ उत्पादक शेतकरी बांधवापुढे मोठे आव्‍हान....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राची वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा संपन्‍न 
परभणी : मराठवाडयातील आठही जिल्‍हयातील कृषि विज्ञान केंद्र कृषि विस्‍ताराचे कार्य चांगल्‍या पध्‍दतीने करित आहेत. सद्याच्‍या दुष्‍काळ पार्श्‍वभुमीवर फळबाग वाचविण्‍याचा मोठा प्रश्‍न शेतकरी बांधवापुढे असुन फळबाग वाचविण्‍याचे विद्यापीठाकडे उपलब्‍ध तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याचा प्रयत्‍न विषय तज्ञांनी करावा, असा सल्‍ला कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राच्‍या दिनांक १२ मार्च रोजी आयोजित वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, गेल्‍या वर्षी परभणी कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्‍या वतीने राबविण्‍यात आलेल्‍या कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान प्रसार मोहिमेमुळे शेतकरी कमी खर्चात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखु शकले, याचा फायदा शेतक-यांना निश्चितच झाला. येणा-या हंगामात विद्यापीठ विकसित कपाशीचा नांदेड-४४ वाण बीटी स्‍वरूपात मर्यादीत प्रमाणात उपलब्‍ध होणार आहे, कृषि विज्ञान केंद्रांनी या वाणाचे प्रात्‍य‍ाक्षिके घेऊन बाजारात उपलब्‍ध इतर वाणांशी तुलनात्‍मक अभ्‍यास करावा. भावीकाळात विद्यापीठ विकसित बीटी वाणाच्‍या बाजारातील उपलब्‍धतेमुळे कपाशीच्‍या बियाण्‍याचे भाव योग्‍य पातळीवर राखण्‍यास मदत होणार आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.   
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, शेततळयातील पाण्‍याचे बाष्‍पीभवन रोखण्‍यासाठी सिटाईल अल्‍कोहोल वापरण्‍याची विद्यापीठ तंत्रज्ञान शिफारस शेतक-यांसाठी उपयुक्‍त असल्‍याचे सांगितले तर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी कृषि विज्ञान केंद्रांनी शेतक-यांच्‍या सामाजिक व आर्थिक उन्‍नतीसाठी कार्य करित असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठाची कृषि दैनदिनी २०१९ चे विमोचन करण्‍यात आले. प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यशाळेत विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व विविध विभागाचे प्रमुख यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मराठवाडयातील बारा कृषि विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्‍वयक व विषय विशेषतज्ञांनी सहभाग नोंदविला होता, यात कृषि विज्ञान केंद्राचा वार्षिक कृती आराखडा निश्चित करण्‍यात आला.