Wednesday, September 29, 2021

कृषी विकासात कृषि अभियंत्याचे महत्वपूर्ण योगदान .... कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण

नामकृवितील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालयाच्‍या वतीने आयोजित वेबिनार मध्‍ये प्रतिपादन

हवामान बदलांमुळे दिवसेंदिवस शेतीक्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडत असुन या बदलांना सामोरे जाण्यासाठी कृषि अभियांत्रिकीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे. शेतीक्षेत्रात ड्रोन, रोबोट, आयओटी, आयसीटी आदीसह विविध डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजे आहे. शेतीची उत्पादन क्षमता व शेतकऱ्याचे उत्पनं वाढीसाठी मृद व जलसंधारण, आधुनिक व कार्यक्षम सिंचन पध्द्तींचा अवलंब, शेतीचे यांत्रिकीकरण आणि शेतीमाल प्रक्रिया व मुल्यवर्धन या कामात कृषि अभियंत्याचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवयांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालयाच्‍या वतीने कृषी विकासात कृषी अभियांत्रिकीचे स्थान व कृषी अभियंत्यांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे सत्राचे आयोजन करण्यात आले होते, या सत्राच्या अध्यक्षीय भाषणात ते  बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आणि नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुनील गोरंटीवार हे सहभागी झाले होते तर  कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मुंबईच्या रिलायन्स रिटेलचे जनरल मँनेजर श्री दत्तात्रय मोरे, अहमदनगरचे गट विकास अधिकारी श्री संदीप वायाळ, लातुरचे विक्रीकर अधिकारी श्री व्यंकट शिंदे, नाशिकचे उदयोजक श्री दीपक भापकर, आयआयटी खरपूर येथील संशोधक श्री सुयोग खोसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात डॉ. सुनील गोरंटीवार यांनी काटेकोर पाणी व्यवस्थापनासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर याविषयावर तांत्रिक मार्गदर्शन केले. यासाठी त्यानी रिमोट सेंसीग, कृषी क्षेत्रात वापरता येणारे विविध मोबाईल अप, हवामानाची माहिती, ड्रोन रोबोतंत्रज्ञानाचा पाणी व्यवस्थापणात उपयोग याबाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रातील काही गावे डिजीटल शेतीकडे वाटचाल करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

प्रास्‍ताविकात डॉ. उदय खोडके म्हणाले की, व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातील यशस्‍वी माजी विद्यार्थांचे मार्गदर्शन विद्यार्थांना अत्यंत प्रेरणादायी ठरते. थोर अभियंता भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्या व्यक्तिमात्वातील प्रामाणिकपणा, नैतीकता व प्रात्याक्षिक संकल्पना विद्यार्थांनी आपल्या अंगी बाळगावी असा सल्‍ला त्‍यांनी दिला. यावेळी जिमखाना उपाध्यक्ष डॉ. राहुल रामटेके यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमाची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. हरीश आवारी आणि प्रा. दत्तात्रय पाटिल यांनी करूं दिला. सूत्रसंचालन डॉ. रविन्द्र शिंदे यांनी केले तर आभार प्रा. मधुकर मोरे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक कर्मचारी तसेच आजीव माजी विद्यार्थी मोठया संखेने उपस्थित होते.

वेबिणार मध्‍ये रिलायन्स रिटेलचे जनरल मँनेजर श्री दत्तात्रय मोरे यांनी कृषि अभियांत्रिकी पदविधरांना खाजगी क्षेत्रात काम करतांना जिद्द व चिकाटी आवश्‍यक असल्याचे सांगितले. कृषि अभियंत्याचे ग्रामीण विकासात योगदान याविषयी बोलताना श्री संदीप वायाळ यांनी मार्गदर्शन केले. श्री व्यंकट शिंदे यांनी कृषि अभियंत्यांना वित्त आणि कर प्रणाली या क्षेत्रात तसेच बँकिग क्षेत्रात उपलबध असलेल्या संधी विषयी मार्गदर्शन केले. नाशिकच्या रेझोप्लास्ट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उद्योजक श्री दीपक भापकर यांनी स्वताचे उदाहरण देऊन उसतोड कामगाराचा मुलगा ते यशस्वी उद्योजक या जीवन प्रवासाचे कथन केले. माजी विद्याथी श्री सुयोग खोसे यांनी विध्यार्थ्याना स्पर्धा परिक्षाची तयारी व कृषी अभियंत्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी या विषयी मार्गदर्शन केले.