Wednesday, February 26, 2025

विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे!...माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 शिवजयंती महोत्सवानिमित्त वनामकृविच्या लातूर येथील महाविद्यालयात सांस्कृतिक स्पर्धेला  प्रारंभ


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. या महोत्सवात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांच्या अध्यक्षेतेखाली दिनांक २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. श्रीमती जयश्री मिश्रा आणि शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार हे प्रमुख अतिथी होते. व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ.दिनेशसिंह चौहान, प्रभारी अधिकारी डॉ.मोहन धुप्पे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.वसंत सूर्यवंशी, डॉ.अरुण गुट्टे, डॉ.व्यंकट जगताप, डॉ.अच्युत भरोसे, डॉ.विजय भामरे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने झाले. यावेळी अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, शिवरायांच्या विचारांचा वारसा आपल्याला लाभलाय म्हणून ही भूमी पवित्र आहे. शिवरायांनी  मोजक्याच साधनामध्ये स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी आहे त्या  संधीचा सुयोग्य वापर करून अनेक नवनवीन संधी निर्माण केल्या. आज अनेक नवनवीन क्षेत्रात संधी उपलब्ध होत आहेत. कृषि महाविद्यालय, लातूरचा परिसर हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पोषक असून हा विभाग माझ्या सदैव पसंतीचा आहे, अशी शाबासकीची थाप देवून  विद्यार्थ्यांनी  योग्य शिक्षण  आणि  शिवरायांचा आदर्श  घेवून  कुठल्याही क्षेत्रात जाऊन संधीचे सोने करा असेही ते म्हणाले.

शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण शारीरिक व मानसिक विकासासाठी  सांस्कृतिक स्पर्धांचा मोलाचा वाटा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अध्यायनासोबतच सांस्कृतिक कला गुणांना वाव देण्याकरिता विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे.

यानंतर  बहारदार  गायनशास्त्रीय, पाश्चात्य  नृत्य, भारताच्या विविध प्रदेशांच्या लोकनृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.  मान्यवरांच्या हस्ते  कृषि महाविद्यालय, लातूर  व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या  विजेत्या स्पर्धकांना  चषक, पदक व प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन सानिका करपे  व अंजली  सौम्या  यांनी तर  आभार डॉ.विजय भामरे  यांनी मानले. कृषि महाविद्यालय, लातूर  व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने सांस्कृतिक महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला.