Wednesday, September 8, 2021

कृषीदुत व कृषीकन्‍यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅप जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता पुढाकार घ्‍यावा ..... प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने ई पीक पाहणी ऑनलाईन कार्यशाळा संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय आणि परभणी जिल्‍हा प्रशासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत दिनांक 8 सप्‍टेंबर रोजी ई पीक पाहणी मोबाईल अॅप यावरील ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल हे होते तर रावे समन्‍वयक विभाग प्रमुख डॉ व्‍ही बी कांबळे, सहसमन्‍वयक डॉ आर पी कदम, टाटा ट्रस्‍टचे मराठवाडा प्रतिनिधी श्री नारायण कदम, जिल्‍हा प्रतिनिधी श्री आनंद कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल म्‍हणाले की, महाराष्‍ट्र शासनाचा ई पीक पाहणी प्रकल्‍प हा एक महत्‍वाचा प्रकल्‍प असुन जिल्‍हानिहाय माननीय जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हास्‍तरीय सनियंत्रण समिती गठीत करण्‍यात आला आहे. या कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या प्राचार्यांचा समावेश आहे. ई पीक पाहणी मोबाईल अॅप वर पिक पेरणी अचुक नोंदीमुळे शेतकरी बांधवाना विविध सरकारी योजनांचा चांगल्‍या प्रकारे लाभ घेता येणार आहे. कृषि अभ्‍यासक्रमातील सातव्‍या सत्रातील विद्यार्थी राज्‍यातील विविध गावात कार्यरत असुन ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव कार्यक्रमांर्गत शेतकरी बांधवाना सदरिल मोबाईल अॅप डाऊनलोड करणे व पिकांची पेरणीची माहिती नोंदविण्‍यासाठी मदत करावी. सदरिल मोबाईल अॅपची माहिती जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता रावेच्‍या कृषिदुत व कृषिकन्‍या यांनी पुढाकार घ्‍यावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

श्री नारायण कदम म्‍हणाले की, टाटा ट्रस्‍ट व महाराष्‍ट्र शासन यांच्‍यातील सामंजस्‍य करारान्‍वये टाटा ट्रस्‍टने ई पीक पाहणी हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. शेतक-यांच्‍या सहभागाने मोबाईल अॅपच्‍या आधारे शेतक-यांनी स्‍वत: पीक पेरणीची माहिती ऑनलाइन पध्‍दतीने नोंद करू शकतील. यामुळे राज्‍यभरातील गाव निहाय, तालुका निहाय कोणत्‍या पिकाखालील किती क्षेत्र आहे, याची निश्चित आकडेवारी उपलब्‍ध होणार आहे. यामुळे कृषी विभागाच्‍या विशिष्‍ट पिकासाठी देय असणा-या योजनाचे लाभ खातेधारकांना अचुकरित्‍या देण्‍यास मदत होणार आहे.

श्री आनंद कदम म्‍हणाले की, ई पीक पाहणी अॅप मुळे कृषी गणना अत्‍यंत सुलभ पध्‍दतीने व अचुकरित्‍या पुर्ण करता येणार असुन ई पीक पाहणी पिक निहाय लागवडीचे क्षेत्र व उत्‍पन्‍नाचा अचुक अंदाज काढणे शक्‍य होणार आहे. तसेच खातेदार निहाय पीक पाहणी मुळे खातेदार निहाय पीक कर्ज, पीक विमा योजना, पीक नुकसान भरपाई अदा करण्‍यासही मदत होणार आहे.

कार्यशाळेत श्री नारायण कदम व श्री आनंद कदम यांनी ई पीक मोबाईल अॅप वापराबाबत सविस्‍तर तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ पी एस कापसे यांनी केले. कार्यक्रमास रावेचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. ऑनलाईन कार्यशाळेस रावेचे शंभर पेक्षा जास्‍त कृषिदुत व कृषिकन्‍यानी सहभाग नोंदविला.

ई पीक पाहणी प्रकल्‍प अंमलबजावणीकरिता परभणी जिल्‍हास्‍तरीय सनियंत्रण समितीचे जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गठण करण्‍यात आले असुन यात निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री महेश वडदकर, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री विजय लोखंडे, जिल्‍हा अधिक्षक भुमि अभिलेख अधिकारी श्री घोडके, जिल्‍हा सुचना व विज्ञान अधिकारी श्री सुनिल पोटेकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, टाटा ट्रस्‍टचे प्रतिनिधी श्री आनंद कदम, जिल्‍हा अग्रणी बॅक व्‍यवस्‍थापक श्री सुनिल हट्टेकर, पीक विमा कंपनी प्रतिनिधी श्री स्‍वप्‍नील घुले यांचा समावेश आहे.