परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी दिनांक १८ मे रोजी खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. परंतु करोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव व राज्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर यावर्षीचा खरिप शेतकरी मेळावा रद्द करण्यात आला असुन ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रम घेण्यात येणार आहे. विद्यापीठ उत्पादीत तुर, मुग व खरीप ज्वारी पिकांच्या वाणांचे बियाणे खरीप हंगामात पेरणीसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्हयात शेतक-यांना उपलब्ध करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. याकरिता मराठवाडयातील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील जिल्हयात कार्यरत असलेल्या कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे व कृषि महाविद्यालये यांच्या माध्यमातुन बियाणे विक्रीस जुन महिण्याच्या पहिल्या आठवडयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याकरिता औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र, हिंगोली येथील गोळेगाव कृषी महाविद्यालय, नांदेड येथील कापुस संशोधन केंद्र, लातुर येथील गळीत धान्य संशोधन केंद्र, जालना जिल्हयातील बदनापुर येथील कृषि विज्ञान केंद्र, बीड जिल्हयातील खामगांव येथील कृषि विज्ञान केंद्र, उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्र तसेच परभणी मुख्यालयी बीज प्रक्रीया केंद्रात हे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती विद्यापीठातील बीज प्रक्रिया केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे.
सदर सत्यतादर्शक तथा प्रमाणित बियाणाचे दर पुढील प्रमाणे राहातील
तुर पिकाचे बीडीएन–७११ (पांढरा), बीडीएन-७१६ (लाल), बीएसएमआर-७३६ (लाल) या वाणाचे ६ किलो बॅगची किंमत ७८० रूपये असुन मुगात बीएम-२००३-२ या वाणाचे ६ किलो बॅगची ७८० रूपये आहे तर खरीप ज्वारीत परभणी शक्ती वाणाची ४ किलो बॅग २४० रूपये किंमतीस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती बीज प्रक्रीया केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे.