Friday, March 29, 2019

महाविद्यालयीन युवकांनी आपली ऊर्जा सकारात्‍मक कार्यास खर्च करावी......शिक्षण संचालक डॉ विलास पाटील

मौजे कारेगांव येथे वनामकृवितील महाविद्यालयाच्‍या रासेयो विशेष शिबिर
राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांना सामाजिक प्रश्‍नांची जाण होते. महाविद्यालयीन युवकांमध्‍ये मोठी ऊर्जा असते, ती ऊर्जा सकारात्‍मक कार्यास खर्च करावी. आयुष्‍यात यशस्‍वी होण्‍यासाठी वेळेचे नियोजन करा. आपले शारिरीक व मानसिक आरोग्‍य चांगले राहण्‍यासाठी महाविद्यालयीन जीवनातच जाणीवपुर्वक प्रयत्‍न करावेत, असा सल्‍ला शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अन्‍नतंत्र महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे कारेगांव येथे दिनांक 25 ते 31 मार्च दरम्‍यान कालावधीत आयोजित करण्‍यात आले असुन दिनांक 29 मार्च रोजी ते रोसयोच्‍या स्‍वयंसेविकांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उद्य गोखले, कवि राजकुमार नायक, प्रा एस पी सोळंके, प्रा व्‍ही बी जाधव, डॉ जे डी देशमुख, डॉ पी एच गौरखेडे, प्रा एस एन पवार, प्रा एस के सदावर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ उद्य खोडके यांनी रासेयोच्‍या विविध उपक्रमामुळे स्‍वयंसेवक विद्यार्थ्‍यांना समाज जीवनाची ओळख होते असे मत व्‍यक्‍त केले तर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी रासेयोमुळे विद्या‍र्थ्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासास चालना मिळते असे प्रतिपादन केले.
सुत्रसंचालन प्रा विजय जाधव यांनी केले तर आभार अक्षय गोडभरले यांनी मानले. यावेळी कवि राजकुमार नायक यांनी आपल्‍या भरदार कवितां सादर केल्‍या. स्‍वयंसेविकांनी नारी शक्‍ती याविषयावर आधारित नवदुर्गा हे लघुनाटिका सादर केली तसेच स्‍वयंसेवकांनी मौजे कारेगाव येथे प्रभातफेरी काढुण स्‍वच्‍छता अभियान राबविले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयोचे स्‍वयंसेवक व स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतले.