Sunday, March 31, 2019

मौजे कारेगांव येथे आयोजित वनामकृवितील रासेयोच्‍या शिबिरात 102 स्‍वयंसेवकांनी केले रक्‍तदान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अन्‍नतंत्र महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे कारेगांव येथे दिनांक 25 ते 31 मार्च दरम्‍यान आयोजित करण्‍यात आले असुन दिनांक 30 मार्च रोजी रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. शिबिराचे उदघाटन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उद्य खोडके, प्राचार्य डॉ ए आर सावते, रक्‍त संक्रमण अधिकारी डॉ कनकदंडे, डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.   
यावेळी मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले म्‍हणाले की, रासेयोच्‍या विविध उपक्रम म्‍हणजे विद्यार्थ्‍यांमध्‍ये माणुसकी निर्माण करणारी प्रक्रिया आहे. रक्‍तदानाच्‍या माध्‍यमातुन समाजासाठी आपले काहीतरी देणे लागतो ही भावना रक्‍तदात्‍यात असते असे सांगुन घेणे सारेच जाणतात, देणे शिकु या, रक्‍तदान करू या, असा संदेश दिला तर रक्‍त संक्रमण अधिकारी डॉ कनकदंडे यांनी रक्‍तदानाचे महत्‍व सांगितले. स्‍वयंसेविक तुलसी चांडक, विशाल सरवदे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. सुत्रसंचालन सिध्‍देश्‍वर शिंदे व स्‍वप्‍नील झरकर यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा संजय पवार यांनी मानले.
शिबिरात 102 स्‍वयंसेवक, स्‍वयंसेविका व प्राध्‍यापकांनी रक्‍तदान केले. तसेच स्‍वयंसेविक व स्‍वयंसेविकांनी गावामध्ये नारी शक्‍ती नवदुर्गा, मतदार राजा जागा हो, व्‍यसनमुक्‍ती आदीवर पथनाटय सादर करून जनजागृती करण्‍यात आली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा एस पी सोळंके, प्रा व्‍ही बी जाधव, डॉ जे डी देशमुख, डॉ पी एच गौरखेडे, डॉ प्रविण घाटगे, प्रा संजय पवार, प्रा एस के सदावर्ते आदींच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसे‍वकांनी परिश्रम घेतले.