Thursday, May 28, 2020

कृषि विद्यापीठ सदैव शेतकर्‍यांच्या पाठीशी­­­­ ............. कुलगुरू मा डों अशोक ढवण

वनामकृवी व रिलायन्स फाऊंडेशन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ऑडिओ कॉन्‍फरन्‍सींग कार्यक्रमात प्रतिपादन

मराठवाडयातील शेती पुढे अनेक समस्‍या आहेत, शेतकरी बांधवांच्या कृषि विषयक समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ नेहमीच शेतकर्‍या सोबत आहे. शेतकरी बांधवांनी खचून न जाता कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, विद्यापीठ सदैव तुमच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व रिलायन्स फाऊंडेशन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 27 मे रोजी आयोजित ऑडिओ कॉन्‍फरन्‍सींग कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कृषि तंत्रज्ञान  माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. यू यन आळसे, शास्‍त्रज्ञ डॉ. एस. जे शिंदे, डॉ. बी. एस. कलालबंडी प्रा. डी.डी. पटाईत आदींनी सहभाग घेतला.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी खरीप हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे अश्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत शेतकर्‍यांना कृषि विषयक माहिती देण्यासाठी विद्यापीठ व रिलायन्स फाऊंडेशन राबवत असलेला ऑडिओ कॉन्फरन्सच्या चांगला उपक्रम राबवित असुन विस्तार कार्यकर्ते व रिलायंस फाउंडेशन यांचे त्‍यांनी कौतुक केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ डी बि देवसरकर आपल्‍या मार्गदर्शनात म्हणाले की, शेतकर्‍यांनी येणार्‍या भविष्यात जमिनीचे आरोग्य सांभाळणे ही काळाची गरज बनली असून शेतकर्‍यांनी मृद व पाणी नमुने तपासणी करणे गरजेचे आहे. माती परीक्षण केल्याने शेत जमिनीचा प्रकार, तिचे भौतिक, रासायनिक, कायिक गुणधर्म, अन्नद्रव्याच्या उपलब्धतेनुसार जमिनीमध्ये हवा, पाणी यातील समतोल राखणे, क्षारता, घट्टपणा आदी त्रुटी दूर करणे, जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्य तसेच पिकाला आवश्यक अन्नद्रव्य मात्रा या आधारे आवश्यक खत मात्रांचा अवलंब करणे शक्य होते. खरीप हंगामावर डॉ. यू एन आळसे यांनी सहभागी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले ज्यात बीज प्रक्रिया, बियाणे निवड, घरघुती बियाण्याचा वापर, नवीन संशोधित वाण आणि जमिनीचा प्रकार व पाऊसमानाप्रमाणे पिक पद्धतीचे नियोजन आदीबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. किटकशास्त्रज्ञ प्रा. दिगंबर पटाईत यांनी सहभागी शेतकर्‍यांना हुमणी किड, सोयबीन व कपाशीवरील किड व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. एस. जे शिंदे, डॉ. बी. एस. कलालबंडी प्रा. डी.डी. पटाईत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. करोंना विषाणू परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची कामे करतांना सामाजिक अंतर जोपासणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमात शेतकरी बांधवांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे फळबाग व्यवस्थापन, खरीप पूर्व नियोजन, जमीन मशागत, हुमणी नियंत्रणाचे उपाय यावर प्रश्न विचारले. या कॉन्फरंसमध्‍ये जिल्ह्यातील चारशे शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फोन्डेशन परभणी जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे व कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले.