Monday, June 24, 2019

वनामकृविच्‍या अंबाजोगाई येथील सिताफळ संशोधन केंद्रातील जातीवंत रोपांना मोठी मागणी

तामिळनाडु व मध्यप्रदेशातील शेतक-यांनीही केली मोठया प्रमाणात  खरेदी 
सिताफळ हे बदलत्या हवामानात तग धरु शकणारे फळपिक म्हणुन पुढे येत असुन दिवसेंदिवस सिताफळ लागवडीकडे शेतक-यांचा कल वाढत आहे. सिताफळ हे केवळ महाराष्ट्रापुरते सिमीत राहीले नसुन तामिळनाड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आदीं राज्यात त्याची व्‍यापारीदृष्‍टया लागवड होत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या अंबाजोगाई सिताफळ संशोधन केंद्रात यावर्षी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनानुसार सिताफळाची धारुर-६, बालानगर, टिपी-७ आदीसह रामफळ व हनुमान फळाची पन्‍नास हजार जातीवंत रोपे तयार केली असुन विक्रीसाठी प्रतिकलम चाळीस रुपये दराने उपलब्ध आहेत. संशोधन केंद्राने निर्मीत केलेल्या विविध वाणांनाची लागवड खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात मोठया प्रमाणात झाली असुन यावर्षी तामिळनाडु व मध्यप्रदेशातील शेतक-यांनीही मोठया प्रमाणात रोपांची खरेदी केली आहे. सिताफळातील विविध वाणातील धारुर-६ या वाणास मोठी मागणी असुन याचे वैशिष्टय म्हणजे फळाचा आकार मोठा असुन वजन ४०० ग्राम पेक्षा जास्त आहे तर साखरेचे प्रमाणे १८ टक्के व घनदृव्याचे प्रमाण २४ टक्के असल्यामूळे प्रक्रीया उद्योगामध्ये याची मागणी मोठी आहे. प्रक्रिया उद्योगाचा विचार करता धारुर-६ व बालानगर या फळांची मागणी असते. सिताफळाच्या गराचा मिल्कशेक, रबडी, आईक्रीममध्ये मोठया प्रमाणात वापर होत असुन गराची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली असून सिताफळ लागवडीसाठी शेतक-यांनी महाराष्ट्र शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 
रोपांसाठी डॉ गोविंद मुंडे यांच्‍याशी संपर्क करावा, मोबाईल क्रमांक ८२७५०७२७९२.