Monday, May 18, 2020

ऑनलाईन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी बांधव ही आधुनिक होत आहेत..... कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे

वनामकृविच्‍या 48 व्‍या वर्धापन दिनी राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांनी साधला शेतक-यांशी संवाद


आज कोरोना विषाणु रोगाच्‍या पार्श्‍वभुमीवर मानवाच्‍या जीवनात मोठे बदल होत आहेत, काही ठिकाणी शेतमालाची शेतकरी बांधव ग्राहकांना थेट विक्री करित आहेत. या संकल्‍पनेस प्रोत्‍साहन देण्‍याचा शासनाचा प्रयत्‍न राहणार आहे. यामुळे शेतक-यांना शेतमालाचे दोन पैसे जास्‍त मिळतील व ग्राहकांना कमी किंमतीमध्‍ये शेतमाल मिळेल. आज शेतकरी आधुनिक होत असुन ऑनलाईन माध्‍यमाचा तो शेती करतांना उपयोग करित आहे. मराठवाडयातील कापुस व सोयाबीन मुख्‍य पिके आहेत, येणा-या खरिप हंगामात शेतक-यांना लागणारे बियाणे, खत व इतर निविष्‍ठा पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध होणार आहे, त्‍याचे नियोजन शासनाने केले आहे. शेतक-यांनी सोयाबीन पिकांमध्‍ये स्‍वत: कडील बियाणाचा वापर करावा, याकरिता सोयाबीनची उगवणक्षमता तपासुन घ्‍यावी. कापसामध्‍ये गेल्‍या वर्षी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पाहाता, यावर्षी मान्‍सुन पुर्व कापसाची लागवड न करता, पुरेसा पाऊस पडल्‍यानंतरच कापुस लागवड करावी. विद्यापीठाने संशोधनाच्‍या माध्‍यमातुन विकसित केलेले तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न करावा, असे प्रतिपादन कृषि मंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांनी ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रमात केली आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या 48 व्या वर्धापन दिनानिमीत्त दरवर्षी होणार खरिप मेळावा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करुन सोमवारी (ता.18) विद्यापीठाच्‍या वतीने झुम मि‍टिंग मोबाईल अॅप व युटयुब च्या माध्यमातून ऑनलाईन कृषीसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमात महाराष्‍ट्राचे कृषिमंत्री मा ना श्री दादा भुसे यांनी सहभागी शेतक-यांशी संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात राज्याचे कृषि सचिव मा श्री एकनाथ डवले, पुणे अटारीचे संचालक डॉ लाखन सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे होते. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, औरंगाबाद विभागीय सहसंचालक डॉ डि एल जाधव, लातुर विभागीय सहसंचालक श्री टि एन जगताप, परभणी जिल्हा कृषि अधिक्षक श्री संतोष आळसे, नाहेप प्रकल्पाचे मुख्य डाॅ गोपाल शिंदे यांच्यासह शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी आणि मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कृषि मंत्री मा ना श्री दादाजी भुसे पुढे म्हणाले, लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे खरिप हंगामा आढावा बैठक घेणार आहेत. शेतकरी बांधवनाना काही तक्रार असल्यास कृषि विभागाशी थेट संपर्क करा असे आवाहन करून विद्यापीठाच्‍या ऑनलाईन संवाद कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतकऱ्यांशी संवाद साधताना आनंद झाल्‍याचे मत त्यांनी व्‍यक्‍त केले.

या संवादात शेतकरी प्रताप काळे (धानोरा काळे ता.पूर्णा.जि.परभणी), मंगेश देशमुख (पेडगाव ता.जि.परभणी) सोपान शिंदे (पांगरा शिंदे ता.वसमत जि.हिंगोली) रामदास ढाकने (रा.जालना), राधेश्याम अटल (गेवराई,जि.बीड) आदीसह या शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले. त्यांच्या प्रश्नांना कृषिमंत्री मा ना श्री.दादाजी भुसे यांनी उत्तरे दिली.

अध्यक्षयीय समारोपात कुलगुरु डॉ.अशोक ढवन म्हणाले, मजुरांची टंचाई असल्याने यांत्रिकीकरणावर भर दिली जात आहे. मजुरांचे कष्ट कमी करण्यासाठी विद्यापीठाने यंत्रे विकसीत केली आहेत, तसेच उत्पादन खर्च कमी करण्याचे तंत्रज्ञान भर राहणार आहे. महिलाचं काबाडकष्‍ट कमी करण्‍यासाठी उपयुक्‍त तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केले आहे, त्‍याच्‍या प्रसारावर विद्यापीठाचा भर आहे. प्रक्रिया उद्योग, कृषि मालाचे मुल्यवर्धन यासाठी उपयुक्‍त तंत्रज्ञान विकसित करण्‍यावर विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे. ऑनलाईन संवादात शेतकरी आपआपल्‍या घरून व बांधावरून विद्यापीठाशी संवाद साधत आहेत. कीतीही अडचणी आल्‍या तरी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतक-यांपर्यंत पोहचत आहेत, अशी प्रतिक्रीया त्‍यांनी दिली.

ऑनलाईन संवाद कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, औरंगाबाद विभागीय सहसंचालक डॉ डि एल जाधव, लातुर विभागीय सहसंचालक श्री टि एन जगताप, परभणी जिल्हा कृषि अधिक्षक संतोष आळसे आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. तांत्रिक संत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ उदय आळसे, प्रा अरविंद पाडागळे यांनी कापुस, सोयाबीन लागवडीवर मार्गदर्शन करून शेतक-यांच्‍या कृषि विषयक प्रश्‍नांना उत्‍तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, सुत्रसंचालक जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले.